"तिने घरातच...", गौरीची हत्या करणाऱ्या राकेशने शेजाऱ्यांना सांगितलं भलतंच, अन् पोलीस...
मूळचा पुण्यातील असलेल्या राकेश खेडकर याने आपल्या पत्नीच्या हत्येनंतर बंगळुरुमधील शेजाऱ्यांना खोटी माहिती दिल्याचं आता समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बंगळुरू: पुण्यातील एका व्यक्तीने बंगळुरूमध्ये आपल्या पत्नीच्या हत्या केल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. पण आता या प्रकरणातील वेगवेगळी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. राकेश खेडकर (वय 36 वर्ष) याने पत्नी गौरी सांब्रेकर (वय 32 वर्ष) हिच्या त्रासाला कंटाळून तिची निर्घृण हत्या केली. पण हत्येनंतर राकेशने भाडेकरू असलेल्या शेजाऱ्यांना खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
राकेश राजेंद्र खेडेकर असे या आरोपीचे नाव असून, त्याने आपली पत्नी गौरी अनिल सांब्रेकर हिचा 26 मार्चच्या रात्री खून केला. या घटनेनंतर राकेशने भाडेकरूंना सांगितले की, गौरीने आत्महत्या केली आहे. मात्र, पोलिसांनी राकेशला पुण्याजवळील शिरवळ पोलीस स्टेशनजवळ अटक केली. जिथे त्याने आपणच पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली.
नेमकी घटना काय?
राकेश खेडेकर आणि गौरी सांब्रेकर हे जोडपे मागील एका महिन्यापासून बंगळुरूमध्ये राहत होते. राकेश हिताची सिस्टम्स इंडिया या कंपनीत सिनिअर प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होता. इथे तो वर्क-फ्रॉम-होम पद्धतीने काम करत होता. तर दुसरीकडे, गौरीने महाराष्ट्रातील एका खासगी कंपनीतील नोकरी सोडली होती आणि बंगळुरूमध्ये नवीन नोकरीच्या शोधात होती. मात्र, तिला योग्य नोकरी मिळत नव्हती, ज्यामुळे ती राकेशला आपल्या बेरोजगारीसाठी जबाबदार धरत होती. गौरीला महाराष्ट्रात परत यायचे होते, तर राकेशला बंगळुरूमध्येच राहायचे होते. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते.
हे ही वाचा>> "ती भांडायची, सर्कीटसारखी वागायची...", पत्नीला मारून सुटकेसमध्ये टाकणाऱ्या आरोपीचे वडील काय म्हणाले?
26 मार्चच्या रात्री राकेश आणि गौरी यांच्यात पुन्हा एकदा तीव्र वाद झाला. रात्रीच्या जेवणापूर्वी झालेल्या या भांडणात राकेशने गौरीला मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या गौरीने स्वयंपाकघरातील चाकू राकेशवर फेकला, ज्यामध्ये त्याला किरकोळ जखम झाली. पण याच गोष्टीचा राग डोक्यात ठेवून राकेशच्या त्याच चाकूने गौरीवर थेट हल्ला चढवला.
