आर्यन खानची अटक ते जामीन, 25 दिवसात काय काय घडलं? वाचा सविस्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आज बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. यासंदर्भातला सविस्तर आदेश उद्या दिला जाणार आहे. त्यामुळे आर्यन खान शुक्रवारी किंवा शनिवारी तुरुंगाबाहेर येऊ शकणार आहे. कॉर्डिलिया क्रूझ शिप प्रकरणी आर्यन खानला 2 तारखेला एनसीबीने ताब्यात घेतलं. त्यानंतर 3 तारखेला त्याला अटक करण्यात आली. मागचे पंचवीस दिवस आर्यन खान तुरुंगात आहे. या पंचवीस दिवसांमध्ये काय काय घडलं आपण जाणून घेऊ.

2 ते 28 ऑक्टोबरचा घटनाक्रम असा आहे

2 ऑक्टोबर – NCB ने कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकला. या ठिकाणी होणारी रेव्ह पार्टी आणि ड्रग्ज पार्टी त्यांनी उधळून लावली. त्यावेळी एनसीबीने आर्यन खान, त्याचा खास मित्र अरबाझ मर्चंट याच्यासहीत एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

3 ऑक्टोबर -समीर वानखेडे हे एनसीबीनेच विभागीय संचालक आहेत त्यांनी आर्यन खानला ताब्यात घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. त्यानंतर काही वेळातच्या ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी आणि सेवन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. आर्यन खानसहीत आठही जणांची मेडिकल टेस्ट करण्यात आली.

4 ऑक्टोबर- आर्यन खानच्या जामीन अर्जावर पहिली सुनावणी झाली. यावेळी एनसीबीने आर्यन खानची कोठडी 11 तारखेपर्यंत वाढवण्यात यावी असं स्पष्ट केलं. आर्यन खान जवळ कोणतंही ड्रग्ज सापडलं नाही त्यामुळे त्याला जामीन मिळाला असा युक्तिवाद आर्यनच्या वकिलांनी केला. आर्यन खानच्या कोठडीत त्यावेळी कोर्टाने 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

7 ऑक्टोबरला मुंबईच्या NDPS कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी आर्यन खानला सुनावली.

8 ऑक्टोबर-आर्यन खानची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली. तिथे त्याला कैदी नंबर 956 हा देण्यात आला.

10 ऑक्टोबर– NCB ने शाहरुख खानच्या ड्रायव्हरचा जबाब नोंदवला

11 ऑक्टोबर- कोर्टाने आर्यन खानच्या जामिनावरची सुनावणी 13 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. तसंच एनसीबीने त्यांचं उत्तर नोंदवावं अशीही मुदत दिली.

14 ऑक्टोबर– कोर्टाने आर्यन खानच्या जामिनावरचा निर्णय राखून ठेवला. त्यामुळे आर्यनचा तुरुंगातला मुक्काम 20 ऑक्टोबरपर्यंत वाढला.

Aryan Khan Case: आर्यन खान केस प्रकरणात चर्चेत आलेली पूजा ददलानी नेमकी आहे कोण?

20 ऑक्टोबर– कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. या दिवशी आपल्याला जामीन मिळेल अशी मोठी आशा आर्यनला वाटत होती. मात्र तसं झालं नाही.

21 ऑक्टोबर– शाहरुख खानने आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलगा आर्यन खानची भेट घेतली. त्यानंतर आर्यन खानच्या वकिलांनी या प्रकरणी ब़ॉम्बे हायकोर्टात धाव घेतली.

26 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत आर्यन खान प्रकरणावरची सुनावणी बॉम्बे हायकोर्टात सुरू होती. तीन दिवस दोन्ही बाजूंचं म्हणणं कोर्टाने ऐकून घेतलं. त्यानंतर दोन दिवस निर्णय राखून ठेवला. 26 आणि 27 तारखेला कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे आर्यन खानच्या या दोन रात्रीही तुरुंगातच गेल्या. आज म्हणजेच 28 ऑक्टोबरला आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र तरीही त्याची आजची रात्र तुरुंगातच जाणार आहे. कारण आर्यन खानला जो जामीन मंजूर करण्यात आला आहे त्यासंबंधीचा सविस्तर आदेश कोर्ट उद्या काढणार आहे. त्यामुळे आर्यन खानची सुटका उद्या किंवा परवा होऊ शकणार आहे.

काय घडलं होतं त्या दिवशी?

