आपले शत्रू आणि वैरी आपल्याच घरात; शिवसेनेचा भाजपवर पुन्हा निशाणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘औरंगजेबाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अटक केल्याचे वृत्त धडकताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात व चिंतेत बुडाला होता, पण महाराजांच्या अटकेनेही आनंद मानून, गोडधोड वाटणारा एक वर्ग तेव्हाही महाराष्ट्रात होताच. त्याच प्रवृत्तीचे लोक बेळगाव महापालिका निवडणुकीतील मराठी पराभवाचा आनंद साजरा करीत आहेत’, अशा शब्दात शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.

ADVERTISEMENT

बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती पराभव झाला. तर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या निकालावर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाष्य केलं असून, भाजपला लक्ष्य केलं आहे.

‘मराठी माणूसच मराठी माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे काय? असा प्रश्न बेळगाव महापालिका निकालानंतर निर्माण झाला आहे. मराठी एकजूट व मऱ्हाटी लढ्याचा बेळगावात दारुण पराभव झाल्याचा धक्का सगळ्यांनाच बसला आहे, पण बेळगावात मराठी माणसांचा पराभव घडताच महाराष्ट्रातील मऱ्हाटी भाजप पुढाऱ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. हे दुःख टोचणारे आहे’, अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

तसलेच दळभद्री कृत्य बेळगावच्या निकालाने घडले

‘मराठी माणूस संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या कर्मभूमीत पराभूत झाला म्हणून महाराष्ट्रात फटाके वाजवले गेले, हे जास्त वेदनादायक आहे. क्रिकेटच्या सामन्यात पाकिस्तान जिंकताच भेंडीबाजारातील काही भागात पूर्वी फटाके फुटत होते. तसलेच दळभद्री कृत्य बेळगावच्या निकालाने घडले आहे’, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

ADVERTISEMENT

बेळगावात ‘कमळ’ कसं फुललं? आपल्याच बालेकिल्ल्यात एकीकरण समितीला फक्त दोन जागा, जाणून घ्या कारणं…

ADVERTISEMENT

‘बेळगाव महानगरपालिकेवरील भगवा उतरवून पालिका बरखास्त केली तेव्हा साधा निषेधही न करणारे भाजपचे महाराष्ट्रातील पुढारी आज ‘भगवा फडकला हो’ म्हणून हर्षवायूने बेभान होत गोडधोड वाटत फिरत असतील तर संयुक्त महाराष्ट्राच्या 105 हुतात्म्यांचा तो अपमान आहे’, असं म्हणत शिवसेनेनं भाजप निशाणा साधला.

आश्चर्य वाटण्याचे कारण नाही

‘एकीकरण समितीच्या उमेदवाराचा पराभव घडावा यासाठी महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांची कुमक बेळगावात डेरेदाखल झाली होती. त्यामुळे आज बेळगावातील मराठीजनांच्या पराभवाबद्दल येथील भाजपचे पुढारी बेभान झाले याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. अखंड महाराष्ट्राबाबत यांना आस्था नव्हती आणि नाहीच. बेळगावात शिवसेना कधीच लढली नाही. सीमा आंदोलनात सहभागी असलेले शरद पवारही कधी बेळगाव निवडणुकीच्या आखाड्यात उतरले नाहीत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारीही कधी सीमा बांधवांशी बेईमानी करताना आढळले नाहीत. प्रत्येकाने आपापल्या परीने सीमाभागातील मराठी बांधवांना बळ देण्याचेच प्रयत्न केले, पण बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधवांची ती एकजूट आज उरली आहे काय?’, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

नेमका काय आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद?

‘एक निवडणूक हरले म्हणून लढा संपत नाही. जेथे भाषा, संस्कृती व अस्मितेचा प्रश्न येतो तेथे मराठी माणूस वाघाच्या काळजाने लढतच असतो. शिवसेनेने बेळगावच्या लढ्यासाठी 69 हुतात्म्यांची आहुती दिलीच आहे. शिवसेनाप्रमुखांनी या कार्यासाठी तीन महिन्यांचा तुरुंगवासही भोगला, म्हणूनच बेळगावातील मराठी एकजुटीच्या पराभवाने शिवसेना, महाराष्ट्राची जनता अस्वस्थ झाली आहे’, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

मराठी माणूस नाही, शिवसेना हरलीये; संजय राऊतांना भातखळकरांचा टोला

एकीची वज्रमूठ सुटली की गद्दारांचे फावते!

‘शिवरायांच्या काळात सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे हे निपजले होतेच. औरंगजेबाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांना अटक केल्याचे वृत्त धडकताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात व चिंतेत बुडाला होता, पण महाराजांच्या अटकेनेही आनंद मानून, गोडधोड वाटणारा एक वर्ग तेव्हाही महाराष्ट्रात होताच. त्याच प्रवृत्तीचे लोक बेळगाव महापालिका निवडणुकीतील मराठी पराभवाचा आनंद साजरा करीत आहेत. मराठीजनांचे शाप व हुतात्म्यांचे तळतळाट त्यांना लागतील. सीमा बांधवांचा लढा सुरूच राहील! बेळगावच्या पराभवातून एक धडा घ्यावाच लागेल. आपले शत्रू आणि वैरी आपल्याच घरात आहेत. एकीची वज्रमूठ सुटली की गद्दारांचे फावते!’, अशा शब्दात शिवसेनेनं भाजपवर टीकेचे बाण डागले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT