“सध्याचा रावणही अजिंक्य नाहीये”, संजय राऊतांचं नाशिकमध्ये घणाघाती भाषण
रामाचा रावणही अजिंक्य नव्हता. आताचा रावणही अजिंक्य नाहीये, असे म्हणत संजय राऊतांनी राज्यव्यापी मेळाव्यात घणाघाती भाषण केलं. काय म्हणाले संजय राऊत?
ADVERTISEMENT

Sanjay Raut : ‘रामाचा संयम बघा, जो मी नेहमी उद्धवजींमध्ये बघतो’, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यव्यापी मेळाव्यात सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर घणाघात केला. (MP Sanjay Raut Speech in Shiv Sena UBT Melava At Nashik)
नाशिक येथे शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनात बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. “प्रभू रामाशी आपलं जुनं नातं आहे. शिवसेनेचं अत्यंत जिव्हाळ्याचं, भावनिक नातं आहे. ते फक्त एखाद्या व्यक्तीचं किंवा क्षाचं असतं असं नव्हे. शिवसेनेचे वाघ नसते, तर… शिवसेना नसती, तर काल प्रभू श्रीरामांची अयोध्येत प्राणप्रतिष्ठाच होऊ शकली नसती. शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले, धैर्य आणि शौर्य दाखवलं आणि म्हणून देशाच्या पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा करता आली”, असे म्हणत राऊतांनी भाजपला प्रत्युत्तर दिले.
उद्धव ठाकरेंनी पुण्यभूमीची निवड केली -संजय राऊत
“लोक म्हणतात शिवसेनेचा रामाशी संबंध काय? समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे… ते शिवसेनेच्या बाबतीतच सांगितलेलं आहे. ‘आम्ही काय कुणाचे खातो, तो श्रीराम आम्हाला देतो’. तो राम आम्हाला देतो. आमचा राम बाळासाहेब ठाकरे असतील, काळाराम असेल, आमचा अयोध्येचा राम असेल. ज्या ठिकाणी हे अधिवेशन होतंय. जो राम अयोध्येतील, तोच या पंचवटीतील आहे. प्रभू श्रीरामांच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष कुठे झाला असेल, तर तो नाशिकमधील पंचवटीत झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अधिवेशनासाठी या पुण्यभूमीची निवड केली, त्याला मोठं महत्त्व आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >> छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास सांगणारे गोविंदगिरी महाराज कोण?
“किती अवघड प्रसंग रामाच्या आयुष्यात आला. राज्याभिषेकाची तयारी सुरू होती. तितक्यात सूचना येते की, श्रीरामा राज्याभिषेक नाही. आपण आता वनवासाला चला. पुढील १४ वर्षे आपल्याला असं जीवन जगायचं आहे. आपण राजपूत्र असून, वनवासात जावं लागतंय. पण, रामाचा संयम बघा, जो मी नेहमी उद्धवजींमध्ये बघतो. सीता-लक्ष्मणासह वनवासाला जावं लागतंय म्हणून तो निराश आणि दुःखी नाहीये, हाच तो संयमी राम”, अशा भावना संजय राऊतांनी व्यक्त केल्या.