लाइव्ह

Maharashtra Lok Sabha election Live : कोणालाही पाडा.. पण असं पाडा की त्याच्या 5 पिढ्या उभ्या राहायला घाबरल्या पाहिजे: मनोज जरांगे

मुंबई तक

ADVERTISEMENT

manoj jarange patil case file
बीडमध्ये मनोज जरांगे पाटील आणि इतर 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
social share
google news

Lok Sabha Election 2024 Maharashtra Live News : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होत असून, प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. यात महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदासंघाचा समावेश आहे. 

ADVERTISEMENT

उन्हाच्या झळा होरपळून टाकत असताना सर्व पक्षाचे राजकीय नेते गावोगाव फिरत असून, राजकीय रणधुमाळी जोरात सुरू आहे. दुसरीकडे बेरजेचं राजकारणाचेही प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यात नवीन राजकीय समीकरणे जुळताना दिसत आहेत. 

महाराष्ट्रासह देशातील लोकसभा निवडणूक आणि राज्यातील महत्त्वाच्या घटनांची माहिती जाणून घेण्यासाठी वाचत रहा लाईव्ह अपडेट्स...

ADVERTISEMENT

  • 10:10 PM • 24 Apr 2024

    मनोज जरांगेंची अचानक खालावली प्रकृती, रुग्णालयात दाखल 

    मनोज जरांगे यांची अचानक प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना धाराशिवमधून तात्काळ छ. संभाजीनगरमध्ये आणण्यात आलं. जरांगे हे बीड दौऱ्यावर जात असतानाच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे बीड दौरा त्यांना अर्धवट सोडावा लागला. छ. संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • 10:05 PM • 24 Apr 2024

    कोणालाही पाडा.. पण असं पाडा की त्याच्या 5 पिढ्या उभे राहायला घाबरल्या पाहिजे: मनोज जरांगे

    मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला एक वेगळंच आवाहन केलं आहे. 'मी राजकारणात नाही, कोण उभा राहिले आहे, कोणाला पाडा हे मी समाजाला सांगितले नाही.. त्याचा गैर अर्थ काय काढायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. 

    मी व समाजाने कोणाला पाठिंबा दिलेला नाही, आम्ही एकपण अपक्ष उमेदवार राज्यात उभा केलेला नाही. आम्ही युती किंवा महाविकास आघाडी यापैकी कोणाला पाठिंबा दिलेला नाही.. आम्हाला सगळे सारखे आहेत..  

    पण एक खरं आहे, समाजाने मताची भीती वाटली पाहिजे म्हणून मतदान केलं पाहिजे. त्यात कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा.. पण पाडणाऱ्याला असं पाडा की इथून पुढे त्याच्या 5 पिढ्या उभे राहायला घाबरल्या पाहिजे.. इतक्या ताकतीने पाडा. मताची ऐकीची त्याला भीती वाटली पाहिजे असं पाडा.

    असं महत्त्वाचं विधान मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केलं आहे. ते येरमाळा येथे येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आले होते तेव्हा बोलत होते.

  • 06:40 PM • 24 Apr 2024

    Solapur Lok Sabha : आंबेडकरांनी वाढवलं प्रणिती शिंदेंचं टेन्शन! सोलापुरात मोठा उलटफेर

    सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणित पुन्हा बदललं आहे. वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेल्या राहुल गायकवाड यांनी माघार घेतली. त्यामुळे प्रणिती शिंदेंची लढाई थोडी सोपी झाल्याचे म्हटले जात होते. पण, आता वंचित बहुजन आघाडीने सोलापुरात आतिश बनसोडे यांना पाठिंबा दिला आहे. 

    वंचितने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "भाजपने घडवून आणलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आतिश मोहन बनसोडे यांना पक्षाचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे." 

