जीएसटीमुळे सर्वसामान्यांवर महागाईचा प्रहार! पिठापासून ते पनीरपर्यंत... 'या' वस्तू महागल्या

जीएसटी परिषदेच्या बैठकीत दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तूं जीएसटीच्या कक्षेत आणण्यात आल्या असून, त्यामुळे आधीच महागाईमुळे मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्यांना नवा भार सोसावा लागणार आहे...
gst on dairy products, packed milk curd, hospital charge and hotel room
gst on dairy products, packed milk curd, hospital charge and hotel room

कोरोनामुळे उत्पन्नात घट झालेली असतानाच सर्वसामान्यांना महागाईच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. पीठ, दही, लस्सी, पनीर पासून ते स्टेशनरी आणि हॉस्पिटलपर्यंत अनेक गोष्टींसाठी जास्तीचा खर्च करावा लागणार आहे. जीएसटी परिषदेनं दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवर जीएसटी आकारण्यास सुरुवात केली आहे.

डेअरीच्या वस्तू महागल्या

जीएसटी परिषदेनं अनेक डेअरी उत्पादन जीएसटीच्या कक्षेत आणल्या आहेत. यात दही, लस्सी, पनीर आणि छाछ यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर जीएसटी परिषदेच्या नव्या निर्णयामुळे मासेही महागणार आहेत. या वस्तुंवर सरकारने ५ टक्के जीएसटी लागू केला आहे. या वस्तू पूर्वी जीएसटीच्या कक्षेबाहेर होत्या, म्हणजेच जीएसटी आकारला जात नव्हता.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॅकिंग फूड प्रोडक्ट्सवर जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ब्रॅण्ड नसलेले मात्र पॅकिंग असलेल्या पीठ, डाळींवरही ५ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.

रुग्णालयातील खर्च वाढणार

रुग्णालयात उपचार घेण्यासाठी लोकांना जास्त खर्च करावा लागणार आहे. रुग्णालयात आयसीयूशिवाय वेगळ्या रुम्स असतात, ज्यासाठी प्रति दिवस ५००० हजारापेक्षा अधिक पैसे आकारले जातात. सरकार आता यावरही ५ टक्के जीएसटी आकारणार आहे. यापूर्वी हे जीएसटीच्या कक्षेत नव्हतं.

घरात लागणाऱ्या 'या' वस्तूंवरही द्यावा लागणार ५ टक्के जीएसटी

सोलार वॉटर हिटरच्या किंमतीही आता महागणार आहेत. पूर्वी यावर ५ टक्के जीएसटी आकारला जात होता. आता त्यावरील जीएसटी १२ टक्के करण्यात आला आहे. त्याचबरोबर एलईडी बल्ब, लॅम्प यांच्या किमतीही वाढणार आहेत. सरकारने यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के इतका केला आहे.

ब्लेड, पेपर कैची, पेन्सिल शार्पनर, चमचा, काटा चमचा, स्किमर्स आणि केक सर्व्हिस आदींच्या किंमती वाढल्या आहेत. यावर पूर्वी १२ टक्के जीएसटी आकारला जात होता. त्यात वाढ करून तो १८ टक्के करण्यात आला आहे.

हॉटेलमधील रुमसाठी अधिक भार उचलावा लागणार आहे. यापूर्वी हॉटेलमधील १ हजार रुपयांपेक्षा कमी दर रुमसाठी जीएसटी आकारला जात नव्हता. मात्र, जीएसटी परिषदेनंही यावरही कर आकारणी सुरू केली असून, त्यावर आता १२ टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे.

कोणत्या वस्तूंवरील जीएसटीमध्ये झाली कपात?

जीएसटी परिषदेनं काही वस्तूंवरील जीएसटीमध्ये कपातही केली आहे. रोपवेच्या माध्यमातून सामान आणि प्रवाशांना घेऊन जाणाऱ्यावर सेवेवर पूर्वी १८ टक्के जीएसटी आकारला जात होता. तो आता ५ टक्के करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्प्लिंट्स आणि फॅक्चर झाल्यानंतर लागणाऱ्या वस्तू आणि शरीराचे कृत्रिम अवयव, बॉडी इम्पालट्स आणि इन्ट्रा ओक्युलर आदींवरील जीएसटीत कपात करून तो ५ टक्के करण्यात आला आहे.

जीएसटी परिषदेची जूनच्या अखेरीस बैठक झाली होती. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे देशभरात दैनंदिन वापरातील वस्तुंच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार पडणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in