Lok Sabha election 2024 : जे प्रकाश आंबेडकरांना जमलं, ते राज ठाकरेंना का नाही? 

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

Raj Thackeray MNS, Lok Sabha election 2024 : राज ठाकरेंनी यांनी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे त्यांच्या या भूमिकेबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

social share
google news

Prakash Ambedkar Raj Thackeray, Maharashtra Politics : राज ठाकरेंनी मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठींबा देखील दिला. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश देखील राज यांनी दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे सलग दोन वर्ष मनसे लोकसभेच्या रिंगणात नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

एकीकडे सर्व पक्ष जास्तीत जास्त जागा लढवून आपला व्होट शेअर कसा वाढवता येईल आपला पक्षविस्तार कसा करता येईल याकडे लक्ष देत असताना राज ठाकरे मात्र लोकसभा निवडणुकांमधून माघार घेत आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरांनी वंचितच्या माध्यमातून पर्याय उभा केला आहे, ते राज ठाकरेंना का जमत नाही हेच आपण समजावून घेऊयात...

राज ठाकरेंची सभा मंगळावारी शिवाजी पार्कवर पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी अमित शाह यांच्या भेटीत काय झालं याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर देशाला एका खंबीर नेतृत्वाची गरज असल्याने मोदींना बिनशर्त पाठींबा राज ठाकरेंनी जाहीर केला. 

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हा पाठींबा जाहीर करताच राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश देखील दिले. एका अर्थाने राज ठाकरे लोकसभा लढवत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

मनसे लोकसभा निवडणुकीपासून दूर

राज ठाकरेंनी दिल्लीला अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर अनेक चर्चा सुरु होत्या. त्या सर्व चर्चांना राज ठाकरेंनी एक प्रकारे पूर्णविराम दिला. राज ठाकरे लोकसभा लढवत नसल्याने सलग दोन वेळा मनसे लोकसभा लढवत नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 

2019 मध्ये राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये राज ठाकरेंचा लाव रे तो व्हिडीओचा प्रयोग चांगलाच रंगला होता. राज ठाकरेंनी त्यावेळी भाजप आणि मोदींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर पुन्हा काही वर्षांनी त्यांनी त्यांची भूमिका बदलली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> पवारांचा मल्ल.. शशिकांत शिंदेंना हलक्यात घेणं उदयनराजेंना जाणार जड? 

राज ठाकरेंनी मराठीच्या भूमिकेनंतर प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेतली. राज ठाकरेंनी पक्षाचा झेंडा देखील बदलला. याच काळात मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदु जननायक अशी उपाधी देखील राज ठाकरेंना दिली. 

२००९ मध्ये पहिल्याच विधानसभेच्या निवडणुकीत मनसेने १३ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत मनसेला मोठा फटका बसला. 

२०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेची केवळ एक जागा निवडूण आली, २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील सारखंच चित्र होतं. 

२००९ मध्ये जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक उभरता पक्ष म्हणून पाहिलं जात होतं त्यावेळी मनसेचं कसं बलाबल होतं ते समजून घ्या

राज ठाकरेंच्या मनसेचे मतांचं गणित

२००९ मध्ये मनसेने ११ लोकसभेच्या जागा लढवल्या. या निवडणुकीत मनसेला १५ लाख ३ हजार ८६३ इतकी मतं मिळाली. यावेळी मनसेने जेवढ्या जागा लढवल्या त्या मतदारसंघांचा मिळून मनसेचा व्होट शेअर हा २०.८ टक्के इतका होता. 

आता आपण २०१४ चा विचार करुयात २०१४ मध्ये मनसेने १० लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवली. या निवडणुकीत मनसेला ७ लाख ८ हजार ११८ इतकी मतं मिळाली. या निवडणुकीत मनसेने लढवलेल्या जागांमध्ये ७.७ टक्के इतका वोट शेअर होता.
 
२००९ मध्ये मनसेकडे एक तिसरी आघाडी म्हणून पाहिलं जात होतं. मोठ्याप्रमाणावर तरुण वर्ग हा मनसेकडे आकर्षित होत होता. मराठीचा आणि मराठी तरुणांचा मुद्दा हा मनसेचा महत्त्वाचा अजेंडा होता.

हेही वाचा >> महाविकास आघाडीला एकही जागा देऊ नका: पंतप्रधान मोदी 

पुढच्या काळात मनसेची लोकप्रियता कमी होत गेली. राज ठाकरेंच्या सभांना होणाऱ्या गर्दीचं रुपांतर हे मतांमध्ये होऊ शकलं नाही. राज ठाकरेंनी देखील अनेकदा आपल्या भाषणांमधून याबाबतचा उल्लेख केला आहे. 

२०१४ ला राज ठाकरेंनी मोदींना पाठींबा दिला, त्यानंतर २०१९ ला मोदींच्या विरोधात वातावरण निर्माण केलं आणि आता २०२४ ला पुन्हा मोदींना पाठींबा जाहीर केल्याने राज ठाकरेंच्या भूमिकांवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केला गेला. 

बदलणाऱ्या भूमिकांमुळे राज ठाकरेंचा मतदार देखील त्यांच्यापासून दुरावत गेला आणि त्यामुळेच २००९ ला १३ आमदार निवडूण आणणारा पक्ष नंतर मागे पडत गेला. 

प्रकाश आंबेडकरांचं वंचितच्या माध्यमातून राजकारण

दुसरीकडे २०१९ च्या निवडणुकीच्या आधी प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा भारिप बहुजन महासंघ हा पक्ष वंचित बहुजन आघाडी म्हणून प्रस्थापित केला. 

२०१९ ला वंचित घटकांना एकत्र करुन प्रकाश आंबेडकरांनी छोट्या जात समुहाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. याची परिणीती २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिसली. 

सुरुवातीला प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेससोबत वाटाघाटीचा प्रयत्न केला. परंतु बोलणी फिस्कटल्याने त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितच्या उमेदवारांनी अनेक मतदारसंघांमध्ये लाखाहून अधिक मतं घेतली. 

वंचितने २०१९ च्या निवडणुकीत वंचितने ४७ जागा लढवल्या, त्यात त्यांना ३७ लाख ४३ हजार ५६० इतकी मतं मिळाली.

हेही वाचा >> काँग्रेसने जाहीर केली चौथी यादी, महाराष्ट्रातील दोन जागांवर उमेदवार जाहीर 

वंचितने लढवलेल्या जागांमध्ये त्यांचा वोट शेअर ७.१ टक्के इतका होता. २०१९ ला वंचितने एमआयएमसोबत युती केली होती. त्याचा फायदा इम्तियाज जलील यांना झाला. इम्तियाज जलील हे औरंगाबादमधून निवडूण आले. 

या निवडणुकीत देखील प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत वाटाघाटीचा प्रयत्न केला. परंतु बोलणी फिस्कटल्याने पुन्हा एकदा आंबेडकरांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. 

एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत होत असताना आंबेडकर एक तिसरी आघाडी उघडत आहेत. प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना देखील सोबत घेण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे ओबीसी संघटनांशी देखील आंबेडकरांची बोलणी सुरु आहे. 

प्रस्थापितांच्याविरोधात वंचितांचं राजकारण प्रकाश आंबेडकर करु पाहत आहेत. प्रस्तापित पक्षांमध्ये वंचितांना संधी दिली जात नाही असा आंबेडकरांचं म्हणणं आहे. त्यामुळे आंबेडकरांनी जाहीर केलेल्या जागांमध्ये त्यांनी उमेदवारांची जात, त्यांचं पार्श्वभूमी देखील सांगितली.

वंचितने राज्यात निर्माण केला जनाधार

प्रकाश आंबेडकरांकडे वळणारा मतदार पाहता महाविकास आघाडी आंबेडकरांना सोबत घेण्याबाबत आग्रही होती. शेवटपर्यंत मविआच्या नेत्यांनी आंबेडकर आपल्यासोबत येतील याचा प्रयत्न केला. २०१९च्या निवडणुकीत आंबेडकरांच्या उमेदवारांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या १० ते १२ जागांवर फटका बसला होता. 

त्यामुळे यावेळी तसं होऊ नये म्हणून समविचारी पक्षांनी एकत्र यावं असा मविआचा आग्रह होता. प्रकाश आंबेडकर वंचितांचं राजकारण करत आहेत. आणि वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यातच आंबेडकर योग्य प्रमाणात मतं या निवडणुकीत घेऊ शकले तर त्यांच्या पक्षाला अधिकृत चिन्ह देखील मिळण्याची शक्यता आहे. 

एकीकडे प्रकाश आंबेडकर राज्यात त्यांचा पक्ष बांधण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत असताना दुसरीकडे राज ठाकरे मात्र निवडणुकांमधून माघार घेत आहेत. 

आपल्या पक्षाची ताकद किती हे निवडणुकांमध्ये मिळणाऱ्या मतांमधून स्पष्ट होत असतं परंतु राज ठाकरे निवडणुकी लढवत नसल्याने त्यांच्या पक्षाची नेमकी ताकद किती हे स्पष्ट होऊ शकलं नाही.

हेही वाचा >> शरद पवारांनी सातारा, रावेरच्या उमेदवारांची केली घोषणा 

राज ठाकरेंच्या याच भूमिकेमुळे मनसेचे वसंत मोरे यांनी देखील मनसेला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी देखील आता मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. 

निवडणुका या कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी देण्याचं एक साधन असतं पण सलग दोन वर्ष देशाच्या महत्त्वाच्या निवडणुकांमधून राज ठाकरे माघार घेत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. 

त्याचबरोबर २००९ साली राज ठाकरेंनी जी तिसरी आघाडी उघडण्याचा प्रयत्न केला होता तो मोदींना दिलेल्या पाठींब्यामुळे आता कुठेतरी मागे पडत असल्याचं चित्र आहे. 

राज्याची सध्याची परिस्थितीचं आकलन करुन प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पक्ष बांधणीला जोर दिला आहे. त्यामुळे येत्या काळात तिसरी आघाडी म्हणून प्रकाश आंबेडकर समोर येऊ शकतील. दुसरीकडे राज ठाकरे पुढे काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT