अरबाज मर्चंटच्या जबाबनंतरही केली अटक, आर्यन खानला अडकवायचा कुणाचा होता प्लान?

Aryan Khan gets Clean Chit by NCB : क्लिन चिट मिळाल्यानंतर एनसीबीने आर्यन खानला नेमकं कोणत्या आधारावर अटक केली होती, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
अरबाज मर्चंटच्या जबाबनंतरही केली अटक, आर्यन खानला अडकवायचा कुणाचा होता प्लान?

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्लिन चिट देण्यात आली. या प्रकरणात आता एनसीबी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनीही समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमकडून चूक झाल्याचं मान्य केलंय. मात्र, एनसीबीने आर्यनला नेमकं कोणत्या आधारावर अटक केली होती, असा यक्षप्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणात अनेक मोठी पात्र होती, ज्यांच्या बळावरच हे प्रकरण पुढे गेलं आणि आर्यन खानला अटकही झाली. या प्रकरणात सर्वात मोठी साक्ष होती, ती आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट. अरबाजने पहिल्याच दिवशी एनसीबीला सांगितलं होतं की, 'आर्यन खानजवळ कोणतंही ड्रग्ज नव्हते.'

'जी ड्रग्ज क्रूझवर मिळाली, ती माझ्यासाठीची होती. आर्यनचं त्याच्याशी काही देणंघेणं नाही,' असं अरबाजने एनसीबीच्या चौकशीत स्पष्ट केलं होतं. चौकशीदरम्यान अरबाजने ही गोष्ट मान्य केली होती की, त्याच्याजवळ चरस होतं. मात्र, त्याचवेळी त्याने एनसीबीला सांगितलं होतं की, आर्यनने त्याला ड्रग्ज घ्यायला नको म्हटलं होतं. कारण एनसीबी खूप सक्रिय आहे.

चौकशीत अरबाज मर्चंटने एनसीबीला हेही सांगितलं होतं की, मी अधूनमधून ड्रग्ज घेतो, याची माहिती आर्यन खानला होती. त्यामुळेच आर्यनने क्रूझवर ड्रग्ज घेऊन न जाण्याचं म्हटलं होतं. यामुळे आपण अडकू शकू, याची आर्यनला कल्पना होती, असंही अरबाजने एनसीबीला सांगितलं होतं.

एनसीबीच्या एसआयटीने केलेल्या चौकशी तपास अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांच्याबद्दल गंभीर निरीक्षण नोंदवली आहेत. आरोपपत्रात म्हटलेलं आहे की, 'असं दिसून येतंय की, प्रसाद या प्रकरणात आर्यन खानला अडकवण्याच्या प्रयत्नात होते.' त्यामुळे तपासातील अनेक बाबी सध्या संशयाच्या भोवऱ्यात आल्या आहेत.

एनसीबीच्या कारवाईबद्दल उपस्थित होत असलेले प्रश्न

जेव्हा अरबाज मर्चंटने एनसीबीला स्पष्ट केलं होतं की, आर्यन खान ड्रग्ज घेत नाही. तरीही प्रसाद यांनी त्याचं व्हॉट्स अप मेसेज बघितले होते. जुने मेसेज बघितले गेले. हे सगळं आर्यन खानचा फोन जप्त केलेला नसताना केलं गेलं. त्याचबरोबर प्रभाकर साईलच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या गेल्या. यामुळे एनसीबीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

आरोपपत्रात या गोष्टीवरही आक्षेप घेण्यात आला आहे की, व्हॉट्स अॅप चॅट्स न्यायालयात पुरावा मानला जात नसतानाही एनसीबीच्या आधीच्या टीमने चॅट्सवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवला. आर्यन खानचे चॅट्स बघितले गेले आणि ज्यांच्याशी त्याने संवाद केला, त्यांची चौकशी केल्यानंतरही एनसीबी चॅट्सवर विश्वास दाखवत राहिली.

या प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेंचा जबाबही महत्त्वाचा आहे. एनसीबीने २२ ऑक्टोबर २०२१ रोजी अनन्याचा जबाब नोंदवला होता. तेव्हा आर्यन खानसोबतच्या संभाषणाबद्दल अनन्याने एनसीबीला सांगितलं होतं की, 'जुन्या संभाषणावरून थट्टामस्करी सुरू होती. त्यासंदर्भातच आर्यनसोबत बोलणं झालं होतं.'

अनन्याने जबाब विश्वनाथ तिवारी या अधिकाऱ्यासमोर दिला होता. आर्यनने गांजाबद्दल अनन्यासोबत बोलणं झाल्याचं एनसीबीला सांगितलं होतं. तर अनन्याने मात्र, आर्यन खोटं बोलत असल्याचं म्हटलं होतं.

एनसीबीने आरोपपत्रात अनेक कारणांचा हवाला देत आर्यन खानविरुद्ध गुन्हा दाखल का केला गेला नाही, याबद्दल खुलासा केलेला आहे. एनसीबीच्या माहितीनुसार आर्यन खान क्रूझ ड्रग्ज पार्टीत सहभागी होता, याबद्दल कोणताही पुरावा तपासादरम्यान मिळाला नाही. त्याचबरोबर आर्यन खान आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटशी कोणताही संबंध एनसीबीला आढळून आला नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in