Air India Plane Crash: अपघात झालेल्या विमानात महाराष्ट्रातील होती 'एवढी' लोकं, यादीच आली समोर!
Air India Plane Crash Maharashtra Passenger: अहमदाबादमध्ये ज्या विमानाचा भीषण अपघात झाला त्यात महाराष्ट्रातील एकूण 12 जण प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

अहमदाबाद: अहमदाबाद येथे आज (12 जून 2025) रोजी घडलेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 (बोईंग 787 ड्रीमलाइनर) चा टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांत मेघानीनगर परिसरात अपघात झाला. या दुर्घटनेत 242 प्रवाशांपैकी 204 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर एकमेव प्रवासी रमेश विश्वास कुमार हे सुदैवाने बचावले आहेत. अपघात झालेल्या या विमानात महाराष्ट्रातील 12 जण प्रवास करत होते. यामध्ये मुख्य पायलटसह तीन क्रू मेंबर्स आणि प्रवाशांचा समावेश आहे.
अपघातग्रस्त विमानात महाराष्ट्रातील एकूण किती प्रवासी होते?
अपघातग्रस्त विमानात महाराष्ट्रातील 12 जण होते. ज्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
- सुमित सबरवाल (विमानाचे मुख्य पायलट)- मुंबईतील चांदिवली भागातील रहिवासी
- सिविक कुंदर - (विमानाचे को-पायलट)- मुंबईतील बोरिवली भागातील रहिवासी
- अपर्णा महाडिक (क्रू मेंबर): अपर्णा या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांच्या नातेवाईक आहेत. त्या एअर इंडियाच्या सीनिअर क्रू मेंबर आहेत.
- मैथिली पाटील (क्रू मेंबर): मैथिली या देखील एअर इंडियाच्या केबिन क्रू मेंबर.
- दीपक पाठक - (क्रू मेंबर) हे देखील एअर इंडियाचे केबिन क्रू मेंबर होते आणि ते बदलापूरमध्ये राहत होते.
- रोशनी राजेंद्र सोनघरे (क्रू मेंबर): रोशनी या तिसऱ्या महाराष्ट्रीयन क्रू मेंबर होत्या, ज्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्या मुळच्या डोंबिवलीच्या आहेत.
- महादेव पवार (प्रवासी): मुळचे सांगोल्याचे असलेले महादेव हे प्रवासी म्हणून या विमानातून लंडनला जात होते.
- आशा पवार (प्रवासी): आशा या महादेव यांच्या पत्नी असून त्या देखील याच विमानातून प्रवास करत होत्या.
- मयूर पाटील (प्रवासी): मयुर हे महाराष्ट्रातील प्रवासी होते, ज्यांचा या अपघातात मृत्यू झाला.
- यशा कामदार (प्रवासी): यशा या मूळच्या नागपूरच्या असून त्या लंडनला जात होत्या.
- रक्षा मोदा (प्रवासी): यशा यांच्या सासू रक्षा मोदा या देखील लंडनला जात होत्या
- रुद्र मोदा (प्रवासी): यशा कामदार यांचा दीड वर्षीय मुलगा रुद्र मोदा हा देखील याच विमानातून प्रवास करत होता.
हे ही वाचा>> धक्कादायक.. विजय रुपाणी चाललेले पत्नी आणि मुलीला भेटायला, पण.. माजी मुख्यमंत्र्यांचा दुर्दैवी मृत्यू
अपघाताची पार्श्वभूमी
एअर इंडियाचे हे विमान 12 जून 2025 रोजी दुपारी 1.31 वाजता अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतले. मात्र, 1.38 वाजता विमानाचा शेवटचा सिग्नल मिळाला आणि त्यानंतर ते मेघानी नगर परिसरातील एका मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले. या अपघातात विमानाला भीषण आग लागली, ज्यामुळे जवळपास संपूर्ण विमान जळून खाक झाले. यामुळे परिसरातील इमारतींना आणि वाहनांना देखील मोठे नुकसान झाले.
प्राथमिक तपासानुसार, विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड किंवा विमानाचा मागील भाग इमारतीला धडकल्याने हा अपघात घडला असावा, असे सांगितले जात आहे. काही अहवालांनुसार, दोन पक्ष्यांमुळेही हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासासाठी पाठवण्यात आला असून, यामुळे अपघाताचे नेमके कारण समोर येईल.
हे ही वाचा>> Vijay Rupani: 2024 साली देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात विजय रुपाणींनी बजावलेली मोलाची भूमिका
विमानात एकूण 242 जण होते, ज्यामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सचा समावेश होता.
- 169 भारतीय नागरिक
- 53 ब्रिटिश नागरिक
- 7 पोर्तुगीज नागरिक
- 1 कॅनेडियन नागरिक
- याशिवाय, 2 नवजात बालके आणि 11 लहान मुलांचा देखील समावेश होता.
या अपघाताने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. कारण या अपघातग्रस्त विमानात दोन्ही पायलट आणि 4 क्रू मेंबर्स आणि 6 प्रवासी हे महाराष्ट्रातील आहेत.
दरम्यान, अपघातानंतर तातडीने अग्निशमन दल, आपत्कालीन पथके आणि वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहमंत्री हर्ष संघवी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.
एअर इंडियाने प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाइन नंबर 18005691444 आणि अहमदाबाद विमानतळासाठी +919974111327 जारी केले आहेत.