दिवसभर वीटभट्टीवर काम अन् रात्री मालकाच्या वासनेची शिकार, पोटासाठी राबणाऱ्या अल्पवयीन मुलींची पोलिसांनी कशी केली सुटका?
एक वीटभट्टी मालक त्याच्या भट्टीवर काम करणाऱ्या अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करत असे. बंदुकीच्या धाकावर गेल्या अनेक वर्षांपासून तो हे अत्याचार करत होता. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर चांगलीच खळबळ माजली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दिवसभर वीटभट्टीवर काम अन् रात्री मालकाच्या वासनेची शिकार
पोटासाठी राबणाऱ्या अल्पवयीन मुलींची पोलिसांनी कशी केली सुटका?
Crime News : वीटभट्टीवर काम करणाऱ्या अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण व महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका वीटभट्टी मालकाला अटक करण्यात आली आहे. हा नराधम बंदूक दाखवून भीती घालत असे आणि कामावर असणाऱ्या अल्पवयीन मुलींना रात्रीच्या वेळी बळजबरीने दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्यांच्यावर अत्याचार करत असे. या भीषण प्रकाराची वाच्यता कोणी करू नये म्हणून त्याने मजुरांमध्ये दहशत निर्माण केली होती. नुकताच त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो सोफ्यावर बसून सिगरेट ओढत एका मुलीचा नाच बघत असल्याचे दिसून येत आहे, पोलीस सध्या या व्हिडिओची सखोल चौकशी करत आहेत. बिहारच्या सहरसा परिसरातील ही घटना आहे.
'असं' बाहेर आलं प्रकरण
चुन्ना मुखिया असं या वीटभट्टी मालकाचं नाव आहे. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा एका गोळीबाराच्या घटनेनंतर झाला. शनिवारी (28 मार्च) रात्री एका महिला मजुराने मालकाच्या गैरवर्तनाचा विरोध केला असता, त्याने रागाच्या भरात गोळी चालवली, ज्यामध्ये ती महिला गंभीर जखमी झाली. पोलिसांनी जेव्हा घटनास्थळाची पाहणी केली, तेव्हा मजुरांच्या राहत्या खोलीच्या छतावर गोळीबाराचे अनेक छिद्र दिसून आले. पोलिसांना पाहताच मजुरांना धीर आला आणि त्यांनी मालकाच्या अत्याचारांचा पाढा वाचला. मागील सहा वर्षांपासून तिथे काम करणाऱ्या मजुरांनी सांगितले की, सुरुवातीला सर्व ठीक होते, परंतु हळूहळू चालकाने आपला खरा चेहरा दाखवत महिलांशी छेडछाड आणि अल्पवयीन मुलींचे शोषण करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा : कल्याण : 7 पिस्तूल, 370 जिवंत काडतुसे, तलवार आणि चॉपर्स.. 'या' प्रसिद्ध रीलस्टारच्या घरात सापडला अवैध शस्त्रसाठा
वीटभट्टी मालक आहे सराईत गुन्हेगार
पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत या वीटभट्टीवरून सात अल्पवयीन मुलींची सुटका केली असून त्यांची वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशन केल्यानंतर त्यांना बाल कल्याण समितीसमोर हजर केले आहे. जखमी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी चुन्ना मुखिया आणि त्याचा सहकारी अमित कुमार यांच्यावर महिला ठाण्यात पॉक्सो कायदा आणि सदर ठाण्यात आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपासात असे समोर आले आहे की, चुन्ना मुखिया हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 1995 पासून आतापर्यंत हत्या, लूटमार आणि पोलिसांवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यासारखे तब्बल 33 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
हे ही वाचा : अशोक खरातच्या अश्लील Video मुळे 'ती' भीती... पीडितेच्या कुटुंबीयांना मागितलं Work from Home
मजूरांना घरी पोहोचवणार पोलिस
या घटनेनंतर वीटभट्टीवर काम करणाऱ्या पुरुष आणि महिला मजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून त्यांनी प्रशासनाकडे आपापल्या घरी परतण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, सर्व मजुरांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवण्याची तयारी पोलीस प्रशासनाकडून केली जात आहे. दरम्यान, या गुन्ह्यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे आणि या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध पैलूंवर अधिक तपास करत आहेत. सहरसा परिसरात या कारवाईमुळे मोठी खळबळ माजली आहे.









