Manoj Jarange : ‘नागपूरच्या कोतवालाकडे जरांगेंचे प्राण…’, फडणवीसांवर सेनेचा UBT घणाघात
Shiv Sena UBT vs Devendra Fadnavsi : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. यावरूनच ठाकरेंच्या शिवसेनेने देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र डागलं आहे.
ADVERTISEMENT

Saamana Editorial on Maratha Reservation and Manoj Jarange patil Hunger Strike : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने देवेंद्र फडणवीसांवर टीकेची तोफ डागलीये. फडणवीसांचा नागपूरचा कोतवाल असा उल्लेख करत सेनेने (युबीटी) मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणावरून हल्ला चढवला आहे. देवेंद्र फडणवीसांनी ब्राह्मण असल्याबद्दल केलेल्या विधानावरून सामना अग्रलेखातून पलटवार करण्यात आला आहे. (Shiv Sena UBT Attacked Devendra Fadnavis over Maratha reservation issue)
‘फडणवीस, शिंद्यांसाठी तोडगा आहे; मराठय़ांसाठी नाही!’, या मथळ्याखालील अग्रलेखातून फडणवीसांना घेरण्यात आलंय. भाजपकडून मी पुन्हा येईन व्हिडीओ टाकण्यात आला होता. त्यावर बोट ठेवत ठाकरेंच्या सेनेने म्हटलं आहे की, “महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र होत असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी समाज माध्यमांवर ‘मी पुन्हा येईन’चा व्हिडीओ टाकून खळबळ उडवली. उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनावरून लक्ष उडविण्याचा हा डाव असावा. फडणवीस आता सारवासारवी करतात की, ‘पुन्हा येईनचा व्हिडीओ टाकून मी परत कशाला येऊ?’ फडणवीस यांचे विधान हास्यास्पद व राजकारण पोरकटपणाचे आहे. त्यांच्या मनातली उबळ वारंवार वर येत आहे.”
“फडणवीसांकडे सेटलमेंटचे दुकान”
“राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न भडकला आहे व सरकार सैरभैर झाले आहे. राज्याच्या अनेक मंत्र्यांच्या कार्यक्रमांत गोंधळ घातला जात आहे. आतापर्यंत चार जणांनी आत्महत्या केल्या, पण सरकारला मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा सापडत नाही. फडणवीस यांच्याकडे तोडगा व सेटलमेंटचे दुकान आहे. एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवले तर लगेच त्यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचे मुख्यमंत्रीपद वाचवू, असा तोडगा त्यांनी दिला”, असा टोला फडणवीसांना लगावला आहे.
हे ही वाचा >> अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत? देवेंद्र फडणवीसांनी नेमंक ते सांगितलं
“फडणवीसांचे डोके नाना फडणवीसांचे असेल असे वाटले होते, पण ते पुण्याच्या तत्कालीन कारस्थानी कोतवालाचे दिसते. शिंदे यांना विधान परिषदेवर आणून मुख्यमंत्रीपदी टिकवले जाईल, पण अपात्र ठरणाऱ्या इतर मंत्री व आमदारांना कसे टिकवणार? फडणवीस शिंदे यांना टिकवणारा तोडगा देत आहेत, पण मराठा आंदोलनकर्त्यांचा जीव वाचविणारा तोडगा देत नाहीत. राज्यातील बेकायदेशीर मिंधे सरकार टिकवणे ही त्यांची प्राथमिकता आहे. मराठ्यांची गरीब पोरे उपोषणान मेली तरी चालतील, असाच एकंदरीत कावा दिसतोय”, असं टीकास्त्र ठाकरेंच्या सेनेने फडणवीसांवर डागलं आहे.