एनसीबीनं एक निवेदन जारी करत संपूर्ण कारवाईची माहिती 3 ऑक्टोबरला दिली. 2 ऑक्टोबरला कार्डेलिया क्रूझवर छापा टाकण्यात आला. क्रूझवरील सर्वांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. चरस, कोकेन, एमडीएमए ड्रग्ज टॅब्लेट्स आणि एमडी ड्रग्स यावेळी सापडले.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्रूझ पार्टीची एनसीबीला 15 दिवसांपूर्वीच माहिती मिळाली होती. एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितलं, की क्रूझ पार्टीबद्दल शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि जहाजबांधणी मंत्रालयाला सविस्तर अहवाल दिला जाईल. या पार्टीबद्दल आम्हाला 15 दिवसांपूर्वीच गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतरच आम्ही ऑपरेशन सुरू केलं.

एनसीबीचे 22 अधिकारी प्रवासी बनून क्रूझवर गेले. त्यावेळी क्रूझवर 1800 लोक होते. त्यामधूनच अंमली पदार्थ प्रकरणात 8 लोकांना आम्ही शोधून काढलं.

यावेळी, काही जणांकडून ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या सर्वांनी अत्यंत हुशारीने ड्रग्स आपल्यासोबत आणलं होतं. काही जणांनी हे ड्रग्स आपल्या चप्पल, शर्टची कॉलर, बेल्ट, बॅगेतील हँडल यामध्ये लपवून आणलं होतं. तर काही जणांनी आपल्या अंतर्वस्त्रात देखील ड्रग्स लपवून आणलं होतं.

क्रूझ ड्रग्ज पार्टीचा आयोजक समीर वानखेडेंचा मित्र, नवाब मलिक यांचा धक्कादायक आरोप

आर्यन खानला या प्रकरणात अटक झाल्यानंतर विविध प्रकारच्या बातम्या समोर आल्या. तसंच NCB च्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही सगळी कारवाई म्हणजे बनाव असल्याचं म्हटलं. तर NCB ने याला उत्तर देत आपली कारवाई कशाप्रकारे केली गेली हे सविस्तर सांगितलं. नवाब मलिक यांनी तीनवेळा पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. तर NCB ने तिन्ही वेळा पत्रकार परिषद घेऊन आपण कशी कारवाई केली आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच कसं सगळ्यांना अटक केली हे सांगितलं.

या प्रकरणात शाहरूख खानचा मुलगा आर्यनचा एक व्हिडिओही एनसीबीच्या हाती लागला आहे. स्वतः एनसीबीनेच चौकशी सुरू असलेल्या आठ लोकांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंह, मोहक जायस्वाल, विक्रांत छोकर, गोमित चोपडा यांचा समावेश आहे. एनसीबीकडून ताब्यात घेतलेल्या काही लोकांना अटक करण्यासाठीही कार्यवाही सुरू केली आहे. चौकशीदरम्यान, आर्यन खानने आपल्या क्रूझ पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आल्याचं सांगितलं. तसंच पार्टीत सहभागी होण्यासाठी आपल्याला कुणी पैसे वगैरे दिले नाहीत. आयोजकांनी माझं नाव वापरून लोकांना पार्टीमध्ये बोलावल्याचा दावाही आर्यनने केला.

बॉलिवूड आर्यनच्या पाठिशी

आर्यन खानला अटक झाल्याची बातमी समजतात बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान याने अभिनेता शाहरुख खानची भेट घेतली. शाहरुख खान आणि सलमान खान हे दोघे आर्यन खानच्या अटकेपासून दोनवेळा भेटले आहेत. सलमान खानही काळवीट शिकार प्रकरण आणि अपघात प्रकरणात अडकला होता. त्यामुळे त्याला कोर्टाच्या अनेकदा वाऱ्या कराव्या लागल्या. अशात सलमान आणि शाहरुख यांच्यात काय चर्चा झाली ते समजू शकलेलं नाही. मात्र आर्यनची केस सतीश मानेशिंदे यांच्याकडे द्यावी असं सलमान खानने शाहरुखला सुचवल्याची चर्चा आहे. अभिनेता सुनील शेट्टीनेही आर्यन खानचं समर्थन केलं आहे. तसंच अभिनेता ऋतिक रोशन, सुझेन खान, रविना टंडन यांनीही आर्यनचं समर्थन केलं आहे.

कोण आहे आर्यन खान?

शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन हा याआधी फारसा कधी चर्चेतही नव्हता. तो नेहमीच स्वतःला लाइमलाईटपासून दूर ठेवत असल्याचं पाहायला मिळालं होतं. पण ड्रग्स प्रकरणात आर्यनला अटक झाल्यानंतर आता हाच आर्यन प्रचंड चर्चेत आला. इतर स्टार किड्सप्रमाणेच आर्यनचं विदेशात शिक्षण झालं आहे. धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर तो लंडनच्या सेव्हन ओक्समध्ये पुढील शिक्षणासाठी गेला होता. त्यानंतर साऊदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठात आर्यनने उच्चशिक्षण घेतलं. कॅलिफोर्नियातून त्याने सिनेमा निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT