Sanjay Raut : बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला
बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, हे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी जे भाष्य केलं त्यात त्यांनी मला आपल्याच लोकांनी दगा दिला हे म्हटलंय. त्यानंतर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो दगा हा शब्द वापरला त्याचा […]
ADVERTISEMENT

बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, हे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी जे भाष्य केलं त्यात त्यांनी मला आपल्याच लोकांनी दगा दिला हे म्हटलंय. त्यानंतर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो दगा हा शब्द वापरला त्याचा अर्थ हाच होतो की त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. उद्धव ठाकरे हा शब्द वापरत नाहीत. मी वापरतो आहे. पण मी जास्त काही बोलत नाही कारण मी बोललो की गुवाहाटीत गेलेल्या आमच्या बंडखोर सहकारी लोकांच्या मनाला वेदना होतात असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाले संजय राऊत?
रामशास्त्री बाण्याने न्यायालय वागलं तर शिवसेनेचा विजय होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्हाला हरवलं जावं यासाठी राज्यात सैन्य बोलावलं गेलं आहे. जर शिवसैनिक असाल तर भीती कशाची वाटते? हे सगळे महान लोक आहेत मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. सत्तेच्या बळावर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुणालाही संपवता येणार नाही. व्यथित होऊन उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे की दगा दिला आहे. उद्धव ठाकरे पळपुटे नाहीत. सगळ्यांचे नेते आहेत. ज्या भावना तसंच पाठिंबा याचा ते आदर करतील त्यावर ते लढत राहतील. येणारा काळ शिवसेनेचा असेल असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनेत आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंड एकनाथ शिंदे यांनी पुकारलं आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारलं आहे. आत्ता एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकूण ५१ आमदार आहेत. या सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करत बंड पुकारलं आहे. एवढंच नाही तर मागच्या आठ दिवसांपासून हे सगळे आमदार सोबतच आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग बरोबर नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला संपवतेय असंही या सगळ्यांनी म्हटलं आहे. या सगळ्या आमदारांना दोन ते तीन वेळा आवाहन करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनीही परत यायचं आवाहन केलं. मात्र एकनाथ शिंदेंसह सर्व बंडखोर आमदार यांनी माघार घेतलेली नाही.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांनी जे बंड पुकारलं आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. गेल्या आठ दिवसांपासून राज्यात विविध नाट्यमय घडामोडी पाहण्यास मिळाल्या. या सगळ्या घडामोडींबाबत भाजप शांत होता. मात्र मंगळवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला. त्यानंतर राज्यात परतल्यावर आल्या आल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि सरकार अल्पमतात आहे तेव्हा त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलवा असं सांगितलं. त्यानंतर राज्यपालांनी पत्र पाठवून ३० जूनला म्हणजेच गुरूवारी फ्लोअर टेस्ट ठेवली आहे.
या निर्णयाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली आहे. फ्लोअर टेस्ट होणार की नाही याचा फैसला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे. त्याआधी राज्यात जी कॅबिनेट बैठक पार पडली त्यात उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर तसंच उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याच्या निर्णयांना मंजुरी दिली. त्याचवेळी केलेल्या भाषणात मला माझ्याच लोकांनी दगा दिला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.