
पालघर : टाटा उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं आज अपघाती निधन झालं, ते 54 वर्षांचे होते. पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दुपारी सव्वा तीनच्या दरम्यान पालघरजवळील चारोटी गावाजवळ हा अपघात झाला.
सायरस मिस्त्री अहमदाबाद-मुंबई महामार्गावरून मर्सिडीजने (MH-47-AB-6705) मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. सुर्या नदीच्या पुलावर त्यांची गाडी डिव्हायडरला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की मिस्त्री यांच्यासह अन्य एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले, असेही पाटील यांनी सांगितले.
सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सायरस मिस्त्री यांच्यासोबतच्या आठवणीने भावूक झाल्या. त्यांनी ट्विट करून मोठा भाऊ गमावल्याची भावना व्यक्त केली. तसेच पुण्यात माध्यमांशी बोलतानाही त्यांनी मिस्त्री यांच्यासोबतच्या आठवणी जागविल्या.
माध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या, बऱ्याच वेळापासून पालघरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी चर्चा करत आहे. सायरस मिस्त्री माझ्यासाठी भावासारखे होते, मी त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून जवळून पाहिले आहे. आज त्यांच्या निधनाची बातमी येते ही खूप धक्कादायक बाब आहे. गेल्या 4 वर्षांमध्ये त्यांनी खूप चढउतार पाहिला, न्यायालयातील संघर्षही केला.
सदानंद आणि माझ्यासाठी वैयक्तिक हानी असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सायरस मिस्त्री खूप साधेपणाने वागत होते. मला ते हक्काने फोन करुन सांगायचे की जेवायला येणार आहे, वरण भात, थालीपीठ, खिचडी पाहिजे. सदानंद सुळे, सायरस मिस्त्री आणि मी एकदा ताज हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. तिथल्या कर्मचाऱ्याला सदानंद सुळे हेच सायरस मिस्त्री असल्याचं वाटलं होते, अशाही आठवणी त्यांनी सांगितल्या.