Maharashtra Rains 2021: महाराष्ट्रात पावसाचा धूमाकूळ, मुंबई-पुण्यासह राज्यातील पावसाचे सर्व अपडेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मागील दोन दिवसांपासून राज्यात सर्वदूर पाऊस बरसत आहे. अशावेळी अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरी भागात देखील पुराचं पाणी घुसलं असून त्यामुळे हजारो लोकांच्या संपत्तीचं नुकसान झालं आहे. जाणून घेऊयात राज्यात पुराची नेमकी स्थिती काय आहे त्याविषयी.

1. पालघर: पालघर जिल्ह्यात पहाटेपासून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघरमधील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाल आहे. ग्रामीण भागासह मुख्य शहरांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

हात नदी आणि वैतरणा नदीला पूर आला असून पुराचं पाणी मनोर परिसरात शिरल्याने मनोर गावाचा संपर्क तुटलाय. तर मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि पालघरला जोडणारा रस्ता पाण्याखाली असल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ग्रामीण भागातील रस्त्यांवरील लहान साकव, मोऱ्या वाहून गेल्याने रस्ते वाहतूक विष्कळीत झालीय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाण्याच्या प्रवाहामुळे मनोर येथील बांधन गावची मोरीच वाहून गेल्याने बांधन गावाचा संपर्क तुटला आहे. मनोर गावातील महावितरण विभागाचे सब स्टेशन पाण्याखाली गेल्याने वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे. अनेक सखल भागात असलेल्या घरात आणि सोसायट्यांमध्येही पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.

2. महाबळेश्वर: देशातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे व सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर मध्ये गेले काही दिवस धुवाधार पाऊस पडत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ADVERTISEMENT

महाबळेश्वरमध्ये आज 118 इंच पाऊस रेकॉर्ड ब्रेक झाला आहे. आज सकाळी नऊ वाजेपर्यंत महाबळेश्वर मध्ये 24 तासात विक्रमी पाऊस झाला आहे. महाबळेश्वरचे आजचे पर्जन्यमान 480 मिलिमीटर तसेच 90 इंच पाऊस रेकॉर्डब्रेक पडला असल्याची नोंद करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

काल दिवसभरात मुसळधार पावसाने संपूर्ण महाबळेश्वर तालुका हा जलमय झाला आहे. समुद्रसपाटीपासून चार हजार फूट उंचीवर असणारा मिनी काश्मिर महाबळेश्वर तालुकामध्ये जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाची बॅटिंग सुरूच असून जोरदार वाऱ्यासोबत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे.

मुसळधार पावसाने ग्रामीण भागातील ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. संततधार पावसाने महाबळेश्वर तालुक्यातील प्रसिद्धध वेण्णालेक पाचगणी पूर्णतः पाण्याखाली गेला असून येथील वाहतूक ठप्प आहे. पावसाळी पर्यटनासाठी पुण्या-मुंबईहून अनेक पर्यटक महाबळेश्वर-पाचगणी दाखल झाले आहेत. हे पर्यटक पावसाचाा आनंद देखील घेत आहेत. दरम्यान महाबळेश्वर आंबेनळी घाटा रस्त्यादरम्यान अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. तर महाबळेश्वर-पोलादपूर रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

3. सातारा: संततधार पावसाने महाबळेश्वरसह पाचगणी, वाई, सातारा, जावळी परिसरातही आज दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ओढे-नाले भरून वाहत आहेत. मोठ्या पावसामुळे रस्त्यावरही अनेक ठिकाणी पाणी साठवून राहिले होते.

पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक संथ सुरु आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साठवून राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १९.८ मिमी पाऊस झाला. आतापर्यंत सरासरी ११९.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये सातारा- २३.३ मिमी, जावळी- ४७, पाटण-३५, कराड-१४(७५), वाई-१८.३ तर, महाबळेश्वर 90.६ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

4. अमरावती: अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचे येथे आज सकाळी मुसळधार पाऊस झाल्याने गावाच्या बाजूला गरजधरी धरण ओहरफ्लो झाल्यामुळे धरणाची भिंत फुटली व संपूर्ण पाणी हे गावामध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. तर काही नागरिकांची वाहने सुद्धा या पाण्यामध्ये वाहून गेले.

अचानक आलेल्या पावसाने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेसंदर्भात प्रशासनाला माहिती देण्यात आलेली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

5. यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यांतील दहेगाव नाल्यात एक जण वाहून गेला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, काही लोकांच्या समक्षच हा प्रकार घडला आहे. विजय येलुतवाड असं या तरुणाचं नाव असल्याचं समजतं आहे.

कुपटी येथील हा तरुण कुपटीहून दहेगावला जात होता. रस्ता ओलांडत असताना त्याचा तोल गेल्याने तो नाल्याच्या पुरात वाहून गेला. या घटनेचा व्हीडिओ उपस्थितपैकी एकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. दरम्यान, तहसिलदार आनंद देऊळगावकर यांनी तात्काळ शोध मोहीम सुरु केली आहे.

यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात रात्री पासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नाल्यांना पूर आला असून हे पाणी शेतात ही साचले आहे. यामुळे अनेक शेतांना अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे सोयाबीन, कापसाचे पीक धोक्यात आले आहे.

दहागावजवळ असलेल्या नाल्याला पूर आल्याने सकाळी 5 वाजता पासून उमरखेड -पुसद वाहतूक बंद आहे. प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी वाहत्या पाण्यापासून दूर राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

6. कणकवली: कणकवलीत सतंत धार कोसळणाऱ्या पावसामुळे कणकवली शहरातील हर्णे आळी येथे संतोष ठाणेकर यांच्या घरावर सकाळी झाड पडून मोठे नुकसान झाले आहे. कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्यांना याची माहीती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल होत पावसातच झाड बाजूला करण्याचें काम सुरू केले.

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण घराचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस सुरु असल्याने काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे.

7. सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आज सकाळी पासून सिंधुदुर्ग जिल्हात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. कुडाळ तालुक्यातील आबेंरी पुलावर पाणी आले असून हे पूल पाण्याखाली गेले आहे. यामुळे माणगाव खोरातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. तर सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे पुलावर पाणी आले आहे. शिरशींगे गावात जाणारी वाहतूक बंद झाली आहे. या गावाचा सावंतवाडीशी देखील संपर्क तुटला आहे.

याबाबत सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी यांनी माहिती दिली आहे. सद्यस्थितीत करूळ घाटाने भुईबावडा घाट मार्गाने होणारी वाहतूक बंद आहे. करूळ घाटात दरड कोसळली असून वाहतूक ठप्प झाली आहे. फोंडा घाट व आंबोली घाट मार्गाने कोल्हापूर येथे होणारी वाहतूक सुरू असून येथील भागातील वाहतूक वाढली आहे.

8. भीमाशंकर: उत्तर पुणे जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आदिवासी भागात रस्ते व भातशेती वाहून गेली आहे. मंचर-भीमाशंकर महामार्गावरील पोखरी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.

मुसळधार पावसाने आंबेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तर भात शेताचं प्रचंड नुकसान झालं आहे.

9. पुणे: खेड तालुक्याच्या पश्चिम भागात असलेलं कळमोडी धरण 100 टक्के भरले आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणातून 3000 क्युसेक्सने विसर्ग

उत्तर पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये असलेल्या धरण क्षेत्रात गेल्या 2 दिवसापासून वरूणराजा सतत बरसतोय. यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात असलेलं कळमोडी धरण 100 टक्के भरले असून धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणातून आठही सांडव्याद्वारे रात्रीच्या सुमारास 6979 क्यूसेक वेगाने पाणी स्वयंचलित दरवाजाद्वारे आरळा नदीत सोडण्यात आले.

पहाटे पावसाचा थोडा जोर कमी झाल्याने 3000 क्युसेक वेगाने पाणी सुरू आहे. 1.51 TMC पाणी साठवणूक क्षमता असलेल्या धरणातून आता आरळा नदीतून चासकमान धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने लवकर चासकमान धरणही झपाट्याने भरलं जात आहे.

मात्र मागील वर्षी या भागात जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पाऊसाने जुलै अखेरपर्यंत या भागातील चासकमान, भामा-आसखेड, कळमोडी ही तीनही धरणे ओव्हरफ्लो झाली होती. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने पाठ फिरवल्याने अद्याप चासकमान, भामा आसखेड धरणाची पाणीपातळी निम्म्यापेक्षा कमी आहे.

Mumbai Local Trains: Kasara घाटात दरड कोसळली, रेल्वे वाहतूक ठप्प

10. हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात काल सकाळपासून पावसाने जोर धरलाय त्यामुळं सखल भागात पाणी साचलंय. नद्या ओढे देखीलओसंडून वाहत आहे. अजूनही जिल्ह्यातील काही भागात पावसाची रिप-रिप सुरूचं आहे. तर, कयाधू नदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्याने सेनगाव वरुड चक्रपान जाणाऱ्या पुलावरून पाणी जात असल्याने सहा गावांचा संपर्क तुटला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT