पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याची दोन खुनाच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्याची काल (15 फेब्रुवारी) तळोजा जेलमधून सुटका झाली. पण यावेळी सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे गजानन मारणेच्या सुटकेवेळी त्याच्या समर्थकांनी तळोजा जेलसमोर प्रचंड गर्दी केली होती. एवढंच नव्हे तर तळोजा ते पुणे अशी जंगी मिरवणूकच काढण्यात आली होती. यावेळी मुंबई-पुणे एक्सप्रेसवरुन तब्बल ३०० हून अधिक कारचा ताफा यात सहभागी झाला होता. एखाद्या गुंडाच्या सुटकेसाठी अशा प्रकारे मिरवणूक काढण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
गजानन मारणे हा तळोजा जेलमधून बाहेर आल्यानंतर समर्थकांचं तुफान शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. काल सायंकाळी पुण्याच्या दिशेने मारणेच्या समर्थकांचा मोठा ताफा तळोजा जेलहून रवाना झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाके देखील फोडण्यात आले.
पप्पू गावडे आणि अमोल बधे या दोन खुनाच्या गुन्ह्यात होता गजानन मारणे हा तुरुंगात होता. मात्र मागील आठवड्यात या दोन्ही प्रकरणी त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यामुळे काल तो तुरुंगातून बाहेर आला. यावेळी बाहेर येत असताना त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं.
ही बातमी पण पाहा: पूजा चव्हाण प्रकरणातले 7 प्रश्न, उत्तरं अद्यापही मिळाली नाहीत!
दरम्यान, यावेळी गजानन मारणेसोबत असणाऱ्या शेकडो गाड्या या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अत्यंत वेगाने जात असल्याचं देखील पाहायला मिळालं. गजानन मारणेची ही मिरवणूक उर्से टोलनाक्यापर्यंत काढण्यात आली होती. त्यानंतर गजानन मारणे हा काल रात्री उशिरा कोथरुड येथील आपल्या घरी पोहचला. तेव्हा देखील त्याच्यासोबत अनेक गाड्या होत्या.
मोहोळ-मारणे जेलबाहेर… पुणे पोलिसांची डोकेदुखी वाढली!
साधारण पंधरा दिवसापूर्वी पुण्यातील आणखी एक कुख्यात गुंड शरद मोहोळ हा देखील जेलबाहेर आला आहे. कतील सिद्दिकी याच्या खुनाप्रकरणी शरद मोहोळवर खटला सुरु होता. पण त्याची देखील या प्रकरणात निर्दोष सुटका करण्यात आली होती. त्यामुळे पुण्यातील दोन कुख्यात गुंड हे एकाच वेळी जेलमधून बाहेर आल्याने पुणे पोलिसांची डोकेदुखी मात्र वाढली आहे. कारण दोन्ही टोळ्यांचे म्होरके आता जेलबाहेर असल्याने पुण्यात गँगवारची भीती वाढली आहे.