'लोकशाहीची चिंता वाटते' असं भास्कर जाधव का म्हणाले?

यासह रामदास कदम यांना देखील भास्कर जाधव यांनी इशारा दिला तसंच त्यांनी लोकशाहीविषयी चिंता व्यक्त केली
भास्कर जाधव
भास्कर जाधव मुंबई तक

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूच्या वकिलांच्या बाजू ऐकून घेत पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी ठेवली आहे. याबाबत दोन्ही गटातील नेत्यांसह राजकीय मंडळीच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर बोलताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्याला लोकशाहीची चिंता वाटते, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

भास्कर जाधव म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आश्चर्य नाही तर लोकशाहीची चिंता वाटते. जाधव चिपळूणमध्ये बोलत होते.

एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपत्रातेबाबत आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणीसाठी पुढची तारीख दिली आहे. यावर बोलताना आमदार भास्कर जाधव म्हणाले की, आजच्या निकालावर केवळ देशाचच नाही तर जगाचं लक्ष होतं. पण आज आलेल्या निकालावर फार काही आश्चर्य वाटत नसलं तरी लोकशाहीची चिंता वाटते, वेळेवर न्याय न मिळणं, किंवा निर्णय वेळेत न होणं, हे लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणामुळे लोकशाहीची चिंता वाटते, या देशामध्ये लोकशाही टिकेल की नाही याची चिंता वाटते, असं भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

इतकंच नाही तर भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला.

ठाकरे सरकारने घेतलेल्या काही निर्णयांना आताच्या सरकारने स्थगिती दिली आहे. यावरून भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जाधव यांनी म्हटलं आहे की, आज ज्या मंडळींनी भाजप बरोबर जाऊन सरकार बनवलं आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये जे मंत्री होते अशा ९ जणांचा समावेश आहे. १ एप्रिल रोजी जो निर्णय घेण्यात आला, त्या सरकारमध्ये तुम्ही होतात. आणि तुम्ही ज्या सरकारमध्ये होतात त्या निर्णयांना स्थगिती मिळते. याचा अर्थ तुम्ही त्यावेळी घेतलेले निर्णय चुकीचे होते का? ज्या सरकारला तुम्ही पाठिंबा दिलाय त्याच सरकारने तुम्ही घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली आहे, तेव्हा तुम्ही गप्प का? याचा अर्थ आता तुम्ही आता ज्या सरकारला पाठींबा दिलेला आहे, त्या सरकारला तुमच्या पाठींब्याचं महत्व राहिलेलं नाही, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in