कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! सलग दोन वेळा आमदार झालेले नेते शिंदे गटात
राकेश गुडेकर, प्रतिनिधी रत्नागिरी: कोकणात शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पक्क केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन आल्यानंतर माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आज चिपळूणमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा […]
ADVERTISEMENT

राकेश गुडेकर, प्रतिनिधी
रत्नागिरी: कोकणात शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पक्क केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन आल्यानंतर माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आज चिपळूणमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आमच्यासोबत कम्युनिकेशन गॅप झाला होता असं म्हणत पुन्हा निवडून येण्यासाठी आम्हाला लोकांची विकास कामे करणे आवश्यक आहे व त्यासाठी लागणारा निधी पुढील काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील असा विश्वास असल्यामुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
सदानंद चव्हाण यांनी सांगितलं एकनाथ शिंदेंकडे जाण्याचे कारण
आगामी निवडूकीत आपण पुन्हा लढू आणि जिंकू असा विश्वास देखील व्यक्त करत लवकरच मुख्यमंत्री महोदय यांचा चिपळूण दौरा आयोजित करून आपल्यामागे असलेली ताकद दाखवू असंही त्यांनी म्हटलं आहे. भास्कर जाधव यांनी 2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर चिपळूणमधील शिवसेनेला उर्जितावस्था देण्याचं काम सदानंद चव्हाण यांनी केलं होतं. 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते आमदार म्हणून चिपळूण मतदारसंघातून निवडून आले होते. 2019 मध्ये मात्र राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यातच महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं, आणि मोठ्या प्रमाणात विकासनिधी राष्ट्रवादीच्या आमदारांना मिळाला, मात्र आमचा मुख्यमंत्री असतानाही आमची कामं होत नव्हती अशी खंत सदानंद चव्हाण यांनी आज बोलून दाखवली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत का जावं लागतंय हे त्यांनी स्पष्ट केलं.
सदानंद चव्हाणांनी थेट उद्धव ठाकरेंवरती केले आरोप
सदानंद चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादीचे इथे आमदार असल्याने त्यांच्या माध्यमातून विकासकामे होत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होती. तसेच पुन्हा विधानसभा निवडणुक जिंकण्याच्या दृष्टीने वाटचाल करायची असेल, तर काहीतरी बदल करायला हवा, असा सर्वांचाच आग्रह आला. आणि त्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
माझा पराभव झाल्यानंतर उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेतली, त्यावेळी आपण यावर नंतर विस्तृत चर्चा करू असं सांगितलं, पण त्यानंतर कोरोना आणि त्यांच्या तब्येतिच्या कारणामुळे त्यांना वेळ मिळाला नसावा, पण आजतागायत माझ्या पराभवाची कारणमीमांसा काही झाली नाही, जे आमदार माझ्यासमोर निवडून आले ते इथलं नेतृत्व करतील, चांगलं काम करताहेत असा प्रचार इथं होत होता. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की आपली इथं गरज आहे की नाही, आणि म्हणून हा निर्णय घ्यावा लागला.
कोणाची गुणवत्ता, कोणाला कुठल्या स्टेजला ठेवायचं याची पारख पक्षाला असायला हवी, त्यांचं म्हणणं मी जबाबदारी मागायला हवी होती, पण ते मागणं मला उचित वाटलं नाही, मला दिलेली जबाबदारी सुद्धा काढली, अन्य द्यायची तर बाजूलाच राहू दे. कदाचित माझी योग्यता नसावी असं म्हणत सदानंद चव्हाण यांनी पक्षनेतृत्वाला टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ती पार पाडेल- चव्हाण
माझी नाराजी कदाचित पेक्षनेतृत्वापर्यंत पोहचली नसेल, किंवा पोहचली असेल तर माझी त्यांना आवश्यकता वाटली नसेल. किंवा कदाचित काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने काही सांगितलं असेल असं म्हणत सदानंद चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी अखेर सदानंद चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाठींबा जाहीर केला. याबाबत बोलताना चव्हाण यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला जबाबदारी देण्याच्या मनस्थितीत आहेत, ते जी जबाबदारी देतील ती आपण गेल्या 15 वर्षांत जशी यशस्वीपणे पार पाडली त्यापेक्षा जोमाने पार पाडू. तसेच मतदारसंघात निधी कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं असल्याचं सदानंद चव्हाण यांनी सांगितलं.