अमरावतीत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या भागात निर्बंध कडक केले आहेत. रुग्णसंख्या वाढलेली असतानाही अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा हे शिवजयंतीला विनामास्क बुलेटवरुन फिरत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. खुद्द लोकप्रतिनीधींनीच नियमांचं उल्लंघन केलं तर जनतेला या परिस्थितीचं गांभीर्य कसं राहिलं असा सवाल विचारला जात होता.
अखेरीस खासदार राणा व त्यांचे पती रवी राणा यांच्याविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाविषयक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर कारवाई करण्यात आली आहे. एकीकडे प्रशासन नियम मोडल्याप्रकरणी सामान्यांवर कारवाई करत असताना लोकप्रतिनीधींना वेगळा न्याय आहे का असा सवाल सामान्य अमरावतीकर विचारत होते. अखेरीस पोलिसांनी राणा दाम्पत्याच्या या विनामास्क बुलेटस्वारीची दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अमरावती, यवतमाळ आणि अकोलामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. यासाठी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक देखील बोलावली होती. त्यानंतर या तीनही जिल्ह्यात कोरोनाच्या दृष्टीने काही निर्बंध देखील लावण्यात आलेले आहेत. मात्र असं असताना कोरोनाचे त्रिसूत्री नियम धाब्यावर बसवत जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे आमदार पती हे बुलेटवरुन फिरत होते.