मुंबईची खबर : BEST ने मंजुरी दिलेला 28 हजार कोटींचा प्रकल्प नेमका काय आहे?
BEST ने आपल्या खालावलेल्या आर्थिक अवस्थेवर उपाय करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. PPP तत्त्वावर 28 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईची खबर
BEST ने तत्त्वत: मंजुरी दिली
28 हजार कोटींचा प्रकल्प नेमका काय आहे?
Mumbai News : बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन अर्थात बेस्टने 28,000 कोटी रुपयांच्या एका प्रकल्पाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. खालावलेल्या आर्थिक स्थितीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवार, 4 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या 'बेस्ट' समितीच्या बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला. आता हा प्रस्ताव अंतिम प्रशासकीय व कायदेशीर मंजुरीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि त्यानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळाकडे पाठवला जाणार आहे.
पीपीपी तत्त्वावर होणार उभारणी
या योजनेअंतर्गत 'बेस्ट'च्या एकूण 27 पैकी 22 बस आगारांचा सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर आणि 'डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेटर अँड ट्रान्सफर' (DBFOT) मॉडेलनुसार पुनर्विकास केला जाणार आहे. या प्रकल्पांची उभारणी खाजगी विकासकांमार्फत केली जाणार असली, तरी जमिनीची मूळ मालकी मात्र 'बेस्ट'कडेच कायम राहील. मुंबईभरात 'बेस्ट'च्या मालकीची सुमारे 7.7 लाख चौरस मीटर जमीन आहे. सध्या कुर्ला डेपोचा पुनर्विकास पूर्ण झाला असून, धारावी व कालाकिल्ला डेपो धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी, तर आणीक व प्रतीक्षा नगर डेपो मेट्रो-11 प्रकल्पासाठी वर्ग करण्यात आले आहेत.
हे ही वाचा : Shiv Sena सुनावणी: राजकीय पक्ष की विधिमंडळ पक्ष, सुप्रीम कोर्टात घमासान युक्तिवाद सुरू
काय आहे प्रकल्प?
या जुन्या आणि जीर्ण झालेल्या डेपोंचे रुपांतर एकात्मिक नागरी केंद्रांमध्ये (अर्बन हब्स) केले जाईल. या प्रकल्पात कर्मचाऱ्यांची घरे, सार्वजनिक पार्किंग, डिजिटल कमांड सेंटर्स, ई-बस चार्जिंग स्टेशन, आधुनिक वर्कशॉप्स तसेच शिक्षण आणि आरोग्यविषयक नागरी सुविधांचा समावेश असेल. या पुनर्विकासाच्या माध्यमातून डेव्हलपर प्रीमियम आणि व्यावसायिक हक्कांच्या विक्रीतून 'बेस्ट'ला मोठा महसूल मिळणे अपेक्षित आहे.
हे ही वाचा : पुणे मेट्रो : 254 मालमत्ता, शेकडो कोटींची मालमत्ता आणि ACB चिडीचूप
5,000 नव्या बसेस खरेदी केल्या जाणार
या निधीचा उपयोग 'बेस्ट'च्या स्वतःच्या मालकीच्या 5,000 नव्या बसेस खरेदी करण्यासाठी, प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेली देणी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत भत्ते भागवण्यासाठी तसेच उपक्रमाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी केला जाईल. "हा उपक्रम केवळ जमिनीचा पुनर्विकास नसून 'बेस्ट'चा संपूर्ण कायापालट करण्यासाठी डिझाइन केला आहे," असे 'बेस्ट'च्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी सांगितले.
