Advertisement

एकनाथ शिंदे म्हणाले, परत 'करुणा' दाखवणार नाही; 'माजलेत बोके' म्हणणारे धनंजय मुंडे गायब?

'पन्नास खोके माजलेत बोके' म्हणत एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदारांना विरोधकांकडून आंदोलन करून डिवचलं जातंय.. या आंदोलनात धनंजय मुंडेही सहगाभी झाले होते...
Dhananjay Munde
Dhananjay Munde

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उभं राहून दररोज आंदोलन करताना दिसताहेत. शिंदे गट आणि भाजपला उद्देशून घोषणाही दिल्या जाताहेत. 'ताट-वाटी, चलो गुवाहाटी', 'पन्नास खोके खाऊन खाऊन माजलेत बोके', अशा घोषणा देण्यामध्ये आमदार धनंजय मुंडेंही होते. पण, सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गर्भित इशारा दिला आणि धनंजय मुंडे आंदोलनातून गायबच झाले. धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीचे वेगवेगळे अर्थ लावले जाऊ लागलेत.

नगराध्यक्षाच्या जनतेतून निवडीच्या विधेयकावर चर्चा करताना धनंजय मुंडेंनी थेट एकनाथ शिंदेंच्या वर्मावर बोट ठेवलं. त्यानंतर 'देवेंद्रजींनी, प्रेम, दया, करुणा दाखवली; पण परत परत दाखवता येणार नाही', असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत बोलताना केलं. शिंदेंनी हे विधान केलं धनंजय मुंडेंना उद्देशून! त्यानंतर करूणा मुंडेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली.

सोमवारी झालेल्या या राजकीय घडामोडीनंतर मंगळवारी सकाळी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडीचे आमदार आले. नेहमीप्रमाणे आमदारांनी शिंदे गटाविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे, राजेश टोपे, छगन भुजबळ, राजेंद्र शिंगणे, हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार उपस्थित होते.

Dhananjay Munde
एकनाथ शिंदेंनी धनंजय मुंडेंना सभागृहातच दिला गर्भित इशारा; करुणा मुंडेंनी घेतली भेट

पावसाळी अधिवेशन : धनंजय मुंडे कुठे?

गुवाहाटीला गेलेल्या बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी सुरू असताना गेल्या काही दिवसांपासून आंदोलनाला हजर राहणारे धनंजय मुंडे मात्र आज अनुपस्थित होते. धनंजय मुंडेंची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवली आणि धनंजय मुंडे कुठे? अशी कुजबूज विधिमंडळ परिसरात सुरू झाली.

एकनाथ शिंदेंचा इशाऱ्यामुळे धनंजय मुंडे आंदोलनातून गायब?

काल विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदेंनी धनंजय मुंडेंना उत्तर देताना अडचणीत आणणाऱ्या प्रकरणाचा अप्रत्यक्ष उल्लेख केला. "काही लोक रोज बाहेर दोनच शब्द बोलत आहेत. दुसरा मुद्दाच नाहीये. परवा काहीतरी ताट वाटी चलो गुवाहाटी. धनंजय मुंडे पण तिकडे होते. इतकं जोरात बोलत होते की, असं वाटतं होतं किती वर्षांचे शिवसैनिक आहेत."

"बेंबीच्या देठापासून ओरडून बोलत होते. घसा खराब होईपर्यंत तुम्ही बोलले. तुमचा पण सगळा प्रवास मला माहितीये ना. सगळा प्रवास माहिती आहे. त्यावेळी देखील आपल्या देवेंद्रजींनी प्रेम, दया, करुणा दाखवली. दाखवली ना? त्यामुळे हे जाऊद्या. पण परत परत दाखवता येणार नाही. मी कमी बोलतो. त्यामुळे जास्त काही बोलत नाही", असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.

करुणा शर्मा-एकनाथ शिंदेंची भेट

या विधानानंतर एकनाथ शिंदेंनी धनंजय मुंडेंना अप्रत्यक्षपणे गर्भित इशारा दिल्याची चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू असतानाच करुणा मुंडे यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या होत्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माझं स्वप्न साकार केलं. मला त्यांच्याकडून न्याय मिळेल असा विश्वास आहे. न्याय देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे", असं करुणा मुंडे म्हणाल्या होत्या.

उशिराने विधानभवनात पोहोचलेल्या धनंजय मुंडेंना आंदोलनातील अनुपस्थितीबद्दल माध्यमांनी प्रश्न केला. त्यावर बोलण्यास धनंजय मुंडेंनी नकार दिला. नंतर बोलतो असं म्हणत ते सभागृहात निघून गेले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in