    "सोलापुरातील प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व मतदारांनी आतिश मोहन बनसोडे यांना मतदान करावे", असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

    सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राहुल गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, अचानकपणे त्यांनी पक्षाला माहिती न देता उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वंचित बहुजन आघाडीने मोहन बनसोडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

    वंचित बहुजन आघाडीने बनसोडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीच्या पारड्यात पडू शकणारी मते फुटू शकतात. त्याचा थेट फायदा भाजपच्या राम सातपुते यांना होईल, असे चित्र आहे. त्यामुळे प्रणिती शिंदेंना ही मते राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. 

     

  • 04:26 PM • 24 Apr 2024

    यवतमाळच्या सभेत भाषण करताना नितीन गडकरींना आली भोवळ

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यवतमाळच्या पुसद येथील सभेत भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे. गडकरी भाषण करत असताना अचानक त्यांना भोवळ आली. त्यांच्यावर तातडीने प्रथमोपचार करण्यात आले. गडकरी यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना सभास्थळी मागच्या ग्रीन रुममध्ये बसवण्यात आलं आहे.

  • ADVERTISEMENT

  • 03:12 PM • 24 Apr 2024

    Kolhapur Lok Sabha : काँग्रेसचा तडकाफडकी निर्णय; 'या' नेत्याची केली हकालपट्टी

    कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली आहे. पण, काँग्रेसचे नेते बाजीराव खाडे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत लोकसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यावर पक्षशिस्त मोडल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. बाजीराव खाडे यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. 

    Congress suspends Bajirao Khade for 6 years for contesting against Congress candidate in Kolhapur
    बाजीराव खाडे यांना काँग्रेसने पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे.

     

  • 03:00 PM • 24 Apr 2024

    Maharashtra Live : "असं नाही.. नीट रडायचं", अमोल मिटकरींनी कुणी डिवचलं?

    भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांची सभा आयोजित करण्यात आली. व्यासपीठावर एक बॅनरही लावण्यात आले. पण, या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली. 

    अमोल मिटकरींनी ट्विट केले आणि म्हणाले की, "नवनीत राणाजी, आपण महायुतीचा धर्म विसरला आहात. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा निवडणुकीत याची मोठी किंमत मोजावी लागेल", असा इशारा मिटकरींनी दिला. 

    त्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी मिटकरींना डिवचले. त्यांनी व्हिडीओ रिट्विट करत म्हटलं की, "असं नाही.. नीट रडायचं ! मोठमोठ्याने टाचा रगडून रडायचं, तरच बोनस मिळेल."

    अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणांना यांन उमेदवारी दिली आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी अमित शाहांची ही सभा होत आहे. पण, अजित पवारांना सभेच्या व्यासपीठावरील बॅनरवर स्थान न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी नाराज झाले. 

  • ADVERTISEMENT

  • 12:48 PM • 24 Apr 2024

    'मोदींनी दिलेला शब्द पूर्ण केला नाही', शरद पवारांनी चांगलच सुनावलं!

    'देशात पेट्रोलच्या किंमती वाढल्या, पेट्रोलची किंमत कमी करणार असं मोदी 2014 ला म्हणाले होते. आज एक लिटर पेट्रोलची किंमत 106 रूपये आहे. मोदींनी दिलेला शब्द पूर्ण केला नाही. त्यांच्यामुळे देशातील शेतकरी अडचणीत आले आहेत. मोदींनी सामान्यांची महागाईतून सुटका केली नाही.' शरद पवारांचा मोदींवर निशाणा.

  • 12:19 PM • 24 Apr 2024

    Maharashtra Live News : 'बघा हिंदुत्वाची आठवण येते का?', शेलारांनी ठाकरेंना कवितेतून काढला चिमटा

    मशाल निवडणूक चिन्हाच्या गाण्यातून काही हिंदू धर्म आणि जय भवानी शब्द वगळावे, असे निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सांगितले आहे. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केले होते. त्याला आता भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी खोचक शब्दात उत्तर दिले. 

    शेलार यांची पोस्ट जशीच्या तशी

    बघा हिंदुत्वाची आठवण येते का?
    काँग्रेसचा जाहीरनामा 
    मातोश्रीच्या खिडकीत उभे राहुन वाचा..
    बघा हिंदुत्वाची आठवण येते का ?

