शरद पवार गटाने सुनेत्राताईंचं नेतृत्व स्वीकारुन विलिनीकरण करावं; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
Dharmaraobaba Atram on NCP merger : "दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर नेतृत्व सुनेत्राताईंकडेच राहिलं. त्यांच्या नेतृत्वातचं पुढे आपल्याला लढायचं आहे. ते विलीन होत असतील तरच पुढच्या गोष्टी आहेत. सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य करुनच हे विलीनीकरण व्हायला हवं. आमच्यासोबत यायचं असेल तर एनडीएसोबत गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे सुनेत्राताईंचं नेतृत्व मान्य करावं लागेल", असं माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शरद पवार गटाने सुनेत्राताईंचं नेतृत्व स्वीकारुन विलिनीकरण करावं
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
Dharmaraobaba Atram on NCP merger : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीतील विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा राज्याच्या राजकारणात तापू लागलाय. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं, अशी अजितदादांची इच्छा होती; असं मत खासदार शरद पवारांसह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी मांडलंय. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलीनीकरणाबाबत अशी कोणतीही चर्चा झाली, अशी भूमिका घेतलीये. दरम्यान, याबाबत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मोठं वक्तव्य केलंय. ते 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
हेही वाचा : आईच्या प्रियकराला भर रस्त्यात भोसकलं; छातीवर पाय ठेऊन पोलिसांना फोन, तरुणानं कशाचा बदला घेतला?
धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, अजितदादांसोबत आमची विलीनीकरणाची चर्चा झाली नव्हती. आम्ही 1990 पासून सोबत आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांच्या सोबत होतो. विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. महानगरपालिकांमध्ये एकत्रित होऊन ते लढले. जिथे शक्य असेल तिथे ते त्यापद्धतीने लढले. निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर अॅडजेस्ट होऊन राष्ट्रवादीसोबत लढावं, असा त्यांचा विचार होता. मी राष्ट्रीय अध्यक्ष राहत नाही, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिलेली आहे. अजिततदादा आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्यानंतर आता सुनेत्राताई राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजेत, असं आमचं मत आहे. आमचा पक्ष मजबूतीने पुढे चाललेला आहे.
"शरद पवार गटाने सुनेत्राताईंचं नेतृत्व स्वीकारुन विलिनीकरण करावं"
पुढे बोलताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी अगोदरच एकत्र आल्या असतं तर बरं झालं असतं. म्हणजे दादा असताना... पूर्वीही मी म्हणालो होतो विकासासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत. पार्टी वाढू शकते, पार्टी मजबूत होऊ शकते, त्यादृष्टीने सर्वांनी एकत्रित येऊन पुढे गेलं पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर नेतृत्व सुनेत्राताईंकडेच राहिलं. त्यांच्या नेतृत्वातचं पुढे आपल्याला लढायचं आहे. ते विलीन होत असतील तरच पुढच्या गोष्टी आहेत. सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य करुनच हे विलीनीकरण व्हायला हवं. आमच्यासोबत यायचं असेल तर एनडीएसोबत गेलं पाहिजे. त्याचप्रमाणे सुनेत्राताईंचं नेतृत्व मान्य करावं लागेल.










