Marathwada Drought : दुष्काळाच्या भीषण झळा, अख्खं गाव झालं रिकामं

यंदाच्या दुष्काळामुळे बीडचं खडकवाडी गाव रिकामं झालंय. 1350 लोकसंख्या असलेल्या गावात आता 50 वयोवृद्ध आणि लहान मुलं उरलीत. अख्खं गाव उसतोडीसाठी आणि रोजगाराच्या शोधात स्थलांतरीत झालंय.

ADVERTISEMENT

Beed Drought 2026
Beed Drought 2026
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मराठवाड्यात भीषण दुष्काळ

point

गावं होताहेत रिकामी

point

बीडमधील 'या' गावात काय घडलं?

Beed Drought 2026, रोहिदास हातागळे : महाराष्ट्रात यंदा भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, अनेक भागात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिकांना तर सोडाच, पण पिण्यासाठी एक ग्लास पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे. या दुष्काळाच्या सर्वाधिक झळा मराठवाड्याला बसत असून, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील खडकवाडी गाव यामुळे पूर्णपणे सुन्न आणि ओस पडले आहे. 1350 लोकसंख्या असलेल्या या गावातून तब्बल 1200 हून अधिक नागरिक ऊस तोडणी आणि रोजगाराच्या शोधात स्थलांतरित झाले आहेत. सध्या गावात केवळ 50 च्या आसपास वयोवृद्ध आणि लहान मुलेच शिल्लक राहिली आहेत.

'गाव दत्तक घ्यावे'

गावातील बहुतांश कुटुंबे दसऱ्याच्या आधीच कारखान्यांवर ऊस तोडणीसाठी निघून गेली आहेत. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला, तरी गावात अद्याप छावण्या किंवा पाण्याचे टँकर सुरू झालेले नाहीत, तसेच मदतनिधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दोन-तीन किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे गावकऱ्यांना भांडे घासलेले आणि कपडे धुऊन उरलेले पाणी जनावरांना पाजावे लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत गावाला कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी आणि पंकजा मुंडे यांनी हे गाव दत्तक घ्यावे, अशी आर्त हाक स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.

हे ही वाचा : मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ बॉम्ब फोडल्यानंतर वर्षावर काय खलबतं झाली?

अनेक कुटुंबांमध्ये ताटातूट

दुष्काळामुळे अनेक कुटुंबांमध्ये ताटातूट झाली असून लहान मुले आणि वृद्ध आई-वडिलांना मागे सोडून पालक कामासाठी निघून गेले आहेत. ज्या मुलांच्या शाळा आणि परीक्षा आहेत, त्यांना गावाकडेच आजी-आजोबांकडे ठेवण्यात आले आहे. एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपली व्यथा मांडताना सांगितले की, परीक्षा असल्यामुळे तो गावातच थांबला असून रोज 10 किलोमीटर पायपीट करत उपाशीपोटी शाळेत जात आहे. घरात खायला नाही आणि प्यायला पाणी नाही, अशा अत्यंत वेदनादायी आणि केविलवाण्या परिस्थितीत लहान मुले आणि वृद्ध दिवस कंठत आहेत.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात वातावरणात बदल, 'या' जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट

चोऱ्यांचे प्रमाण वाढले

ऑक्टोबर महिन्यातच पाण्याचे हे भीषण हाल असताना, पुढील काळात परिस्थिती कशी सांभाळायची असा यक्षप्रश्न खडकवाडीतील उरलेल्या ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे. गावात माणसे नसल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. पूर्वी असणाऱ्या साखर शाळा किंवा इतर सुविधाही आता उपलब्ध नसल्याने मुलांचे शिक्षण आणि संगोपन दोन्ही धोक्यात आले आहे. शासनाने त्वरित हस्तक्षेप करून खडकवाडीसह मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांत टँकर, छावण्या आणि अन्नधान्याची मदत तातडीने पुरवावी, अशी मागणी जोर धरत आहे.