    जूने सामनाचे अंक काढा...
    वंदनिय शिवसेनाप्रमुखांचे अग्रलेख वाचा..
    नाहीच काही जाणवले, तर बाहेर पडा..
    हवं तर शिवतिर्थावर जा..
    बघा हिंदुत्वाची आठवण येते का ?

    ‍काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 
    तुकडे तुकडे गँगचा अजेंडा दिसेल
    देशाच्या मालमत्तांवर पहिला अधिकार
    "जादा बच्चेवाल्यांचा" सांगेल..
    आपल्या आया-भगिनींचे मंगळसूत्रही उद्या मागेल..
    वाळू सरकेल पाया खालची..
    बघा, हिंदुत्वाची आठवण येते का ?

    यानंतर देशाचा "आवाज" नुसता ऐकण्याचा प्रयत्न करा..
    यानंतर सताड डोळयांनी काँग्रेसचे काय चाललेय हे बघा.. 
    मुंबईकरांना नाही तर 
    तुम्हीच तुम्हाला फसवताय याची जाणीव होईल..
    मशालीच्या धगीत..
    झोपी जाण्याचा प्रयत्न करा... झोप येणार नाहीच..
    हवं तर हनुमान चालीसा म्हणा..!
    आई भवानी शपथ..
    या निवडणुकीत... एक दिवस तरी..
    बघा... हिंदुत्वाची आठवण येते का !

    (कवी सौमित्र यांची क्षमा मागून) 

  • 11:23 AM • 24 Apr 2024

    "बच्चू कडूंना खरोखर हुकुमशाही वाटत असेल, तर...", शरद पवारांच्या नेत्याचा सल्ला?

    Amravati Lok Sabha Election 2024 : अमरावतीतील सायन्स स्कोर मैदानावर सभा घेण्यासाठी बच्चू कडू यांच्या प्रहारला परवानगी देण्यात आली होती. पण भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमित शाह यांची सभा होणार असल्याने त्यांची परवानगी रद्द करण्यात आली. त्यानंतर हुकुमशाही सुरू आहे का? असे बच्चू कडू म्हणाले होते. 

    त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी प्रायश्चित करण्याचा सल्ला दिला आहे. 

    ते म्हणतात, "बच्चू कडूंना खरोखर ही हुकूमशाही वाटत असेल तर त्यांनी आपला उमेदवार मागे घेऊन ज्यांनी त्यांना मंत्रीपद दिलं होतं त्या महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा आणि आपल्या "सुरत-गुवाहाटी" दौऱ्याचं प्रायश्चित्त करावं. अन्यथा असे स्टंट करून ते केवळ मत विभाजन करताय हेच सिद्ध होईल", असे प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

     

  • 11:14 AM • 24 Apr 2024

    Lok Sabha election Mahayuti News : शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत दोन जागा? 

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मुंबईतील तीन जागा शिवसेना लढेल, असे म्हटले होते. पण, आता समोर आलेल्या माहितीनुसार शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत दोन जागाच मिळणार आहे. 

    भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या हवाल्याने लोकमतने यासंदर्भात वृत्त दिल आहे. यात म्हटले आहे की, मुंबईतील जाहीर केलेल्या दोन जागांबरोबरच दक्षिण मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन जागा भाजपला मिळतील. 

    दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याचे भाजपच्या नेत्याने म्हटले आहे. 

    भाजपने उत्तर मुंबई मतदारसंघातून पीयूष गोयल, तर उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. गोयल हिंदी भाषिक असून, कोटेचा गुजराती आहेत. त्यामुळे उर्वरित दोन जागांवर भाजपकडून मराठी उमेदवार दिले जाणार असल्याचे या नेत्याने म्हटले आहे. 

  • 10:26 AM • 24 Apr 2024

    Maval Lok Sabha 2024 live : "रोहित पवारांच्या प्रचारामुळे पार्थ पवारांचा पराभव झाला होता का?"

    रोहित पवारांनी पार्थ पवारांबद्दल केलेल्या विधानावर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला घेणार, असे रोहित पवार म्हणालेले. त्यावर अमेय खोपकर यांनी उलट सवाल केला. 

    "२०१९ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रोहित पवार यांनी भावाचा प्रचार केला होता, त्यामुळेच पार्थ पवार यांचा पराभव झाला होता का? आता रोहित पवार बदल्याची भाषा बोलतायत पण त्यांच्या दुर्दैवाने आणि मावळच्या जनतेच्या सुदैवाने आता मनसेची महाताकद श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी आहे. रोहित पवार, तुम्ही फिल्लमबाजी करत बसा, बाजी तर आम्हीच मारणार आहोत", असे अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

     

    रोहित पवार काय म्हणालेले?

    "गतवेळीही आम्ही बारणेंविरोधात लढलो होतो आणि आताही त्यांच्या विरोधातच लढतोय. गेल्यावेळी मावळात आम्ही आमचे बंधू पार्थ यांच्यासाठी प्रचार केला होता. त्यावेळी त्यांचा मोठा पराभव झाला. पार्थ यांचा बारणेंनी केलेला पराभव आम्ही विसरलो नाही. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठीच मी प्रचार करत आहे. अजितदादा लेकाचा पराभव करणाऱ्या बारणेंच प्रचार करत आहेत", असा चिमटा रोहित पवारांनी अजित पवार यांना काढला होता. 

  • 10:19 AM • 24 Apr 2024

    Amravati Lok Sabha : राहुल गांधींना हुकुमशाही करायची आहे -नवनीत राणा

    अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली आहे. 

    त्या म्हणाल्या, "ज्या पद्धतीने राहुल गांधी देशात बोलत आहेत की, कुणाजवळ किती संपत्ती आहे, किती सोनं आहे याचा हिशोब होईल. मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर इतर लोकांना वाटले जाईल. या देशात नवा पायंडा येत आहे. काँग्रेसचे लोक संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेस येणाऱ्या काळात हुकुमशाही करू इच्छितात."

     

  • 08:23 AM • 24 Apr 2024

    Lok Sabha 2024 Live News : दोन नावांना मनसेचा विरोध, शिंदेंसमोर पेच?

    मुंबईतील सहापैकी दोन जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार असल्याची माहिती आहे. यातील एका मतदारसंघासाठी ज्या दोन नावांची चर्चा आहे. त्या दोन्ही नावांना मनसे तीव्र विरोध केला आहे. 

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी पक्षाची भूमिका मांडत, दोन्ही संभाव्य उमेदवारांच्या नावाला विरोध केला आहे. 

    उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून ज्या दोन नावांची चर्चा आहे, त्यात एक नाव रवींद्र वायकर यांचे आहे, तर दुसरं नाव संजय निरुपम यांचं आहे. 

    शालिनी ठाकरेंनी म्हटलं आहे की, 'मनसेला शिंदेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर लढायला सांगणाऱ्यांवर दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम पाला पाचोळ्यासारखे इकडून-तिकडून उडत आले. त्याचे काय?', असा सवाल करत त्यांनी शिंदेंना सुनावले.

    रवींद्र वायकर यांना भ्रष्टाचारी म्हणत त्यांनी त्यांच्या उमेदवारीलाही विरोध केला आहे. 'राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे, पण काही उमेदवारांना मनसेचा विरोध आहे. तुमच्या पक्षाकडे उमेदवार नाहीत आणि आमच्या पक्षालाही पुढे येऊ देत नाही', असे त्या म्हणाल्या. 

    शिवसेनेकडून गजानन कीर्तिकर यांच्या मतदारसंघातून वायकर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. पण, मनसेने विरोध केल्याने एकनाथ शिंदे यांची कोंडी होऊ शकते, असे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदेंना नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागू शकतो. 

follow whatsapp

ADVERTISEMENT