Lok Sabha Election 2024: कुठे उमेदवार बदलले, कुठे माघार घेतली.. 'वंचित'वर का आली अशी वेळ?

निलेश झालटे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Prakash Ambedkar VBA: मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत एकला चलो रे भूमिका घेतली आहे. मात्र, मागील निवडणुकीत भरघोस मते घेतलेल्या उमेदवारांना डावलून यावेळी त्यांनी सोशल इंजिनिअरिंग करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. सर्व जाती-धर्मातील प्रतिनिधींना निवडणुकीच्या मैदानात संधी देण्याचं काम वंचित आणि प्रकाश आंबेडकरांकडून केलं जातंय. प्रत्येक समाजघटकाला प्रतिनिधीत्त्व मिळावं ही त्यामागची त्यांची भावना. आणि त्यामुळं अगदी उमेदवाराच्या जातीसह त्याच्या नावाची घोषणा करण्याचा वंचितचा पॅटर्न चर्चेत आला. (lok sabha election 2024 where did the candidates change where did they withdraw why did prakash ambedkar vanchit bahujan aghadi party come to this time)

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीत वंचितचं नेमकं चाललंय काय?

2024च्या लोकसभा निवडणुकासाठी आतापर्यंत जवळपास 35 मतदारसंघात उमेदवारांची घोषणा वंचितकडून करण्यात आली तर सहा ठिकाणी इतर उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला. मात्र, उमेदवारांनी घेतलेली माघार आणि बदललेल्या उमेदवारांमुळं वंचितचं नक्की चाललंय काय? यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. खासकरुन सोशल मीडियावर यावरुन खूप जास्त प्रमाणात चर्चा होतेय, सोबतच वंचितवर बी टीम असल्याचे आरोप देखील केले जात आहेत. यावर प्रकाश आंबेडकर यांच्यासह वंचितकडून देखील उत्तर दिली जात आहेत. मात्र वंचितनं उमेदवारांच्या घोषणेनंतर खरंच किती ठिकाणी माघार घेतलीय? कुठे उमेदवार बदललेत? कुठे इतर पक्षाला पाठिंबा दिलाय? कुठल्या उमेदवारावरुन वाद निर्माण झालाय? याबाबत आपण सविस्तपपणे जाणून घेऊयात... 

हे ही वाचा>> फडणवीसांच्या जवळचा नेता पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

वंचितच्या उमेदवारांच्या चर्चेला सुरुवात पुण्यापासून करुयात... पुण्यातून अभिजीत वैद्य यांना उमेदवारी द्या असं आंबेडकरांनी जागावाटपाची कसलीही चर्चा सुरु नसताना म्हटलेलं, मात्र शेवटी उमेदवारी कुणाला दिली तर मनसेतून आयात केलेले डॅशिंग नेते वसंत मोरेंना. यावरुन सोशल मीडियात बऱ्याच चर्चा रंगलेल्या.

हे वाचलं का?

शिरुरमध्ये मंगलदास बांदल तिकीट जाहीर केलं होतं. बारामतीमधून पक्षाने उमेदवार दिला पाहिजे, अशी पक्षविरोधी भूमिका बांदल यांनी घेतली होती, असा ठपका त्यांच्यावर ठेवत वंचितनं नंतर त्यांची उमेदवारी रद्द केली. नंतर बांदल यांनी महायुतीच्या मंचावर जाऊन भाषणं देखील दिली.

जळगावमध्ये प्रफुल्ल लोढा यांना आधी उमेदवारी दिली. मात्र त्यांनी या मैदानातून माघार घेतली. प्रकाश आंबेडकर यांच्याशी प्रफुल्ल लोढा यांनी दूरध्वनीवरून संपर्क करून सांगितले, की जळगाव लोकसभेतून मी निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे मी स्वतः कोणताही दबाव नसताना माघार घेत आहे. नंतर जळगावमध्ये युवराज भिमराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तिकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार बदलण्यात आला होता. गुलाब बर्डे यांना सुरुवातीला उमेदवारी दिली होती पण त्यांनी माघार घेतल्याने त्यांच्या जागी मालती थविल यांना उमेदवारी देण्यात आली.

ADVERTISEMENT

अमरावतीमध्ये देखील हो नाही म्हणत म्हणत आनंदराज आंबेडकर यांनी अर्ज दाखल केला खरा मात्र… वंचितनं प्राजक्ता पिल्लेवान यांचं तोपर्यंत नाव जाहीर केलं होतं, त्यामुळे ऐनवेळी फॉर्म न भरता वंचितकडून आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देऊ केला. तिकडे, रामटेकमधून देखील शंकर चहांदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, किशोर गजभिये यांना ऐनवेळी पाठिंबा दिल्याने वंचितनं तिथंही आपला उमेदवार माघारी घेतला. दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या यवतमाळमधून तब्येतीच्या कारणामुळे सुभाष खेमसिंग पवार यांनी माघार घेतल्यानंतर अभिजित राठोड यांनी वंचितकडून अर्ज दाखल केला.मात्र राठोड यांचा अर्जच बाद झाल्याने अपक्ष उभ्या असलेल्या अनिल राठोड यांना उमेदवारी देण्यात आली.

ADVERTISEMENT

तिकडे सोलापूरमध्ये वंचितचे उमेदवार राहुल गायकवाडांनी देखील निवडणुकीतून माघार घेतली.  "मी पंधरा दिवसांत इथलं वातावरण पाहिलं, इथं प्रत्येकजण स्वार्थासाठी लढत आहे. मला बंदूक तर दिली आहे, मात्र गोळ्या दिल्या नाहीत. छऱ्यासारख्या गोळ्या दिल्या आहेत. मला बाबासाहेबांचं स्वप्न वाचवायचं आहे. माझ्यामुळे भाजपचा उमेदवार जिंकेल, भाजपच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी मला कारणीभूत व्हायचं नाही, असा भावनिक व्हिडीओ तयार करून राहुल गायकवाड यांनी सोशल मीडियावर अपलोड केलाय.

मुंबई उत्तर मध्यमधून अबुल खान यांना आधी उत्तर मध्यमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र नंतर त्यांना दक्षिण मध्यमधून उमेदवारी देण्यात आली.

हे ही वाचा>> भर पावसात ठाकरेंची सभा.. मोदींवर हल्ला, भाषण जसंच्या तसं

वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीनं सोबत यावं यासाठी दोन्हीकडून प्रयत्न करण्याच आले. वंचित मागील लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता, वंचितमुळे आपले नुकसान होऊ नये म्हणून महाविकास आघाडीचे नेते प्रयत्नशील होते. वंचितला चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता, असंही मविआच्या नेत्यांनी सांगितलं होतं. जागावाटपासंदर्भात झालेल्या बैठकांमध्ये नेमके काय झाले, याचा दोन्हींकडून परस्परविरोधी तपशील समोर आला. मविआचे नेते आम्हाला टाळत होते, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला, तर आंबेडकरांना आमच्यासोबत यायचेच नव्हते. ते केवळ टाईमपास करत होते, असा आरोप मविआच्या नेत्यांनी केला. अखेर वंचित आणि मविआचं बिनसलं आणि आंबेडकरांनी वेगळी भूमिका घेतली. 

वंचितच्या भूमिकेवर निर्भय बनो मोहिम चालवणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यावरही वंचितकडून प्रत्युत्तर देण्यात आले होते.  महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी तर ‘वंचितला मत देऊ नका’असे थेट आवाहन केले. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका भाजपला पूरक असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला. मात्र, वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र पक्ष असून तो इतरांच्या फायद्यासाठी दुसऱ्यांच्या दावणीला का बांधावा, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आणि सर्व आरोप फेटाळून लावले. वंचितने कोणासोबत आघाडी करावी की स्वतंत्र लढावे, याचा निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आहोत. इतरांनी त्यात उगीच लुडबूड करता कामा नये, असे अशी आंबेडकरांची भूमिका आहे. 

2019 च्या निवडणुकीत काही जागांवर वंचितच्या उमेदवारामुळं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना फटका बसला होता.  नांदेडमध्ये वंचितचे यशपाल भिंगे यांनी तब्बल १ लाख ६६ हजार मते घेतल्यामुळे काँग्रेसचे अशोकराव चव्हाण यांचा पराभव झाला होता. भिंगेना यावेळी मात्र वंचितनं उमेदवारी दिली नाही. तर लातूरमधून राम गिरकर यांनी १ लाख १२ हजार मते घेतली होती. त्यांनाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. परभणीत बाबासाहेब उगले यांना उमेदवारी आधी जाहीर केली होती. तिथंही उमेदवार बदलून पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्यात आली. परभणीत 2019ला अलमगीर खान यांनी १ लाख ४९ हजार मते घेतली होती. हिंगोलीत मोहन राठोड या वंचितच्या उमेदवाराने सुमारे १ लाख ७४ हजार मते घेतल्याने तिथेही काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. यावेळी वंचितने तिथे बी.डी. चव्हाण यांना संधी दिलीय. मागील निवडणुकीत चांगली मते घेणारे उमेदवार डावलून यावेळी नवे चेहरे का देण्यात आले, असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय...  

पाठिंब्याबद्दल बोलायचं तर वंचितकडून सहा ठिकाणी इतर पक्षातील उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. कोल्हापुरातून काँग्रेस उमेदवार शाहू महाराजांना तर  नागपुरातून विकास ठाकरेंना पाठिंबा  देण्यात आला आहे.  बारामतीतून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा  देण्यात आलेला आहे. यवतमाळ वाशिममधून अनिल राठोड यांना पाठिंबा दिलाय तर अमरावतीत आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देण्यात आलाय. भिंवंडीमधून निलेश सांबरेंना वंचितनं पाठिंबा दिलाय. सांगलीतून प्रकाश शेंडगे लढले तर त्यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केले गेले होते. आता शेंडगे मैदानात आहेत, त्यामुळं तिथं वंचितचा शेंडगेंना पाठिंबा मिळेल का हे पाहावं लागेल, विशाल पाटलांचे बंधू प्रतिक पाटलांनी आंबेडकरांची भेट घेतली होती, त्यामुळं सांगलीत अपक्ष मैदानात असलेल्या विशाल पाटील यांना पाठिंबा दिला जाईल का? याकडेही लक्ष लागून आहे.

दरम्यान अकोल्यात स्वता प्रकाश आंबेडकरांसह राज्यातील इतर उमेदवारांसाठीही वंचित बहुजन आघाडी आक्रमकपणे मैदानात उतरलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळं आता चार जूनला वंचितची नेमकी ताकद कितीय हे स्पष्ट होणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT