पत्रकार गिरीश कुबेर यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त मजकूर, वाचा नेमका काय आहे वाद?

या पुस्तकावर तातडीने बंदी घालण्याची मागणी
पत्रकार गिरीश कुबेर यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त मजकूर, वाचा नेमका काय आहे वाद?

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र या पुस्तकातल्या मजकुरावरून वाद सुरू झाला आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड या पुस्तकाविरोधात आक्रमक झाले आहेत. या पुस्तकात वादग्रस्त मजकूर छापून गिरीश कुबेर यांना नेमकं साध्य तरी काय करायचं आहे असा प्रश्नही आता विचारला जाऊ लागला आहे. तसेच अनेक संघटनांनी कुबेर यांच्या पुस्तकावर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे.

गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ मेकिंग महाराष्ट्र या पुस्तकात छत्रपती संभाजी राजे यांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप केला जातो आहे. त्यामुळे गिरीश कुबेर यांनी माफी आणि राज्य सरकारने या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

नेमका आक्षेप कोणत्या मजकुराबाबत आहे?

१) छत्रपती संभाजी महाराजांकडे शिवाजी महाराजांप्रमाणे सहनशीलता आणि परराष्ट्र धोरण नव्हते. शिवाजीच्या सैन्याने प्रजेवर कधीही अत्याचार केले नाहीत पण संभाजीच्या सैन्याने केले.

२) शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर येण्यासाठी संभाजीने रक्तपात घडवला. संभाजीने सोयराबाई आणि शिवाजी महाराजांच्या हयातीत तयार झालेल्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री ठार केले. या चुकांमुळे स्वराज्यातील कर्तबगार मंडळी नाहीशी झाली आणि याची शिक्षा त्याला पुढे भोगावी लागली.

३) सत्ता काबीज करण्यासाठी संभाजी महाराजांनी महाराणी सोयराबाई यांना ठार केलं'

४) इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळणारे कोणी व्यक्तिमत्त्व असेल तर बाजीराव पेशवे आहेत.

असे उल्लेख या पुस्तकात करण्यात आले आहेत. त्यामुळे गिरीश कुबेर यांनी माफी मागावी आणि या पुस्तकातला वादग्रस्त मजकूर मागे घ्यावा अशी मागणी आता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड अशा सगळ्यांकडून केली जाते आहे.

या पुस्तकातील मजकुरावरून सगळेच पक्ष आक्रमक झाले आहेत. कुणी काय भूमिका घेती आहे ? जाणून घेऊ..

भाजपचे अतुल भातखळकर काय म्हणतात?

गिरीश कुबेर यांच्या पुस्तकात छापण्यात आलेला मजकूर वादग्रस्त आहे. या प्रकरणी त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. चुकीच्या आणि खोडसाळ लेखांमुळे वादग्रस्त ठरलेल्या कुबेर यांनी त्यांच्या पुस्तकातूनही बदनामीची परंपरा कायम राखली आहे. धर्मासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अत्यंत खोडसाळ आणि द्वेषपूर्ण माहिती त्यांच्या पुस्तकात आहे. या माहितीला समकालीन इतिहासाचे पुरावे नाहीत. थोरल्या छत्रपतींचा वारसा पुढे नेणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत लिहिलेला हा मजकूर संतापजनक आणि निषेधार्ह आहे. जे दावे या पुस्तकात गिरीश कुबेर यांनी केले आहेत ते सगळे तथ्यहीन आणि बिनबुडाचे आहेत. पुस्तकातला हा मजकूर वगळण्यात यावा आणि गिरीश कुबेर यांनी माफी मागावी अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे.

नारायण राणेंनी काय म्हटलं आहे?

Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra या पुस्तकात गिरीश कुबेर यांनी जे काही आक्षेपार्ह उल्लेख केले आहेत त्याचा मी जाहीर निषेध करतो. छत्रपती संभाजी महाराजांबाबत असं लिहिणं चुकीचं आहे त्यांनी हा मजकूर मागे घ्यावा. गिरीश कुबेर यांनी कोणाच्या जिवावर हे धाडस केले आहे त्याची माहिती मिळाली पाहिजे. गिरीश कुबेर तुम्ही मर्यादा सोडून लिखाण केले आहे त्यामुळे मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही.

संभाजीराजे छत्रपती यांनी काय म्हटलं आहे?

खासदार संभाजीराजे यांनी गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. आत्तापर्यंत बंदी घातली कशी गेली नाही? हा प्रश्नही त्यांनी विचारला आहे तसंच असं पुस्तक लिहून महाराजांची बदनामी करणाऱ्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असाही इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काय म्हटलं आहे?

दै.लोकसत्ता या दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या "Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra" या पुस्तकात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर समाज माध्यमांद्वारे माझ्या वाचनात आले. त्यामध्ये नमूद असणारे काही उल्लेख काळजीपूर्वक वाचले. गिरीश कुबेर यांचा अर्थकारण, परराष्ट्र धोरण, विशेषतः रशियाचे राजकाऱण यासंबंधीचा व्यासंग पाहता यासंदर्भात आपण केलेले हे उल्लेख वाचून सखेद आश्चर्य वाटले. कुणा परदेशी लेखकाची ऐकीव माहिती किंवा मुघल इतिहासकारांनी केलेल्या उल्लेखांवर आधारित ऐतिहासिक लेखन करणे एकांगी आणि तथ्याला धरून नसेल ही बाब आपल्याला कदाचित लक्षात आली नसावी. या पुस्तकातली आक्षेपार्ह विधान वगळण्यात यावीत. आपल्याविषयी तसेच लेखन स्वातंत्र्याविषयी जो आदर आहे त्यास तडा जाऊ देऊ नका ही विनंती असं म्हणत अमोल कोल्हे यांनी गिरीश कुबेर यांना पत्रच लिहिलं आहे.

राष्ट्रवादीतच दोन मतप्रवाह?

दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार आणि आमदारांनी पुस्तकावर आक्षेप घेतला असला तरी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंटरेस्टिंग पुस्तक वाचत असल्याचं म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी तसं ट्विटच केलं आहे. त्यामुळे या पुस्तकावरून राष्ट्रवादीतच दोन मतप्रवाह असल्याचं बोललं जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in