चक्रीवादळ तयार होणार की नाही? पाऊस कुठले भाग झोडपणार?
महाराष्ट्राच्या हवामानात सध्या कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित हवामान प्रणालींचा प्रभाव दिसत आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा महाराष्ट्रावर नेमका परिणाम काय? पाऊस कुठल्या भागांना झोडपणार आणि कुठे जोरदार वाऱ्याचा धोका आहे?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चक्रीवादळ तयार होणार की नाही?
हवामान अंदाज काय?
Maharashtra Weather : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर 'डीप डिप्रेशन'मध्ये (तीव्र कमी दाबाचे क्षेत्र) झाले असून, सुरुवातीला याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन त्याला 'अर्णब' असे नाव दिले जाईल असा अंदाज होता. मात्र, तसे घडले नाही. सध्या हे डीप डिप्रेशन वायव्य दिशेने सरकत ओडिशामार्गे छत्तीसगडमध्ये पोहोचले आहे. ओडिशामध्ये या प्रणालीमुळे अतिमुसळधार पाऊस झाला असून, सध्या हे रायपूर आणि दक्षिण छत्तीसगडच्या परिसरात ताशी 15 किलोमीटर वेगाने उत्तर-वायव्य दिशेने पुढे सरकत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील 12 तास याची तीव्रता कायम राहील आणि त्यानंतर ते कमकुवत होऊन त्याचे पुन्हा साध्या कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होईल.
कुठे बरसणार वरुणराजा?
या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रातही बदलाचे वारे पाहायला मिळत असून, विदर्भात मोठ्या प्रमाणावर बाष्प खेचले गेल्याने ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारच्या (26 सप्टेंबर) हवामान अंदाजाचा विचार केल्यास जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त पुणे, सातारा आणि कोल्हापूरचा घाटमाथा तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात ढगाळ वातावरणासह वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हे ही वाचा : Personal Finance: बजेटिंग App वापरल्याने खरंच बचत वाढते का?
पश्चिम महाराष्ट्राला दिलासा मिळणार?
रविवारच्या हवामानाचा विचार केल्यास, राज्यात कुठेही मोठा इशारा (अलर्ट) देण्यात आलेला नाही. मात्र, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहून मेघगर्जनेसह अत्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. सोमवारसाठी मात्र पुन्हा काही भागांत 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने पुण्याचा घाट परिसर, साताऱ्याचा घाट परिसर, सांगली, कोल्हापूर आणि कोल्हापूरचा घाटमाथा यांचा समावेश असून, या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे ही वाचा : "माझ्या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न, मी त्यांच्याप्रमाणे पक्ष बदलणार नाही", स्वीडनमधून पुतणीचा विखेंना टोमणा
राज्यात कुठेही ऑरेंज अलर्ट नाही
दरम्यान, 25 सप्टेंबर रोजी या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला होता. मात्र, आता या हवामान प्रणालीची तीव्रता हळूहळू कमी होत असल्याने आगामी तीन दिवसांच्या अंदाजात राज्यात कुठेही 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आलेला नाही. सद्यस्थितीत राज्यावर मोठे संकट नसले तरी, ज्या भागात येलो अलर्ट दिला आहे तेथील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
