जालना : मामाच्या गावी गेला अन् रात्री रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह, 20 वर्षीय तरुणासोबत काय घडलं?
जालना जिल्ह्यात खूनाची एक भयंकर घटना घडली आहे. एका 20 वर्षीय तरुणाची धारधार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली आहे. तो तरुण कामानिमित्त मामाकडे गेला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जालन्यात तरुणाची हत्या
मामाच्या गावी गेला अन् घडलं भयंकर
Jalna Crime News,गौरव साळी : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात खूनाची एक भयंकर घटना घडली आहे. पांगरखेडा शिवारात एका 20 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मुस्तकीन शेख गफार असे मृत तरुणाचे नाव असून, तो जालना शहरातील शिषटेकडी परिसराचा रहिवासी होता. तो मागील दोन महिन्यांपासून आपल्या मामाच्या गावी मिस्त्रीकाम करण्यासाठी आला होता. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पांगरखेडा शिवारात त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शरीरावर धारदार शस्त्राने वार
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुस्तकीनच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र, या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून विविध बाजूंनी कसून तपास केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
हे ही वाचा : Marathwada Drought : दुष्काळाच्या भीषण झळा, अख्खं गाव झालं रिकामं
आरोपी कोण?
या प्रकरणी पोलिसांना संशयित आरोपींची नावे प्राप्त झाली असून, त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासातून हत्येचे सत्य लवकरच बाहेर येईल आणि मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : 'अंदाज चुकला..' गोकुळमधील पराभवानंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया
रुग्णालय व पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी
मुस्तकीनच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच जालना शहर आणि अंबड परिसरातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय व पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सर्व संशयितांना तात्काळ अटक करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.
