विशेष मोहीम! पुण्यातील विद्यार्थ्यांना कॉलेजमध्येच मिळणार कोरोना लस

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती : 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांना घेता येणार लस
विशेष मोहीम! पुण्यातील विद्यार्थ्यांना कॉलेजमध्येच मिळणार कोरोना लस
Vaccine Roadmap(फोटो सौजन्य- PTI)

राज्यातील कोरोनाचं हॉटस्पॉट म्हणून चर्चिल्या गेलेल्या पुणे शहरातील परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर आता रुग्णसंख्येतही घट झाली असून सोमवारपासून शहर आणि जिल्ह्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालये सुरू होत आहे. यापार्श्वभूमीवर शहरातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली असून, जिल्हा प्रशासनानं कोरोना नियमांच्या पालनाची अट घातल सर्वच गोष्टींवरील बंधन हटवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालये सोमवारपासून सुरू होत असून, 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांच्या लसीकरणासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाची माहिती दिली.

'विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच दिली जाणार कोरोना लस. लसीकरण न झालेल्या १८ वर्षांवरील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आपल्या पुणे महापालिकेमार्फत थेट महाविद्यालय परिसरातच लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. यासाठी लवकरच आपण विशेष मोहीम राबवत आहोत', असं मोहोळ यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.

पुण्यातील कोरोना स्थिती कशी?

महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी नव्याने 125 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. पुणे शहरातील एकूण संख्या आता 5 लाख 2 हजार 226 इतकी झाली आहे. शहरातील 155 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 91 हजार 627 झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 1 हजार 550 रुग्णांपैकी 187 रुग्ण गंभीर, तर 225 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत शुक्रवारी नव्याने 3 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 9 हजार 49 इतकी झाली आहे. शहरात शुक्रवारी एकाच दिवसात 8 हजार 525 नमुने घेण्यात आले. पुणे शहराची एकूण चाचण्यांची संख्या आता 34 लाख 25 हजार 528 इतकी झाली आहे.

Related Stories

No stories found.