किशोरीताई, मी येतो तुमच्या बरोबर महिला आयोगाकडे; नितेश राणेंचं पेडणेकरांना आवाहन
“दिशा सालियनची 8 जूनला बलात्कार करून हत्या झाली आहे”, असा आरोप पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. राणे यांनी केलेल्या आरोपानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त करत महिला आयोगानं दखल घेण्याची मागणी केली. पेडणेकर यांच्या भूमिकेनंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी त्यांना दिशा […]
ADVERTISEMENT

“दिशा सालियनची 8 जूनला बलात्कार करून हत्या झाली आहे”, असा आरोप पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. राणे यांनी केलेल्या आरोपानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त करत महिला आयोगानं दखल घेण्याची मागणी केली. पेडणेकर यांच्या भूमिकेनंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी त्यांना दिशा सालियनला न्याय मिळवून देण्यासाठी समोर येण्याचं आवाहन केलं आहे.
केंद्रीय नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप केले. “दिशा सालियनवर बलात्कार कुणी केला? सुशांत सिंगच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे गायब कसे?”, असे प्रश्न उपस्थित करत दिशा सालियनची बलात्कार करून हत्यात करण्यात आल्याचं राणे यांनी म्हटलं.
नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणे यांनी केलेल्या आरोपांबद्दल खंत व्यक्त केली. त्याचबरोबर महिला आयोगाकडे यासंदर्भात कारवाई करण्याचीही मागणी केली. पेडणेकर यांनी केलेल्या मागणीनंतर आमदार नितेश राणे यांनी ट्वीट केलं आहे. ज्यात त्यांनी दिशाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्या, मी तुमच्यासोबत येतो, असं म्हटलं आहे.
आमदार नितेश राणे नेमकं काय म्हणाले आहेत?
“महापौर ताई.. दिशा सालियनची मृत्यूनंतरही बदनामी, व्यथित झालेय…’ बरोबर… खरंच तिला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून तिच्या खऱ्या आरोपींना शिक्षा कशी होईल, त्यासाठी एक महिला म्हणून तुम्ही पुढे या. मी येतो महिला आयोगाकडे तुमच्या बरोबर. वेळ आणि तारीख कळवा”, असं नितेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
महापौर ताई.. दिशा सालियनची मृत्यूनंतरही बदनामी, व्यथित झालेय..
बरोबर..
खरंच तीला न्याय मिळालाच पाहीजे.. म्हणून तिच्या खऱ्या आरोपींना शिक्षा कशी होईल त्या साठी एक महिला म्हणून तुम्ही पुढे या..मी येतो महिला आयोगाकडे तुमच्या बरोबर..
वेळ आणि तारीख कळवा!— nitesh rane (@NiteshNRane) February 19, 2022
किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या?
पत्रकार परिषदेत बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या होत्या की, “नारायण राणे यांनी दिशा सालियनबद्दल जे उद्गार काढले, ते महिला म्हणून मुंबईची महापौर म्हणून व्यथित झाले. तिच्या रिपोर्टला खोटं ठरवण्याचं काम ते करत आहेत. भाजपच्या आरोपांमुळे दिशाच्या चारित्र्य हनन होत आहे.”
“महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विनंती आहे की, यावर कारवाई करावी. भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनाही सांगेन महिला म्हणून यात लक्ष घाला. मृत्यूनंतर ही बदनामी करणं महाराष्ट्राला शोभणार नाही. एका मुलीचा मृत्यू झालाय मात्र तिची बदनामी चालली आहे. तिच्या कुटुंबियांनी वारंवार सांगूनही हे महिलांच्या इज्जतीला किंमत देत नाहीत”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.