वेदर रिपोर्ट : चक्रीवादळ अक्वान धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार ?
Maharashtra Weather Cyclone Akvan : बंगालच्या उपसागरात तयार झालेले अक्वान चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 20 नोव्हेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील हवामानावर काय परिणाम होणार, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वेदर रिपोर्ट : चक्रीवादळ अक्वान धडकणार
महाराष्ट्रावर काय परिणाम होणार ?
Maharashtra Weather Cyclone Akvan : बंगालच्या उपसागरात तयार झालेले अक्वान चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ 19 नोव्हेंबरपर्यंत अतितीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 20 नोव्हेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर नेल्लोर आणि तुनीदरम्यान ते धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी 120 ते 130 किलोमीटर, तर वाऱ्यांच्या झोतांचा वेग ताशी 145 किलोमीटरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. गेल्या महिन्याभरात बंगालच्या उपसागरात तीन चक्रीवादळे तयार झाली असून, त्यापैकी काहींचा परिणाम महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील विविध राज्यांवर झाला होता. आता अक्वान चक्रीवादळामुळे कोणत्या भागात पाऊस पडणार आणि महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : बीड : 'तो' संशय अन् दोन मित्रांना ट्रॅक्टरला बांधून अमानुष मारहाण, एकाचा मृत्यू
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अक्वान चक्रीवादळाचा परिणाम आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये जाणवण्याची शक्यता आहे. मात्र, महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा सध्या तरी फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रासाठी पुढील तीन दिवस कोणताही हवामान अलर्ट देण्यात आलेला नाही. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या हवामान प्रणालींचा परिणाम प्रामुख्याने विदर्भात जाणवतो. त्याशिवाय मराठवाड्यातील काही भागांमध्येही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अक्वान चक्रीवादळाची दिशा आणि किनारपट्टीवर धडकल्यानंतर त्याची स्थिती कशी राहते, यावर महाराष्ट्रातील पुढील हवामानाचा अंदाज अवलंबून असेल.
हेही वाचा : कीर्तनकार दौलत महाराज सातपुतेंचा मोबाईल विहिरीत सापडला, मृत्यूचं गूढ वाढलं!
विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता
महाराष्ट्रातील पावसाच्या शक्यतेबाबत बोलायचे झाल्यास, विदर्भात 19 ते 21 नोव्हेंबरदरम्यान काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः पूर्व विदर्भात 21 नोव्हेंबरला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडू शकतो. मात्र, मुंबई आणि कोकणात अक्वान चक्रीवादळाचा थेट परिणाम होण्याची शक्यता सध्या नाही. राज्यातील बहुतांश भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे नागरिकांना सध्या तरी पावसाबाबत चिंता करण्याचे कारण नसले, तरी चक्रीवादळाच्या पुढील स्थितीवर हवामान विभागाचे लक्ष राहणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील तापमानात सध्या दिवस आणि रात्रीच्या वेळी फरक जाणवत आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी तापमानात घट होत असून, दुपारच्या वेळी मात्र उष्णता कायम आहे. दुपारचे तापमान साधारण 32 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. दुसरीकडे, रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसची घट पाहायला मिळत आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात अशाच प्रकारचे हवामान राहण्याचा अंदाज आहे. सध्या राज्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यताही नाही. एखादी पोषक हवामान प्रणाली किंवा पश्चिमी विक्षोभ तयार झाल्यानंतरच हवामानात मोठा बदल होऊ शकतो. अक्वान चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर त्याची दिशा आणि तीव्रता लक्षात घेऊन महाराष्ट्रातील हवामानाचा पुढील अंदाज स्पष्ट होईल.
