Manoj Jarange : ऐन निवडणुकीत शिंदे सरकारला अडचणीत आणणार, जरांगेंचा पुढचा प्लॅन काय?
Manoj Jarange Patil Latest News : विशेष अधिवेशनात राज्य सरकारने सगेसोयरे शब्दाबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही, त्यामुळे जरांगे पाटलांनी पुढील आंदोलन जाहीर केले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

'मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या'

मनोज जरांगे यांनी पुढील आदोलनाचा कार्यक्रम केला जाहीर

निवडणूक आयोगाला जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Patil Latest News : विशेष अधिवेशनामध्ये शिंदे सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर केले. सरकारने स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, पण मनोज जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षण घेण्याच्या मागणीवर ठाम आहे. आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारविरोधात एल्गार केला आहे. पुढे काय करणार याबद्दलचा कार्यक्रम जरांगे पाटलांनी सांगितला.
अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील आणि उपस्थितांची बैठक झाली. या बैठकीत जरांगे यांनी आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली.
जरांगे सरकारला उद्देशून म्हणाले, "काम करायचं नाहीत आणि म्हणायचं मराठे रस्त्यावर येतील. मराठ्यांना या १० टक्के आरक्षणाचं सोयरसुतक नाही. तुमच्या हट्टापायी गोरगरिबांच्या पोराचं नुकसान करू नका."
"ते आरक्षण अजून अधांतरी आहे. ते टिकवायचं असेल तर त्याची सुनावणी ओपन कोर्टात व्हायला हवी आहे. ते आरक्षण केवळ राज्यांतर्गत आहे तर ओबीसी च आरक्षण देशभरात आहे. जी जात मागास सिद्ध होईल तिला ओबीसीमध्ये घ्यायचं हा कायदा आहे. मग मराठा समाजाला बाहेर का ठेवलं?", असा प्रश्न जरांगेंनी उपस्थित केला.
आंदोलन कसं होणार?, जरांगेंनी सांगितला पुढचा कार्यक्रम
मराठा समाजाला मनोज जरांगेंनी पुढील कार्यक्रम सांगितला. ते म्हणाले, "सगेसोयरेची अंमलबजावणी सरकारने २ दिवसात करावी. नाहीतर २४ तारखेपासून आंदोलन सुरू करायचं. आपण आपली गावं सांभाळायची. प्रत्येकानं आपल्या गावात आंदोलन करायचं. प्रत्येकाने रस्ता रोको आपल्या गावात करायचं. आदर्श रस्ता रोको आंदोलन करायचं."