पुण्यातील फॅशन स्ट्रीट भागात भीषण आग, आगीत शेकडो दुकानं जळून खाक
पुणे: मुंबईतील सनराईज हॉस्पिटलच्या आगीची घटना ताजी असताना दुसरीकडे काल (26 मार्च) पुण्यातील फॅशन स्ट्रीट या कॅम्प भागात रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत शेकडो छोटी दुकानं जळून भस्मसात झाली आहेत. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपीसे यांनी याबाबत माहिती देताना म्हणाले की, ‘रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास फॅशन स्ट्रीटमधील आगीच्या घटनेविषयी फोन आला. यावेळी घटनास्थळी […]
ADVERTISEMENT
पुणे: मुंबईतील सनराईज हॉस्पिटलच्या आगीची घटना ताजी असताना दुसरीकडे काल (26 मार्च) पुण्यातील फॅशन स्ट्रीट या कॅम्प भागात रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत शेकडो छोटी दुकानं जळून भस्मसात झाली आहेत.
मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपीसे यांनी याबाबत माहिती देताना म्हणाले की, ‘रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास फॅशन स्ट्रीटमधील आगीच्या घटनेविषयी फोन आला. यावेळी घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन इंजिन पाठविण्यात आले, परंतु आग प्रचंड वेगाने वेगात पसरली. त्यामुळे तात्काळा आगीवर नियंत्रण मिळवता आलं नाही. भर बाजारात लागलेली ही आग प्रचंड भीषण होती.’
ते म्हणाले की, ‘आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 16 गाड्या आणि 50 जवान आणि 10 अधिकारी उपस्थित होते. अथक प्रयत्नांनंतर ही आग आज पहाटेच्या सुमारास अटोक्यात आली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पुण्याच्या फॅशन स्ट्रीटमध्ये लागलेली ही आग इतकी भयंकर होती की, त्याच्या ज्वाळा शहरातील कोणत्याही कोपऱ्यातून दिसू शकत होत्या. दरम्यान, रात्री एक वाजेच्या सुमारास आगीच्या ज्वाळा काहीशा कमी झाल्या. या आगीत बाजारातील अनेक दुकानं जळून राख झाली आहेत. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.
फॅशन स्ट्रीटवरील एका दुकानदाराने ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितले की, ‘वीकेंडसाठी शुक्रवारीच बरेच दुकानदार हे आपल्या दुकानात सामान ठेवतात. आठवड्याच्या शेवटी प्रत्येक दुकानदाराकडे साधारण तीन लाखांपर्यंत माल असतो. त्यामुळे तुम्ही अंदाज लावा की किती नुकसान झालं असेल.’
ADVERTISEMENT
पुण्यातील या फॅशन स्ट्रीटवरील दुकानांमध्ये कपड्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक्स पर्यंतच्या अनेक वस्तू स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने पुणेकरांची नेहमीच इथे गर्दी पाहायला मिळायची.
ADVERTISEMENT
या भीषण आगीच्या घटनेनंतर आता दुकानदारांना राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. जेणेकरुन दुकानदार, कामगार आणि येथे काम करणारी लोकं हे पुन्हा नव्याने आपला व्यवसाय सुरू करू शकतील. गेल्या 15 दिवसांत कॅम्प परिसरात आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी शिवाजी मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. ज्यामध्ये 25 दुकाने भस्मसात झालेली.
मुंबईतील सनराईज रुग्णलयातील आगीत 10 जणांनी गमावले प्राण
दरम्यान, कालच (गुरुवार) मुंबईतील भांडूपमध्ये सनराईज हॉस्पिटलमध्येही आगीची घटना समोर आली होती. हे हॉस्पिटल ड्रीम मॉलच्या तिसर्या मजल्यावर होते. या आगीमुळे 10 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, ही आग लेव्हल 4 ची असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 20 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. रात्री उशिरा 11.30 च्या सुमारास ही आग लागली होती.
रुग्णालयात होते सर्वाधिक कोरोना रुग्ण
सनराइज रुग्णालयात एकूण 76 रुग्ण होते. यापैकी 73 रुग्ण हे कोरोनाबाधित होते. तर इतर रुग्ण 3 होते. या रुग्णांपैकी 30 जणांना मुलुंडच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर इतर तीन जणांना फोर्टिस रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे. तर इतर रुग्णांना देखील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT