जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जयदेववाडी गावात आज पुन्हा 31 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तीन दिवसांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या ही ७२ वर गेली आहे. २१० घरं असलेलं हे गाव विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर आहे. जयदेववाडी हे महानुभव पंथीयाचं मोठं तीर्थक्षेत्र आहे.
आजही २५० जणांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या आणखी वाढण्याचीही शक्यता आहे. हे गाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरणार का? अशीही चर्चा होते आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हे गाव बंद करण्यात आले आहे. गावामध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोना रूग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाची दुसरी लाट तर येणार नाही ना अशी भीती व्यक्त होते आहे. विदर्भातल्या यवतमाळ, अमरावती, अकोला, औरंगाबाद आणि पुणे या शहरांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून काही ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहेत. अमरावतीमध्ये तर लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सोशल मीडियावरून संवाद साधत सगळ्यांना काळजी घेण्याचं, मास्क वापरण्याचं आवाहनही केलं आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून हे गाव बंद करण्यात आलं आहे. रूग्णसंख्या आणखी वाढण्याचीही चिन्हं आहेत. त्यामुळे गावकऱ्यांना काळजी घेण्याचं आणि सतर्कता बाळगण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.