'अंदाज चुकला..' गोकुळमधील पराभवानंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

'गोकुळ'मधील पराभवावर चंद्रकांत पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "राजकारणात अंदाज चुकतात, आमचा ओव्हर कॉन्फिडन्स आम्हाला नडला," अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

Gokul Dudh Sangh Election
Gokul Dudh Sangh Election
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

गोकुळमध्ये महायुतीचा पराभव

point

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

Gokul Dudh Sangh Election : कोल्हापूरच्या प्रतिष्ठित 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीपूर्वी महायुतीला तब्बल 4,400 मते मिळतील आणि विरोधी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या पॅनेलला एकही जागा मिळणार नाही, असा दावा करणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अखेर गोकुळमधील पराभवावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीचा निकाल महायुतीच्या पूर्णपणे विरोधात गेला असून, बंटी पाटील यांच्या पॅनेलने 25 पैकी 13 जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत पटकावले आहे. या निकालाच्या 4 दिवसांनंतर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अंदाजातील चुकांचा प्रामाणिकपणे स्वीकार केला. "राजकारणात आणि वैयक्तिक जीवनातही अंदाज चुकतात; आमचा ओव्हर कॉन्फिडन्स आम्हाला नडला," अशी रोखठोक कबुली त्यांनी दिली.

नेमकं काय म्हणाले?

आपल्या वक्तव्याचे समर्थन करताना त्यांनी कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यातील उदाहरणे देत राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, जसे एखाद्या पालकाला आपल्या मुलाला वैद्यकीय प्रवेशासाठी (मेडिकल) चांगले गुण मिळतील असा विश्वास असतो, परंतु गुण कमी मिळाले तरी मुलावर रागवून त्याला टोकाचे पाऊल उचलू न देता पुन्हा नव्याने तयारी करायची असते, तशीच ही परिस्थिती आहे. साडेचार हजार कोटींचा टर्नओव्हर आणि लाखो शेतकरी जोडलेल्या गोकुळसारख्या मोठ्या संस्थेत मतदारांच्या कौलाचा अंदाज चुकणे हे असामान्य नाही. पराभवानंतर महायुतीत निर्माण झालेल्या अस्वस्थतेबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, एकाच रक्ताच्या नात्यात आणि कुटुंबातही अनेक विषयांवर मतभेद असतात, मात्र याचा अर्थ मनभेद असा होत नाही. युतीमध्ये वेगवेगळ्या विचारांचे आणि कार्यपद्धतीचे पक्ष एकत्र काम करत असल्याने मतप्रदर्शन होणे हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे.

हे ही वाचा : Marathwada Drought : दुष्काळाच्या भीषण झळा, अख्खं गाव झालं रिकामं

'मुलाच्या पराभवानंतर वडिलांना दु:ख...'

या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाचा झालेला पराभव आणि त्यावरून झालेल्या चर्चेवर चंद्रकांत पाटील यांनी भावनिक भाष्य केले. "हसन मुश्रीफ हे राज्याचे मंत्री आणि मोठे नेते असले तरी, ते सर्वात आधी एक वडील आहेत. त्यामुळे स्वतःच्या मुलाचा पराभव झाल्यानंतर एका पित्याला दुःख होणे स्वाभाविक आहे," असे त्यांनी सांगितले. पौराणिक दाखला देत ते म्हणाले की, अगदी भगवान शंकर आणि माता पार्वतीसुद्धा आपला मुलगा गणपतीसाठी अस्वस्थ होत असत; मग सामान्य माणसाच्या भावना दुखावणे साधे आहे. यासोबतच एका निवडणुकीच्या निकालाचा थेट परिणाम दुसऱ्या निवडणुकीवर होत नसतो, असा दावा करत त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे उदाहरण दिले.

हे ही वाचा : मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ बॉम्ब फोडल्यानंतर वर्षावर काय खलबतं झाली?

महायुती म्हणून लढण्याचा पहिला प्रयत्न

आगामी जिल्हा बँक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी महायुतीची भूमिका स्पष्ट केली. दुष्काळी परिस्थितीमुळे अथवा तांत्रिक कारणांमुळे निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता असली, तरी ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा बँकेपर्यंत सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याचाच पहिला प्रयत्न राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आपापसातील मतभेद चव्हाट्यावर न आणता, झालेल्या चुका दुरुस्त करून महायुती पुन्हा नव्या दमाने निवडणुकीच्या मैदानात उतरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.