Zakir naik : इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनमधील कर्मचाऱ्याची निर्दोष मुक्तता, काय होते प्रकरण?

तरुणांची दिशाभूल करून त्यांना इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप
Zakir naik : इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनमधील कर्मचाऱ्याची निर्दोष मुक्तता, काय होते प्रकरण?

मुंबई : इस्लामी उपदेशक झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनमधील कर्मचारी अर्शी कुरेशी याची विषेश एनआयए न्यायालयाने सबळ पुराव्यांआभावी निर्दोष मुक्तता केली. अर्शी कुरेशीवर 2016 मध्ये तरुणांची दिशाभूल करून त्यांना इस्लामिक स्टेट (IS) या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप करण्यात आला होता. एनआयएने त्याच्यावर बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केला होता.

शुक्रवारी कुरेशीला तळोजा कारागृहातून न्यायालयात हजर करण्यात आले, त्यावेळी विशेष एनआयए न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी कुरेशीची सर्व आरोपातून मुक्तता केली. कोणत्याही गुन्ह्यात किंवा खटल्यात आवश्यक नसल्यास तात्काळ सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र त्याचवेळी 30 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर या प्रकरणी अपील दाखल केले जाईल आणि नोटीस बजावली जाईल तेव्हा हजर राहण्याचे हमीपत्र देण्याचे निर्देशही कुरेशीला देण्यात आले.

अर्शी कुरेशीवर काय आरोप करण्यात आले होते?

अर्शी कुरेशीवर अशफाक मजीद आणि त्याच्या कुटुंबियांना टोकाच्या जिहादी विचारसरणीकडे प्रवृत्त केल्याचे आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप करण्यात आले होते. 2016 मध्ये अश्फाक, त्याची पत्नी आणि मुलगी बेपत्ता झाल्यानंतर अश्फाकच्या वडिलांनी मुंबई पोलिसांत कुरेशी आणि इतर दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कुरेशी, मौलाना हनीफ आणि रिझवान खान या तिघांना अटक केली होती. तर चौथा संशयित अब्दुल रशीद अब्दुल्ला उर्फ ​​राशी याला फरार घोषित करण्यात आले होते. मात्र, मौलाना आणि रिझवानवर आरोपपत्र दाखल करण्यात आले नव्हते. 2017 मध्ये एनआयएने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आणि अश्फाक मुंबईत असताना कुरेशीच्या संपर्कात आला असल्याचा दावा केला.

त्यानंतर एनआयएने त्याच्यावर बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान एनआयएने 57 साक्षीदारांची साक्ष नोंदविली होती. त्यातील 8 साक्षीदार फितूर झाले. जमियत उलामा हिंदच्या वतीने कुरेशीची बाजू मांडणाऱ्या अॅड. टी पठाण आणि आय खान यांनी कुरेशीने तरुणांवर प्रभाव टाकला होता किंवा ते आयएसमध्ये सामील झाले होते हे दाखवण्यासाठी कोणतेही पुरावे सादर केले नसल्याचा युक्तिवाद केला.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in