कोल्हापुरात थरार! भरधाव कंटेनरची तीन दुचाकींना धडक, चौघांचा जागीच मृत्यू
कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली. अनियंत्रित कंटेनरने तीन दुचाकींना धडक दिली. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कोल्हापुरात थरार
भरधाव कंटेनरची तीन दुचाकींना धडक
चौघांचा जागीच मृत्यू
Kolhapur Accident News, दीपक सूर्यवंशी : कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिरोळ तालुक्यातील तेरवाड वजनकाट्याजवळ एका भरधाव कंटेनरमुळे घडलेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हेरवाडहून कुरुंदवाडच्या दिशेने जाणाऱ्या या कंटेनरने तब्बल तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. या थरारक अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
अनियंत्रित कंटेनर अन् तीन दुचाकींना धडक
अपघाताची सुरुवात तेरवाड वजनकाट्याजवळ झाली, जिथे अनियंत्रित कंटेनरने पहिल्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत तेरवाड-गंगापूर येथील 42 वर्षीय मंगल सदाशिव पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेल्या ललिता गणपती पाटील गंभीर जखमी झाल्या. या दुचाकीचे चालक बाहुबली चौगुले मात्र नशीब बळकट म्हणून थोडक्यात बचावले.
हे ही वाचा : मुंबई : IIT पवई कॅम्पसमध्ये रात्री आगीचा भडका! दोन चिमुकल्यासंह पाचजण होरपळले
चौघांचा दुर्दैवी मृत्यू
पहिल्या अपघातानंतरही कंटेनरचा वेग कमी झाला नाही आणि पुढे जाऊन त्याने आणखी दोन दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिली. यात अब्दुललाट येथील भाऊसो जयपाल गिरमल (वय 50) आणि त्यांच्या पत्नी अश्विनी भाऊसो गिरमल (वय 42) या दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. तर तिसऱ्या धडकेत अर्जुनवाड येथील शकील अन्वर मुल्ला (वय 35) यांचा जीव गेला. त्यांच्या दुचाकीवरील दादासो कानडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा : भाजपचे आरोप ते आंदोलनाचा चेहरा...विवेकानंद पाटीलचा थेट पलटवार
कंटेनर थांबला कसा?
तीन दुचाकींना उडवल्यानंतर तो भरधाव कंटेनर रस्त्याकडेला असलेल्या नारळाच्या झाडावर आदळला आणि थेट शेतात जाऊन थांबला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून फरार कंटेनर चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.
