Abhijeet Patil : शरद पवारांनी पंढरपुरात ‘भाकरी’ फिरवली, ‘मविआ’चा उमेदवार ठरला!
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून अभिजीत पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याला शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीचा अभिजीत पाटलांच्या नावाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले.
ADVERTISEMENT
भाकरी फिरवण्याचा उल्लेख करत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरूनच निवृत्तीची घोषणा केली होती. सगळ्यांच्या आग्रहानंतर पवारांनी निर्णय मागे घेतला आणि बदलांचे संकेतही दिले. त्यानंतर पवारांनी कामाला सुरूवात केली. पवारांनी पुन्हा एकदा दौरे सुरू केले असून, पंढरपुरात भाकरी फिरवण्याचा निर्णयही जाहीर करून टाकला. शरद पवारांनी 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, याबद्दल जाहीरसभेत नावच सांगून टाकलं.
ADVERTISEMENT
शरद पवारांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेताना भविष्यातील त्यांची भूमिका काय असेल, याबद्दल स्पष्ट संदेश दिला होता. पवार म्हणाले होते, “मी पुनश्चः अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते, असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे, यावर माझा भर असेल.”
पंढरपूर विधानसभा मतदारसंघ : नवं नेतृत्व आणि अभिजीत पाटील
पवारांनी सुरुवातीला भाकरी फिरवण्याची भूमिका मांडली. त्यानंतर नवीन नेतृत्व निर्माण करण्याबद्दल भाष्य केलं. पवारांनी त्यानंतर काम सुरू केलं आणि पहिला निर्णय घेतला तो पंढरपुरात. माजी आमदार प्रशांत परिचारकांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या आणि राष्ट्रवादीचे भारत भालके यांचं वर्चस्व राहिलेल्या पंढरपुरातून आता पवारांनी पाटलांना पसंती दिलीये.
हे वाचलं का?
हेही वाचा >> “बाळासाहेबांनी या कृत्याबद्दल शिंदेंची शिवसेनेतून हकालपट्टीच केली असती”
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांच्या मनातील इच्छा हेरत शरद पवारांनी साखर कारखान्याच्या जाहीर कार्यक्रमातच पाटीलच उमेदवार असतील, असं भाष्य केलं.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले, “आज तुम्ही अभिजीतला याठिकाणी साथ दिली. नेतृत्व हे तयार करायचं. तुम्ही लोकांनी हे नेतृत्व तयार केलं. तुम्ही नेतृत्व दिल्यानंतर आमच्यासारख्या नेत्याची जबाबदारी आहे की, त्या नेतृत्वाच्या पाठिशी उभं राहायचं.”
ADVERTISEMENT
“पाठिशी उभं राहायचं नुसतं नाही, तर मला भालके दादांच्यानंतर हा तालुका राजकीयदृष्ट्या पोरका वाटतो. त्याचं हे पोरकेपण घालवण्याची ताकद आज अभिजीतमध्ये आहे. त्यासाठी अभिजीतला तुम्ही पूर्ण ताकदीने उभं करा”, असं आवाहन पवारांनी केलं.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> संजय राऊत राष्ट्रवादी प्रवेश करणार? नितेश राणेंनी तारीखही सांगितली
पवार शेवटी म्हणाले, “मी तुम्हाला एवढंच सांगतो की, ज्यावेळी निवडून येईल, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांचा, आमच्या सगळ्या महाविकास आघाडीचा लोकप्रिय उमेदवार हा या ठिकाणी कोण आहे, असा प्रश्न विचारला तर लोक अभिजीतचं नाव घेतील. यादृष्टीने तयारी करा.”
अभिजीत पाटील आधीपासूनच लागले तयारीला
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर अभिजीत पाटलांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने गेल्या काही महिन्यांपासूनच तयारी सुरू केली आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पाटलांनी साखर पेरणी सुरू केली असून, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणी करून 2024 च्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT