लाइव्ह

Maharashtra Lok Sabha Election Live : "पवार-ठाकरेंना ऑफर", मोदींच्या विधानाचा फडणवीसांनी सांगितला नेमका अर्थ

मुंबई तक

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदी यांच्या ऑफरवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण.
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार.
social share
google news

Lok Sabha Election 2024 Maharashtra Live News : लोकसभा निवडणुकीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे घमासान जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होत असून, पहिले तीन टप्पे पार पडले आहेत. 

चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये प्रचार सुरू असून, चौथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये सर्वच पक्षाच्या प्रमुखांच्या सभांचा धडाका सुरू आहे. 

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील प्रचाराची धग वाढली आहे. चौथ्या टप्प्यात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड हे मतदारसंघ, खान्देश, आणि अहमदनगरमधील दोन समावेश आहे.

उर्वरित लोकसभा मतदारसंघातील प्रचाराबरोबरच राजकीय घडामोडी आणि समीकरणेही बदलत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घटनांची माहिती जाणून घेण्यासाठी वाचत रहा लाईव्ह अपडेट्स...

लाइव्हब्लॉग बंद

 • 06:24 PM • 10 May 2024

  Maharashtra Lok Sabha election : "पवार-ठाकरेंना ऑफर", मोदींच्या विधानाचा फडणवीसांनी सांगितला नेमका अर्थ 

  काँग्रेससोबत जाऊन मरण्यापेक्षा एनडीएसोबत या आणि तुमची स्वप्ने पूर्ण करा, असे विधान पंतप्रधान मोदींनी नंदुरबार येथील सभेत केले. मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना ऑफर दिल्याचा अर्थ या विधानावरून काढला गेला. पण, यावर आता देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली आहे. 


  "काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल, याचा अर्थ काय आहे? तर काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष हे हारताहेत, हे पवार साहेबांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून त्यांना एकत्रित व्हावं लागेल आणि त्यांना मोदीजींनी सल्ला दिलाय की, तुम्ही काँग्रेसमध्ये गेले तरी तुमची अवस्था तीच होणार आहे. कारण काँग्रेसही संपणारा पक्ष आहे. तेव्हा तुम्हाला जर खरंच काही करायचं असेल, तर तुम्ही शिवसेनेने एकनाथराव शिंदेंसोबतच्या शिवसेनेसोबत जावं आणि तुम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जावं."

  "त्यामुळे जणू काही मोदीजींनी निमंत्रण दिलंय आणि मग यांचे जे भोंगे बोलताहेत की, आता हे घाबरले आहेत. त्यामुळे निमंत्रण देताहेत. स्वतः पवार साहेबांनी सांगितलंय की, आम्हाला विलीन व्हावं लागेल. त्याच्यावर दिलेली प्रतिक्रिया आहे. मला वाटतं माध्यमांनी कुठल्याही गोष्टीचा अर्थ लावताना ते जे काही बोलले आहेत. त्याच्या आधारावर अर्थ लावावा", असे फडणवीस म्हणाले.
   

 • 04:50 PM • 10 May 2024

  Ajit Pawar: 'माझ्या नादी लागतो त्याचा मी बंदोबस्त करतो', अजित दादांचा लंकेंवर हल्लाबोल

  अजित पवारांची साथ सोडत निलेश लंकेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. ऐनवेळी धक्का दिल्याने अजित पवारांनी आज संताप व्यक्त केला. अजित पवारांची सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी त्यांनी 'माझ्या नादी लागतो, त्याचा मी बंदोबस्त करतो', अशा शब्दात पारनेरमधील सभेत लंकेंवर हल्लाबोल केला आहे.

  ‘मार्केट कमिटीमध्ये जर कुणी चुका केल्या असतील, तर माझ्या शेतकऱ्यांच्या मालकीची मार्केट कमिटी आहे. कुणाच्या बापाच्या घरची नाही, त्यामुळे त्याची चौकशी होईल. कारण नसताना कुणाला त्रास दिला जाणार नाही. कुणी तिथे पैसा खाल्ला असेल तर अशांना चिक्की पिसिंग ऍण्ड पिसिंग’, असा इशाराही अजित पवारांनी दिला.

 • 04:03 PM • 10 May 2024

  Arvind Kejriwal : जामीन मिळाला, कधीपर्यंत तुरुंगातून बाहेर येणार?

  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अंतरिम जामिनावर सुटका करण्याचा निर्णय दिला. अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत.

  सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची 1 जूनपर्यंत अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्याच्या वकिलाने ४ जूनपर्यंत जामीन देण्याची विनंती केली होती, ती न्यायालयाने फेटाळून लावली.

  अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने अटक केली होती.

  अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक प्रचारासाठी जामीन मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांना जामीन देण्यास ईडीने विरोध केला. ईडीने म्हटले की, निवडणूक प्रचार हा जामिनासाठी आधार असू शकत नाही, कारण तो मूलभूत किंवा कायदेशीर अधिकार असू शकत नाही. जामीन मंजूर केल्याने चुकीचा आदर्श निर्माण होईल.

  केजरीवाल यांची सुटका कधी होणार?

  सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामिनाचा निर्णय दिला असला, तरी केजरीवाल यांना तिहारमधून बाहेर येण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

  सर्वोच्च न्यायालयाचा लेखी आदेश आता दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात पाठवला जाणार आहे. जामिनाच्या अटी राऊज अव्हेन्यू कोर्टात ठरवल्या जातील आणि जामीन बाँड भरावा लागेल.

  त्यानंतर ट्रायल कोर्ट रिलीझ ऑर्डर तयार करून तिहार जेल प्रशासनाकडे पाठवेल. सुटकेचा आदेश मिळाल्यावरच केजरीवाल तुरुंगातून बाहेर येऊ शकतील.

  केजरीवाल यांच्या वकिलाने सांगितले की, दररोज येणारे सर्व रिलीझ ऑर्डर सुमारे तासाभरात निकाली काढले जातात.

  केजरीवाल किती दिवस बाहेर राहणार?

  केजरीवाल यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी ४ जूनपर्यंत जामीन देण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली. केजरीवाल 1 जूनपर्यंत अंतरिम जामिनावर राहणार असून त्यांना 2 जून रोजी हजर व्हावे लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

  किती मोठा दिलासा?

  निवडणूक प्रचारासाठी जामिनावर सुटण्याची विनंती करणारी याचिका केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. आता त्यांना सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. केजरीवाल तीन आठवडे तुरुंगाबाहेर राहणार आहेत. यादरम्यान केजरीवाल आम आदमी पक्षाचा प्रचार करू शकतात. दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांसाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे.

  अटी अजून ठरवायच्या आहेत

  अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अटींवर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, जामीन मिळाल्यानंतरही केजरीवाल हे अधिकृत काम करू शकणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीदरम्यान स्पष्ट केले होते. म्हणजेच जामिनावर बाहेर आल्यानंतर केजरीवाल यांना प्रचार करता येणार आहे. याशिवाय प्रकरणाशी संबंधित बोलण्यावरही निर्बंध लादले जाऊ शकतात.

 • 02:23 PM • 10 May 2024

  Arvind Kejriwal : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, अऱविंद केजरीवाल उतणार प्रचाराच्या मैदानात!

  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर करून दिलासा दिला आहे. आज 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. आता केजरीवाल पक्षासाठी प्रचाराच्या मैदानात उतरताना दिसतील. 

 • ADVERTISEMENT

 • 01:57 PM • 10 May 2024

  Maharashtra Lok Sabha Election : शरद पवार अजित पवारांना म्हणाले, 'बालबुद्धी'

  पुण्यात शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रादेशिक पक्ष विलीन होतील, या विधानावर अजित पवार म्हणाले की, संभ्रमावस्था निर्माण करण्याची तुमची कार्यपद्धती राहिली आहे, असा मुद्दा पत्रकारांनी शरद पवारांसमोर उपस्थित केला.

  त्याला उत्तर देताना पवार म्हणाले, "याच्यावर मी फार काही बोलू इच्छित नाही. पण, असं आहे की, राजकारणामध्ये बालबुद्धी हे ज्यांचं वैशिष्ट्ये आहे, असे अनेक लोक असतात. त्यांच्या बालबुद्धीने काही बोलत असतात. त्याच्याकडे आपण काय लक्ष द्यायचं", असे खोचक उत्तर शरद पवार यांनी अजित पवारांना दिले. 

 • 10:50 AM • 10 May 2024

  Devendra Fadnavis : "अरे बाप रे! शरद पवारांचं अंतःकरण किती उदार", फडणवीसांचा टोला

  महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या वातावरणाबद्दल बोलताना शरद पवार यांनी असा अंदाज व्यक्त केला होता की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेच्या ३०-३५ जागा मिळू शकतात, तर महायुतीला १३-१८ जागा मिळू शकतात. पवारांच्या याच विधानावरून फडणवीसांनी टोला लगावला आहे. 

  "शरद पवार यांनी महायुतीला १२-१३ जागा दिल्या. अरे बाप रे! पवार साहेबांचं किती उदार अंतःकरण आहे", असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला.

 • ADVERTISEMENT

 • 10:17 AM • 10 May 2024

  Maharashtra Lok Sabha Election : संविधान बदलाचा महायुतीला फटका बसतोय -उदय सामंत

  शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी मोठे विधान केले आहे. ४०० पारच्या घोषणेला संविधान बदलण्याशी जोडले जात आहे. याचा फटका महायुतीला बसत आहे, असे सांगताना सामंत यांनी यासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.

  "४०० पारचा जो भाजपाचा नारा होता, त्याचा संदर्भ देऊन राज्यघटना बदलवण्याची भीती काँग्रेसकडून मतदारांना दाखवली जात आहे. काँग्रेसच्या या अपप्रचाराचा फटका महायुतीला काही प्रमाणात बसतो आहे. याला काँग्रेस जबाबदार आहे. खोटं बोल पण रेटून बोल ही काँग्रेसची आजपर्यंतची परंपराच आहे", असे सामंत म्हणाले.

 • 08:36 AM • 10 May 2024

  Dindori Lok Sabha election : "छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा", शिंदेंच्या आमदाराचे गंभीर आरोप

  दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

  "राष्ट्रवादी काँग्रेसचे दाखवायचे आणि खायचे दात वेगवेगळे आहेत. राष्ट्रवादीचे नेते तुतारीचा प्रचार करताहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ माझ्याकडे आहेत. छगन भुजबळ यांना महायुतीमधून मंत्रीपद मिळाले, आणि काम करायच्या वेळी ते तुतारीचा प्रचार करत आहेत. तुम्हाला तुतारीचा एवढाच पुळका असेल, तुम्ही मंत्रि‍पदाचा राजीनामा द्या आणि खुशाल तुतारीचे काम करा", असे आमदार सुहास कांदे म्हणाले आहेत. 

  भुजबळांनी मांडली भूमिका

  आमदार कांदे यांनी केलेल्या आरोपांवर छगन भुजबळ यांनी भूमिका मांडली. "सुहास कांदे आमचे विरोधक राहिले आहेत. ते नेहमी खोटं बोलतात. नाशिकमधील लोक कांद्याच्या प्रश्नावरून आधीच नाराज आहेत. त्यात कांदेंच्या विधानांमुळे लोकांमध्ये आणखी नाराजी पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन कांद्यांचा त्रास भारती पवार यांना व्हायला नको. सुहास कांदे यांनी त्यांचे काम करावे, आम्हाला आमचे काम करू द्यावे", असे उत्तर भुजबळ यांनी दिले आहे. 

  छगन भुजबळ नाराज?

  नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. अमित शाह यांनीच त्यांना उमेदवारी देण्यास सांगितले होते. पण, उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्याने भुजबळ यांनी माघार घेतली. 

  शिंदे यांनी ही जागा शिवसेनेकडे ठेवण्यात यश मिळवले. हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. पण, छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. 

  भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतली होती, असे सांगितले जाते. त्यांच्या उपस्थितीतच बावनकुळे यांनी नाशिकची जागा शिवसेना लढवेल अशी घोषणा केली होती. त्यानंतर गिरीश महाजन, हेमंत गोडसे यांनीही भुजबळ यांची भेट घेतली. पण, भुजबळ आणि समता परिषदेच्या नाराजीची या मतदारसंघात चर्चा सुरूये.

follow whatsapp

ADVERTISEMENT