छत्रपती उदयनराजेंनी दिलेला अल्टिमेटम संपला : राज्यपालांविरोधात मोठा निर्णय जाहीर करणार?
सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी या हटविण्यासाठी आक्रमक झालेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांचा अल्टिमेटम आज संपत आहे. मात्र अद्याप या दोघांवर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचं सांगत उद्या (सोमवारी) दुपारी ते त्यांची पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. त्यासाठी उद्या दुपारी उदयनराजे भोसले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. यात ते […]
ADVERTISEMENT

सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी या हटविण्यासाठी आक्रमक झालेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांचा अल्टिमेटम आज संपत आहे. मात्र अद्याप या दोघांवर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचं सांगत उद्या (सोमवारी) दुपारी ते त्यांची पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. त्यासाठी उद्या दुपारी उदयनराजे भोसले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. यात ते आपल्याच पक्षाविरोधात म्हणजे भाजपविरोधात एखादे मोठे आंदोलन जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानांमुळे मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. या विधानांचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. या प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही उडी घेत, पंतप्रधान मोदींकडे भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या विधानावर उदयनराजे भोसले काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, “कोण काय म्हणतंय यापेक्षा प्रत्येक पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय स्वतःच्या समाजकार्याला, वाटचालीला सुरू करत नाही. आज महाराष्ट्रात काय सुरू आहे? राज्यपाल पद सन्मानाचं पद आहे. त्यामुळे निदान त्या माणसाला अक्कल पाहिजे, कळायला पाहिजे. एक-दोनदा त्यांनी हे केलं आहे”, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली होती.
सुधांशू त्रिवेदींना म्हणाले ‘भिकारडा’
“तो सुधांशू त्रिवेदी… कुठला तो भिकारडा आणि टुकार. अशा लोकांनी काहीपण छत्रपतींबद्दल बोलायचं? माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळकळीची विनंती आहे की, आपल्या माध्यमातून देशात विकासकामांची वाटचाल होत असताना या अशा लोकांमुळे गालबोट लागत असेल, तर या दोघांना माफी मागायला लावा. सुधांशू त्रिवेदीला पक्षातून काढून टाका. या राज्यपालाला खाली ओढून त्याला लांब कुठेतरी फेकून द्या”
राज्यपाल कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य करण्यापूर्वी त्यांचा इतिहास वाचायला हवा होता. कोश्यारींनी अशाप्रकारची वक्तव्य करण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी यापूर्वी अनेकदा महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. मात्र आता महाराजांचा अवमान सहन करणार नाही, त्यांना हटविण्यात यावं, अन्यथा 28 नोव्हेंबर रोजी पुढील भूमिका स्पष्ट करु असा इशाराही त्यांनी दिला होता.