Andheri east by poll : अंधेरी पूर्वची जागा एकनाथ शिंदेंनी भाजपला का सोडली? ही आहेत 3 कारणं
बंडखोरीनंतर शिंदे गटाकडून शिवसेना, शिवसैनिक, धनुष्यबाणावर दावा ठोकला जातोय. गर्दी जमवून माईंडगेम खेळले जात आहेत. आणि हे सगळं सुरू असतानाच ठाकरे आणि शिंदेंचा खरा कस लागणार आहे, तो अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत! रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी निवडणूक होणार आहे. ठाकरे आणि शिंदेंना ताकद दाखवण्याची पहिल्यांदाच संधी मिळणार आहे. पण भाजपच्या एंट्रींनं शिंदेंची मोठी […]
ADVERTISEMENT
बंडखोरीनंतर शिंदे गटाकडून शिवसेना, शिवसैनिक, धनुष्यबाणावर दावा ठोकला जातोय. गर्दी जमवून माईंडगेम खेळले जात आहेत. आणि हे सगळं सुरू असतानाच ठाकरे आणि शिंदेंचा खरा कस लागणार आहे, तो अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत! रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी निवडणूक होणार आहे.
ADVERTISEMENT
ठाकरे आणि शिंदेंना ताकद दाखवण्याची पहिल्यांदाच संधी मिळणार आहे. पण भाजपच्या एंट्रींनं शिंदेंची मोठी गोची झाल्याचं दिसतंय. अंधेरी पूर्व मतदारसंघातून भाजप आपला उमेदवार देणार आहेत. त्यामुळेच शिंदे गटानं ठाकरेंसोबतच पंगा घेण्याची पहिलीच संधी सोडून दिला का, आणि संधी सोडली असेल तर का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होताहेत.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. ३ नोव्हेंबरला मतदान, तर ७ नोव्हेंबरला मतमोजणी म्हणजेच निकाल जाहीर होणार आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक होतेय. शिवसेनेचा या जागेवर दावा आहे. दुसरीकडे शिंदे-ठाकरे दोघांनीही आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केलाय. ठाकरेंनी तर अंधेरीत रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटकेंना तिकीटही दिलीय.
हे वाचलं का?
2019 मध्ये भाजप-शिवसेना युतीत ही जागा शिवसेनेला सुटली होती. त्यामुळे शिंदे-भाजप युतीमध्येही ही जागा शिंदे गटाला सुटणं अपेक्षित आहे. आणि शिंदेंही निवडणूक रिंगणात उमेदवार उतरवतील, असं म्हटलं जातं होतं. पण ठाकरेंविरुद्धच्या पहिल्याच सामन्यातून एकनाथ शिंदेंनी माघार घेतल्याचं बोललं जातंय. कारण, भाजपनं इथून निवडणूक लढवण्याची निव्वळ तयारीच नाही, तर पक्षाचं अधिकृत प्रचार कार्यालयही सुरू केलंय. आणि शिंदे गटानं निवडणूक लढवण्याबद्दल भाष्य न करता मौन बाळगणंच पसंत केल्याचं दिसतंय. त्यामुळेच भाजपच्या अधिकृत एंट्रीची आता केवळ अधिकृत घोषणाच होणं बाकी आहे.
या राजकीय घटनांमुळे आता प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे ठाकरेंना ‘शिंदे’शाहीचा हिसका दाखवून देण्याची एवढी बाका संधी चालून आलेली असताना एकनाथ शिंदेंनी अंधेरीचा जागा भाजपला का सोडली? तर त्याची तीन कारणं आहेत.
ADVERTISEMENT
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक : पहिलं कारण म्हणजे एबी फॉर्मचा वाद
शिंदे गटाकडून आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला जातोय. पण निवडणूक लढवण्यासाठी हा दावा नाही, तर एबी फॉर्म गरजेचा आहे. या फॉर्मवरून उमेदवाराला पक्ष आणि पक्षाचं चिन्ह मिळतं. आणि सध्या हे एबीफॉर्म देण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंकडे आहे. त्यामुळे स्वतंत्र गट म्हणून निवडणूक रिंगणात उतरले, तर त्यांच्याकडे धनुष्यबाण हे चिन्ह नसेल. आणि धनुष्यबाण नसेल, तर शिंदे गटाच्या निवडणूक रिंगणात अडचणी वाढू शकतात. त्यामुळे शिवसेनेची हक्काची जागा शिंदे गटानं भाजपला सोडून दिल्याचं म्हटलं जातंय.
ADVERTISEMENT
दुसरं कारण हे उमेदवारीत दडलंय
अंधेरी पूर्व हा मतदारसंघ ठाकरेंच्या मुंबईतील बालेकिल्ल्यात येतो. इथं ठाकरेंनी रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी दिलीये. एखाद्या आमदार, खासदाराचं अकाली निधन झालं, तर पोटनिवडणुकीत संबंधित कुटुंबातला उमेदवार असेल, तर त्याला सहानुभुती मिळते. आणि इथेच शिंदेंसाठी अडचण होऊ शकते. शिवसैनिकाविरोधात उमेदवार दिला, असा आरोप केला जाऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, निवडणूक रिंगणात उतरायचं झालं, तरी शिंदे गटाकडे सध्या तुल्यबळ उमेदवार नसल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे हात दाखवून अवलक्षण नको, अशी शिंदे गटाची भूमिका असल्याचं दिसतंय.
भाजपची २०१९ ची खेळी
भाजपनं २०१९ मध्येच अंधेरी पूर्व मतदारसंघातून तयारी सुरू केली होती. पण युतीतल्या वाटाघाटीत मतदारसंघ शिवसेनेला सुटला. त्यामुळे भाजपकडून इच्छूक असलेले मुरजी पटेल हे अपक्ष लढले. रमेश लटकेंना त्यांनी तगडी फाईट दिली. लटकेंना ६२ हजार, तर पटेलांना ४५ हजार मतं पडली. काँग्रेस उमेदवार अमिन कुट्टी २८ हजार मतांसह तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. मराठी मतांचा टक्का एक लाख असतानाही पटेलांनी काट्याची टक्कर दिल्यानं रमेश लटके अवघ्या १७ हजार मतांनी जिंकले.
शिवसेनेसोबत युती असूनही भाजपनं आतून मुरजी पटेलांसाठी काम केल्याचं म्हटलं जातं. आता हेच मुरजी पटेल भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे युतीत ही जागा शिवसेनेची असली, तर भाजप जिंकून येण्याची शक्यता असलेली ही जागा शिंदे गटाला सोडणार नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. ही झाली तीन कारणं. पण यासोबतच आणखी एक शक्यताही वर्तवली जातेय. ती म्हणजे, अंधेरीत ठाकरेंविरुद्ध भाजपचा अधिकृत, तर शिंदेंचा डमी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT