'तुमचा पण संतोष देशमुख करु..' गोपीचंद पडळकर यांच्यावर आरोप; सांगलीतलं प्रकरण काय?
जत तालुक्यात सहकारी संस्थेच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. मतदाराच्या कथित अपहरणाचा मुद्दा आता आरोप-प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक
गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप
नेमकं प्रकरण काय?
Sangli News : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांचे बंधू विनोद पवार हे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. याच चुरशीच्या वातावरणात सोनलगी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे ठरावधारक मतदार श्रीशैल कळळी यांच्या कथित अपहरणाचा वाद समोर आल्याने या निवडणुकीला मोठे वळण मिळाले आहे. श्रीशैल कळळी हे स्वतःच्या इच्छेने देवदर्शनासाठी हैदराबादला गेले असताना, त्यांची आई पद्माक्का कळळी यांनी उमदी पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची आणि त्याचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत सुनील पवार, विनोद पवार, माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि नाना शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.
'स्वमर्जीने देवदर्शनासाठी..'
मात्र, या प्रकरणाला लवकरच नाट्यमय ट्विस्ट मिळाला. हैदराबाद येथे असलेले श्रीशैल कळळी यांनी तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर हजर होऊन आपण स्वमर्जीने देवदर्शनासाठी आल्याचे स्पष्ट केले. तसेच, त्यांची आई पद्माक्का कळळी यांनीही उमदी पोलीस ठाण्यात पुन्हा जाऊन लेखी जबाब दिला. आपल्याला मराठी भाषा समजत नसल्याचा गैरफायदा घेऊन रमेश देवर्षी यांनी दिशाभूल केली आणि बळाने किंवा चुकीची माहिती देऊन मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यास सांगितल्याचे त्यांनी जबाबात नमूद केले. आपल्या लेकाविरोधात कोणतीही तक्रार नसून कोणीही अपहरण केलेले नाही, असे स्पष्ट करत त्यांनी दाखल केलेली तक्रार मागे घेतली. या सर्व घडामोडींमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे.
हे ही वाचा : Maharashtra Weather : अर्णब चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम? IMD चा अलर्ट काय?
विरोधकांवर दबाव आणण्याचा पडळकरांचा प्रयत्न
या संपूर्ण प्रकरणावरून माजी आमदार विक्रम सावंत यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसू लागल्याने विरोधकांवर दबाव आणण्यासाठी अपहरणाचा खोटा बनाव रचून गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र आखण्यात आले असून मतदारांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप सावंत यांनी केला. दुसरीकडे, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांनीही पडळकरांवर निशाणा साधत ‘जत तालुक्याचा बीड होऊ देणार नाही’ असा सज्जड दम दिला. जतमध्ये दडपशाहीचे आणि जातीयवादाचे राजकारण सुरू असून कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. या धमक्यांना न घाबरता प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी असल्याचे सांगत, या खोट्या तक्रारींच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे व उपमुख्यमंत्र्यांकडेही याप्रकरणी लेखी तक्रार केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा : Personal Finance: सोनं-चांदी न घेता त्यांच्याच व्यवसायात बना भागीदार, कमाईची दुसरी संधी
आमदार गोपीचंद पडळकर काय भूमिका घेणार?
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उमदी पोलीस ठाण्याच्या आवारात महाविकास आघाडी, समविचारी संघटनांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. सहकार क्षेत्राच्या या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत सत्ता आणि दबावाच्या राजकारणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, यावर आमदार गोपीचंद पडळकर यांची नेमकी काय भूमिका असणार आणि पोलीस तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे संपूर्ण जत तालुक्याचे लक्ष लागून आहे.
