पुणे : कारमध्ये आढळला 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह! स्वारगेटमध्ये खळबळ, मृत्यूचं गूढ काय?
पुण्यातील स्वारगेट परिसरात जैन मंदिराजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये 25 वर्षीय सुब्रत बनसोडे यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही कार गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर उभी होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्यात खळबळ!
कारमध्ये तरुणाचा मृतदेह
नेमकं काय घडलं?
Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट परिसरातील सारसबाग समोरील जैन मंदिराजवळ एका कारमध्ये 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुब्रत बाळासाहेब बनसोडे (रा. लोणी काळभोर) असे मृत तरुणाचे नाव असून, तो गेल्या सोमवारपासून (27 तारखेपासून) बेपत्ता होता. त्याचा मोबाईल फोन बंद येत असल्यामुळे कुटुंबीयांनी तो सापडत नसल्याची तक्रारही दाखल केली होती. सोमवारी रात्री तो मित्राची कार घेऊन घराबाहेर पडला होता, तीच कार स्वारगेट परिसरातील दादावाडी जैन मंदिराच्या शेजारील रस्त्यावर चार दिवसांपासून बेवारस उभी होती.
कारमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागली अन्...
गेल्या काही दिवसांपासून ही कार रस्त्याच्या कडेला उभी असल्याने कोणाचेही त्याकडे लक्ष गेले नाही. मात्र, शुक्रवारी (30 ऑक्टोबर) कारमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्यामुळे स्थानिक नागरिकांना काहीतरी गडबड असल्याची शंका आली. त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाला व स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन कारचे दार उघडले असता, त्यांना कारच्या मागच्या सीटवर एका तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक टीम व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण केले होते. त्यानंतर मृत तरुणाचा भाऊ शुभम याने मृतदेह सुब्रतचा असल्याचे ओळखले.
हे ही वाचा : 'तुमचा पण संतोष देशमुख करु..' गोपीचंद पडळकर यांच्यावर आरोप; सांगलीतलं प्रकरण काय?
मित्राने काय सांगितलं?
मृत सुब्रत हा त्याच्या मित्राची कार घेऊन बाहेर गेला होता. सुब्रतचा मित्र अविनाश गायकवाड याने दिलेल्या माहितीनुसार, सुब्रतने सोमवारी रात्री गाडी मागितली होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी संपर्क साधला असता त्याचा मोबाईल बंद लागत होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी आधीच पोलिसांत तो हरवल्याची तक्रार दिली होती. मात्र, शुक्रवारी सकाळी पोलिसांच्या फोनवरून गाडीत मृतदेह आढळल्याची दुर्दैवी बातमी त्यांना समजली. मृत सुब्रत हा जमीन व्यवहाराचे काम करत होता आणि त्याची घरची परिस्थितीही चांगली होती, असे त्याच्या मित्राने व नातेवाईकांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : Personal Finance: सोनं-चांदी न घेता त्यांच्याच व्यवसायात बना भागीदार, कमाईची दुसरी संधी
मृतदेह कुजायला सुरुवात
सध्या स्वारगेट पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणी व शवविच्छेदनासाठी (Postmortem) ससून रुग्णालयात पाठवला आहे. मृतदेह कुजायला सुरुवात झाल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपास आणि पोलिसांच्या कसून चौकशीनंतरच हा घातपात आहे की अन्य काही कारण, हे स्पष्ट होणार असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
