अतिरेकी धमक्यांना न जुमानता काश्मीरमध्ये साजरा होणार गणेशोत्सव
Terror groups have reportedly threatened Ganeshotsav organisers in Kashmir with death if they celebrate the festival. Defying the threats, Kashmir-based activists will celebrate Ganeshotsav, with idols of Pune's Manacha Ganpati handed over to them.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मूर्ती प्रदान
सलग पाचव्या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळांचा पुढाकार
पुणे: काश्मीर खोऱ्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांना यंदा अतिरेकी संघटनांकडून उत्सव साजरा केल्यास जीवे मारण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. मात्र, या धमकीला न जुमानता काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी यंदाही धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मूर्ती काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे विधिवत पूजा करून सुपूर्द करण्यात आल्या. पुण्यातील युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळांनी सलग पाचव्या वर्षी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
तब्बल 34 वर्षे बंद असलेल्या काश्मीरमधील लाल चौकात 2022 पासून सार्वजनिक गणेशोत्सवाला पुन्हा सुरुवात झाली. त्यानंतर गेली तीन वर्षे काश्मीर खोऱ्यातील विविध ठिकाणी उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यंदा या उत्सवाला आणखी व्यापक स्वरूप देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
हे ही वाचा>> Lalbaugcha Raja 2026 First Look: ही पाहा लालबागच्या राजाची पहिली झलक, यंदा नेमकी कोणती थीम?
यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुण्यातील मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम यांच्या मूर्ती विधिवत पूजा करून काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. या मूर्ती स्वीकारण्यासाठी काश्मीरमधील गणेश मंडळांचे मोहित भान, रिषभ चाकू, शिशंत चाकू, संदीप रैना, संजीव रैना, हितेश रैना आणि संदीप कौल हे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम, गुरुजी तालीम मंडळाचे प्रविण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार आणि अखिल मंडई मंडळाचे सूरज थोरात आदी उपस्थित होते.
