आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?
आप्पासाहेब धर्माधिकारांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पण याच कार्यक्रमात 12 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि श्री समर्थ बैठक याविषयी बरीच चर्चा सुरु झाली आहे. तर आपणही जाणून घेऊया याविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT

मुंबई: ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikar) यांना मानाचा महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. लाखो श्रीसेवकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उष्माघातामुळे श्रीसेवकांचा मृत्यू झाल्यानं या कार्यक्रमाला गालबोटही लागलं. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात हे अनुयायी आप्पासाहेब धर्माधिकारींना का मानतात? आप्पासाहेब धर्माधिकारी कोण आहेत? त्यांचं कार्य काय? हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. (what is shree samarth baithak of appasaheb dharmadhikari why millions of shree sevaks believe him)
कोण आहेत आप्पासाहेब धर्माधिकारी? त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय?
आप्पासाहेब धर्माधिकारी ज्येष्ठ निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांचे पुत्र आहेत. कै. नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1943 साली श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीची स्थापना केली. या माध्यमातून श्रीसमर्थ बैठकांना सुरुवात झाली. मुंबईतील गोरेगावला पहिली बैठक पार पडली. नानासाहेबांनी रामदास स्वामींच्या दासबोधाचं सोप्या शब्दांत निरुपण करायला सुरुवात केली. यातून श्रीसेवकांचं प्रबोधन होऊ लागलं. नानासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषणसह अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला.
नानासाहेबांचा हाच वारसा आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुढे नेला आणि त्याची व्याप्तीही वाढवली. अप्पासाहेबांनी रेवदंडा येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले. वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान, विहिरी पुनर्भरण, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, व्यसनमुक्ती अभियान, बालसंस्कार वर्ग, शैक्षणिक साहित्य वाटप या उपक्रमांद्वारे लाखो श्रीसेवक आप्पासाहेबांच्या कार्याशी जोडले गेले. पर्यावरण, पाणी, आरोग्य, स्वच्छता, आरोग्य, रोजगार अशा प्रत्येक क्षेत्राशी निगडीत कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून आखले जातात आणि त्या माध्यमातून श्रीसेवकांना मार्गदर्शन केलं जातं.