होय, मी कंत्राटी मुख्यमंत्री; पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

आज सभागृहात बोलताना Eknath Shinde यांनी तुफान फटकेबाजी केली.
Maharashtra assembly session : cm Eknath shinde
Maharashtra assembly session : cm Eknath shindeMumbai Tak

'कंत्राटी कामगाराप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्रीही कंत्राटी आहेत. किती काळ पदावर राहणार हे त्यांनाच माहिती नाहीये', असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची तोफ डागली. उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज विधानसभेत बोलताना प्रत्युत्तर दिलं. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह सभागृहात भाषणं केलेल्या आमदारांनाही उत्तर दिलं.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंनी काय दिलं प्रत्युत्तर?

अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेल्या विधानालाही शिंदेंनी उत्तर दिलं. 'होय, मी कंत्राटी मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट मी घेतलेलं आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट मी घेतलेलं आहे. गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं आणि त्यांचे अश्रु पुसण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांचं दुःख दूर करण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेण्याचं कंत्राट मी घेतलं आहे. बहुजनांच्या सर्वांगीण विकासाचं कंत्राट मी घेतलं आहे. त्यामुळे असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा", असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

Maharashtra assembly session : cm Eknath shinde
‘सत्ताधाऱ्यांचे संस्कार आणि वैचारिक लायकी दिसली;' सुषमा अंधारेंनी आदित्य ठाकरेंच्या पोस्टर्सवरून बरंच सुनावलं

एकनाथ शिंदे अजित पवारांना म्हणाले, 'सरकार येऊन दीड महिनाच झालाये'

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांनी गुन्हेगारीवाढीकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. पण भारतात भौगोलिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर, तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रामीण इंडियाच्या अहवालानुसार गुन्हेगारीत देशात अकरावा क्रमांक आहे. आमचं सरकार येऊन दीड महिनाच झाला आहे."

"पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून मृतदेह फेकून दिल्याची घटना घडली. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आलीये. कन्नडमध्येही सहा नराधमांनी मुलीवर अत्याचार केले. पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे."

Maharashtra assembly session : cm Eknath shinde
Maharashta Assembly : 'त्यावेळी खरं बोलत होतो, काळजी घेतली असती, तर...' -एकनाथ शिंदे

डान्स बार सुरु असल्याच्या विरोधकांच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, 'पोलिसांनी केलेल्या तपासात बार बंद असल्याचं आढळून आलं. बारमध्ये काहीही आक्षेपार्ह आढळून आलं नाही. २०२१ ची ही बातमी आहे. त्यामुळे तेव्हा मी नव्हतो. त्यावेळी तुम्ही होता."

अंमली पदार्थांच्या मुद्द्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, 'या प्रकरणांमध्ये ६ हजार ६४५ गुन्हे दाखल झाले आहेत. एक मोठी कारवाई १४ कोटींची होती. मुंबईत एमडी पकडण्यात आला. नवी मुंबईतही मोठी कारवाई पोलिसांनी केली, त्यांचं मी अभिनंदन करतो. रेल्वे हद्दीतही गुन्हे वाढले असून, काही निर्णय घेण्यात आले आहेत", अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सविस्तर ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हणाले होते?

मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम २४ ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडला. या समारंभात उद्धव ठाकरे म्हणाले होते, "कंत्राटी कामगारांप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्रीही कंत्राटी आहेत. आपण त्या पदावर किती काळ राहणार, हे त्यांनाच माहीत नाही. महाविकास आघाडी सरकारला जे तीन चाकाची रिक्षा म्हणत होते. त्यांचे आता दोन चाकाचे ‘ईडी’ सरकार झाले आहे. महाविकास आघाडी सरकारनं राज्याच्या विकासासाठी आणि कामगारांच्या हाताला काम मिळावं म्हणून अनेक गुंतवणूकदारांसोबत सामंजस्य करार केले. कागदावरील ती गुंतवणूक प्रत्यक्ष जमिनीवर आणली. मात्र आज ज्यांची सुरुवातच खोक्यांपासून झाली ते कोणाची प्रगती करणार? पुढे काय होणार? हे जनतेला दिसत आहे. त्यामुळे आम्ही विकासासाठी एकत्र आलोय अशी कोणी टिमकी मिरवू नये", अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in