आता १२ ते १४ वयोगटातील मुलांनाही घेता येणार लस; 'या' तारखेपासून होणार सुरुवात

Covid vaccination for children : केंद्र सरकारने घेतला निर्णय; बुस्टर डोसच्या निकषही बदलले
आता १२ ते १४ वयोगटातील मुलांनाही घेता येणार लस; 'या' तारखेपासून होणार सुरुवात
(प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: पीटीआय)

कोरोनाविरोधी लढ्यात महत्त्वाचं अस्त्र ठरलेल्या कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात केंद्र सरकारने आज महत्त्वाचा निर्णय घेतला. मागील काही महिन्यांपासून किशोरवयीन अर्थात १२ ते १४ वयोगटातील मुलांना कधी लस घेता येणार, अशी चर्चा सुरू होती. अखेर सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. आज हा निर्णय घेण्यात आला.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाबद्दलच्या निर्णयाची आज माहिती दिली. १२ ते १४ वयोगटातील मुलांचं लसीकरण १६ मार्चपासून म्हणजेच बुधवारपासून केलं जाणार आहे. त्याचबरोबर सरकारने बुस्टर डोससंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेतला असून, ६० वर्षांपुढील सर्व नागरिकांना बुस्टर डोस घेता येणार आहे. यापूर्वी फक्त सहव्याधी असणाऱ्यांनाच बुस्टर डोस देण्याची परवानगी देण्यात आलेली होती.

आता १२ ते १४ वयोगटातील मुलांनाही घेता येणार लस; 'या' तारखेपासून होणार सुरुवात
जूनमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते, IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांचा इशारा
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून याची माहिती दिली. "मुलं सुरक्षित, तर देश सुरक्षित. मला सांगताना आनंद होतोय की, १६ मार्चपासून १३ ते १३ आणि १३ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात होत आहे. याचबरोबर ६० वर्षांपुढील सर्व नागरिक आता बुस्टर डोस घेऊ शकतील. मुलांच्या कुटुंबियांना आणि ६० वर्षांवरील नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी लस अवश्य घ्यावी," असं मांडविया यांनी म्हटलं आहे.

१२ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांसाठीच्या लसीच्या वापराला परवानगी देण्यात आल्यानंतर केंद्राने १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला होता. जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण केलं जात आहे. त्याचबरोबर आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन कर्मचारी आणि ६० वर्षांपुढील सहव्याधी असणाऱ्यांना बुस्टर डोस घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता ६० वर्षांपुढील कोणत्याही व्यक्तीला बुस्टर डोस घेता येणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in