पुणे मेट्रो : 254 मालमत्ता, शेकडो कोटींची मालमत्ता आणि ACB चिडीचूप

मुंबई तक

pune metro : पुण्यातील एका वादानंतर माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांच्या कथित मालमत्तांबाबत नव्याने प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आरटीआय कार्यकर्ते सुधीर आल्हांड यांनी एसीबीकडे केलेल्या तक्रारींचा आणि चौकशीच्या मागणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

ADVERTISEMENT

pune metro
pune metro
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुणे मेट्रो : 254 मालमत्ता, शेकडो कोटींची मालमत्ता आणि ACB चिडीचूप

पुण्यातील एका वादानंतर माजी  पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांच्या कथित मालमत्तांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात आरटीआय कार्यकर्ते आणि भाजपचे माजी पदाधिकारी सुधीर रामचंद्र आल्हांड यांनी केलेल्या आरोपांमुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. आल्हांड यांनी सांगितले की, 2016 पासून त्यांनी भानुप्रताप बर्गे यांच्या कथित मालमत्तांबाबत अँटी करप्शन ब्युरो (एसीबी)कडे अनेक तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, बर्गे यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी होणे आवश्यक असून त्यासाठी त्यांनी विविध कागदपत्रे आणि माहिती अधिकारातून मिळवलेले दस्तऐवज संबंधित यंत्रणांकडे सादर केले आहेत. या सर्व आरोपांची अधिकृत चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

चौकशी प्रक्रियेत अनेक महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप

आल्हांड यांच्या दाव्यानुसार, 2016 मध्ये त्यांनी केलेल्या तक्रारीच्या वेळी भानुप्रताप बर्गे यांना सेवाकाळात मिळालेल्या वेतनाच्या तुलनेत त्यांच्या नावावर आणि कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे मूल्य अधिक असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, एसीबीने त्यावेळी गोपनीय चौकशी केली आणि त्याचा अहवाल तयार झाला. मात्र त्यानंतर खुली चौकशी (ओपन इन्क्वायरी) सुरू करण्यात आली नाही. याबाबत त्यांनी सातत्याने पत्रव्यवहार केला असून संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली आहे. चौकशी प्रक्रियेत अनेक महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

'सर्व मालमत्तांची सखोल चौकशी करून उत्पन्नाचे स्रोत तपासले जावेत'

आल्हांड यांनी पुढे दावा केला की, 2024 मध्ये त्यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार भानुप्रताप बर्गे यांच्याशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या 254 मालमत्तांचा तपशील एसीबीकडे सादर केला आहे. या सर्व मालमत्तांची सखोल चौकशी करून त्यांचे उत्पन्नाचे स्रोत तपासले जावेत, अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्तरावरून खुल्या चौकशीसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र दोन वर्षांनंतरही त्याला अंतिम मंजुरी मिळालेली नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच विविध ठिकाणी असलेल्या सदनिका, दुकाने, जमिनी आणि इतर मालमत्तांबाबत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणात करण्यात आलेले आरोप हे सुधीर आल्हांड यांनी केलेले दावे असून त्याबाबत कोणताही अधिकृत निष्कर्ष किंवा दोष सिद्ध झालेला नाही. संबंधित यंत्रणांनी या आरोपांवर अंतिम भूमिका जाहीर केलेली नाही. आल्हांड यांनी मात्र एसीबी, आयकर विभाग, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) तसेच इतर सक्षम संस्थांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या मालमत्तेचा स्रोत, उत्पन्न आणि संपत्ती यांचा पारदर्शक तपास झाला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. या प्रकरणात संबंधित तपास यंत्रणा पुढे काय भूमिका घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे.