ज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकथनकार द.मा. मिरासदार यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकथनकार द.मा. मिरासदार यांचं निधन

स्वतःची वेगळी विनोदी शैली निर्माण करणारे लेखक द. मा. मिरासदार काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचं निधन झालं आहे. मराठी साहित्य विश्वातले विनोदी शैलीमध्ये लिहिणारे लेखक आणि कथाकथनकार ही त्यांची ओळख होती. व. पु. काळे, पु. ल. देशपांडे यांनी जशी कथाकथनाची एक शैली तयार केली होती तशीच एक खास शैली द. मा. मिरासदार यांचीही होती. मराठी भाषेतला गावरान विनोद आणि खास शैली निर्माण करणारी त्यांची शैली शांत झाली आहे.

प्राध्यापक द. मा. मिरासदार यांना दादासाहेब असं म्हटलं जात असे. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या गावी 14 एप्रिल 1927 ला झाला होता. त्यांचं शालेय शिक्षण पंढरपूरमधे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. त्यांनी त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरूवात पत्रकार म्हणून केली होती. ना.सी. फडके संपादन करत असलेल्या साप्ताहिक झंकारमध्ये ते लेखनही करत होते. पुढे त्यांनी गरवारे महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरी पत्करली त्याच महाविद्यालयातून ते निवृत्त झाले.

ग्रामीण बाज मराठी साहित्यात रूजवण्याचं मोलाचं काम द. मा. मिरासदार यांनी केलं. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, चिं.वि. जोशी, पु.ल. देशपांडे यांनी निर्माण केलेली विनोदी साहित्याची परंपरा मिरासदारांनी आणखी पुढे नेली. ग्रामीण बाज आणि त्यावरचा विनोद हे त्यांच्या लेखनशैलीचं वैशिष्ट्य होतं.

अंगत पंगत, खडे आणि ओरखडे, गप्पांगण, गप्पागोष्टी, गंमतजंमत, गाणारा मुलुख हे कथा आणि लेख संग्रह विशेष गाजले. तसंच गुदगुल्या, गोष्टीच गोष्टी, चकाट्या, भुताचा जन्म, भोकरवाडीच्या गोष्टी, माकडमेवा, माझ्या बापाची पेंड, मिरासदारी या पुस्तकांनाही विशेष पसंती मिळाली. मी लाडाची मैना तुमची हे वगनाट्यही द. मा. मिरासदार यांनी लिहिलं होतं. हसणावळ हा कथासंग्रही चांगलाच गाजला.

1998 मध्ये परळी वैजनाथ या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भुषवलं होतं. एक डाव भुताचा आणि ठकास महाठक या दोन सिनेमांच्या संवाद लेखनाचं काम त्यांनी केलं होतं. पु.ल. जीवनगौरव सन्मान, शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार, पुणे महापालिकेचा महर्षी वाल्मिकी पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा विंदा जीवन गौरव पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

शरद पवार यांनी वाहिली आदरांजली

प्राध्यापक द. मा. मिरासदार यांचे निधन वृत्त समजले अतिशय दुःख झाले. मराठीतील एक अतिशय नामवंत लेखक, मराठीचे प्राध्यापक, कथाकथनकार म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख होती. शंकर खंडू पाटील, व्यंकटेश माडगूळकर आणि मिरासदार सर यांचे कथा कथनकाचे कार्यक्रम अनेक वेळा पाहण्याचा योग आला त्यातील मजा ही काही औरच होती. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली मी बरीच पुस्तके वाचली.

भोकरवाडीच्या गोष्टी, फुकट, बेंडबाजा, मिरासदारी, भुताचा जन्म, माझ्या बापाची पेंड, अशा अनेक पुस्तकांचा समावेश करावा लागेल. 14 एप्रिल आंबेडकर जयंतीच्या दिवशी 1927 साली त्यांचा जन्म झाला आज 94 व्या वर्षी ते आपल्याला सोडून गेले. गेली अनेक वर्ष ते सार्वजनिक जीवनात दिसले नाहीत. प्राध्यापक मिरासदार सरांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली !

Related Stories

No stories found.