Cyrus Mistry Accident: भारतात रस्ते अपघातात दर 4 मिनिटाला 1 मृत्यू, वर्ल्ड बँकेचा अहवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे रविवारी रस्ते अपघातात निधन झालं. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला कारने प्रवास करत होते. त्यांची कार मुंबईजवळ दुभाजकाला धडकली आणि हा अपघात झाला. प्राथमिक तपासात पोलिसांनी अपघाताचे कारण ओव्हरस्पीडिंग आणि चुकीच्या बाजूने ओव्हरटेक केल्याचे सांगितले आहे.

ADVERTISEMENT

भारतात दररोज 426 हून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. त्याचबरोबर रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण म्हणजे ओव्हरस्पीडिंग. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, भारतात दर 4 मिनिटाला एका व्यक्तीचा रस्ता अपघातात मृत्यू होतो.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो अहवालात काय माहिती?

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अहवालानुसार, 2021 मध्ये देशभरात 4.03 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले. यामध्ये 1.55 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. म्हणजेच दररोज 426 हून अधिक लोकांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागतो. त्यानुसार दर तासाला सुमारे 18 जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, 60 टक्के रस्ते अपघातांचे कारण ओव्हरस्पीडिंग आहे. गेल्या वर्षी 4.03 लाख अपघातांपैकी 2.40 लाख अपघात आणि मृत्यू हे अतिवेगाने झाले होते. ओव्हरस्पीडिंगमुळे रस्ते अपघातात 87,050 लोकांचा मृत्यू झाला, तर 2.28 लाखांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.

हे वाचलं का?

एनसीआरबीच्या अहवालानुसार गेल्या वर्षी सर्वाधिक रस्ते अपघात राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत. गेल्या वर्षी देशभरात राष्ट्रीय महामार्गांवर 1.22 लाख रस्ते अपघात झाले होते. या अपघातांमध्ये 53,615 लोकांचा मृत्यू झाला. त्याचवेळी राज्य महामार्गावर झालेल्या 96 हजार 451 अपघातांमध्ये 39 हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. तर, इतर प्रकारच्या रस्त्यांवर 1.84 लाख अपघात झाले, ज्यामध्ये 62,967 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

या अहवालात राष्ट्रीय महामार्गावर दर 100 किमीवर 40 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच वेळी राज्य महामार्गावर दर 100 किमीवर 21 जणांना जीव गमावावा लागला आहे. देशाची सरासरी काढली तर दर 100 किमीवर 2 लोकांचा मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

भारतातील रस्ते सर्वात वाईट!

लंडन विद्यापीठाच्या अहवालानुसार , भारतातील रस्त्यांचा दर्जा सर्वात वाईट आहे. भारतातील फक्त 3 टक्के रस्ते हे राष्ट्रीय महामार्ग आहेत, तर 75 टक्के महामार्ग फक्त दोन-लेन आहेत. भारतातील रस्तेही खूप गजबजलेले आहेत. 40 टक्के रस्ते अस्वच्छ आहेत तर 30 टक्क्यापेक्षा जास्त गावांमध्ये अद्याप रस्ताच पोहोचलेला नाही.

ADVERTISEMENT

गेल्या वर्षी रस्ता सुरक्षेबाबत जागतिक बँकेचा अहवाल आला होता. या अहवालात असे सांगण्यात आले की, भारतामध्ये जगातील फक्त 1 टक्के वाहने आहेत, परंतु जगातील 11 टक्के रस्ते अपघात येथे होतात. म्हणजेच जगात दर 100 अपघातांपैकी 11 अपघात भारतात होतात.

जागतिक बँकेच्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी 1.50 लाख लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात, तर 7.50 लाखांहून अधिक लोक अपंग होतात. अपघातात सर्वाधिक बळी हे चालणारे किंवा सायकल चालवणारे लोक असतात.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अहवाल काय सांगतो?

त्याच वेळी, 2018 मध्ये, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नं देखील रस्ता सुरक्षेबाबत अहवाल दिला होता. 2016 ची आकडेवारी या अहवालात देण्यात आली आहे. यानुसार सर्वाधिक रस्ते अपघात अमेरिका आणि जपानमध्ये होतात, मात्र मृत्यू भारतात होतात. अमेरिकेत 22 लाखांहून अधिक रस्ते अपघातात 37,461 लोकांचा मृत्यू झाला तर, भारतात सुमारे 5 लाख अपघातांमध्ये 1.50 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. जागतिक बँकेच्या अहवालात असे म्हटले आहे की एका दशकात (2011-2020) भारतात 13 लाख मृत्यू झाले, तर 50 लाख अधिक लोक जखमी झाले.

अर्थव्यवस्थेचे किती नुकसान?

जागतिक बँकेच्या अहवालानुसार, रस्ते अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्यूंमुळे भारताच्या जीडीपीला दरवर्षी 3 ते 5 टक्के नुकसान होते. जागतिक बँकेने आपल्या अहवालात रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अभ्यासाचा हवाला देत म्हटले आहे की भारतात रस्ते अपघातांमुळे होणारे नुकसान 1.47 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. ही रक्कम भारताच्या GDP च्या 3 टक्के इतकी आहे.

रस्ते अपघातांमुळे गरिबीही वाढते, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे. रस्ता अपघात आणि त्यात होणारा मृत्यू एखाद्या कुटुंबाला गरिबीच्या खाईत ढकलतो, तर जे गरीब आहेत ते कर्जबाजारी होतात. अपघातानंतर 75 टक्के पेक्षा जास्त गरीब कुटुंबाचे उत्पन्न कमी होते.

सायरस मिस्त्री यांचा मृत्यू कसा झाला?

सायरस मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला येत होते. त्यांच्या व्यतिरिक्त अनाहिता पंडोले, त्यांचे पती दारियस पंडोले आणि भाऊ जहांगीर दिनशा पंडोले हे त्या गाडीत होते. अनाहिता पंडोले या कार चालवत होत्या. त्या एक प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. या अपघातात सायरस मिस्त्री आणि जहांगीर दिनशा यांचा जागीच मृत्यू झाला. तर पंडोले दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे.

वृत्तसंस्थेनुसार, पोलिसांनी सांगितले की, कार ओव्हरस्पीड असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. कारने चुकीच्या बाजूने दुसऱ्या वाहनालाही ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, करणचा ताबा सुटून ती डिव्हायडरला धडकली. त्यानंतर त्यात सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT