नागपूर येथील सत्र न्यायालयात कार्यरत असलेल्या महिला जजना ऑनलाईन हॅकरने दणका दिला आहे. महिला जजचं बँक खातं हॅक करुन पावणे तीन लाखाची रक्कम चोरट्यांनी पळवली आहे. मंगळवारी ही बाब लक्षात येताच सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सिव्हील लाईन परिसरात राहणाऱ्या सोनाली मुकुंद कनकदंडे (वय 42) या नागपूर सत्र न्यायालयात जज म्हणून कार्यरत आहेत. 14 मे 2022 रोजी कनकदंडे यांनी आपल्या गुगल पे च्या माध्यमातून 500 रुपयाचं गाडीचं फास्ट टॅग कार्ड रिचार्ज केलं. यानंतर नेट बॅकिंगच्या सहाय्याने आपल्या खात्यातले तपशील चेक करत असताना कनकदंडे यांना काही ट्रान्झॅक्शन्स झालेली दिसली.
बँकेच्या कस्टमर केअरला फोन करुन चौकशी केली असता त्यांना आपल्या खात्यातून 2 लाख 75 हजार 399 रुपयांची रक्कम काढून घेण्यात आल्याचं कळलं. ज्यानंतर त्यांनी तात्काळ सीताबर्डी पोलीस ठाणं गाठलं. प्राथमिक चौकशीनंतर कनकदंडे यांचा इ-मेल अकाऊंट, बँकेचं खातं हॅक करुन चोरट्याने हे पैसे पळवल्याचं कळतंय. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.