‘पैशांचा पाऊस पडेल', असं सांगितलं अन्... भुरट्या टोळीकडून 92 लाखांच्या नोटा जप्त
अहिल्यानगरमध्ये ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

रोहित वाळके, अहिल्यानगर: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी बारामतीतील तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल 92 लाख 9 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याशिवाय मोबाइल फोन, कार आणि बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
500 रुपयांच्या 18 हजार 419 बनावट नोटा
पोलिसांच्या माहितीनुसार, या कारवाईत 500 रुपयांच्या 18 हजार 419 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटांची एकूण दर्शनी किंमत 92 लाख 9 हजार 500 रुपये आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला गणेश शेवाळे हा आपल्या साथीदारांसह बनावट नोटा वापरण्याच्या उद्देशाने जवळ बाळगत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित ठिकाणी छापा टाकला.
पायऱ्यांखाली सापडली बनावट नोटांची बॅग
पोलिसांनी ठिकाणाची झडती घेतली असता पायऱ्यांच्या खाली ठेवलेल्या एका पिशवीत बनावट नोटा आढळून आल्या. याशिवाय बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे कोऱ्या कागदाचे बंडलही पोलिसांच्या हाती लागले.
